"त्या घटनेनंतर कॅमेऱ्याचे फ्लॅश पाहिले तरी माझं रक्त खवळतं" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prince Harry

"त्या घटनेनंतर कॅमेऱ्याचे फ्लॅश पाहिले तरी माझं रक्त खवळतं"

प्रिन्सेस डायना Princes Diana यांचा धाकटा चिरंजीव आणि ब्रिटीश राजघराण्याचे सदस्य असलेले प्रिन्स हॅरी Prince Harry हे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आईच्या निधनाविषयी व्यक्त झाले. डायना यांचा मृत्यू १९९७ मध्ये एका रस्ते अपघातात झाला होता. त्यावेळी प्रिन्स हॅरी बारा वर्षांचे होते. "डायना यांच्या मृत्यूवेळी त्यांचे फोटो काढणाऱ्या कॅमेऱ्यांचे फ्लॅश पाहून रक्त खवळत होतं, आपण काहीच करू शकत नसल्याची हतबलता चीड आणणारी होती", अशा शब्दांत प्रिन्स हॅरी व्यक्त झाले. (Prince Harry recalls Dianas death says flash of cameras makes my blood boil)

'द मी यु कान्ट सी' या माहितीपटाच्या नवीन सीरिजमध्ये हॅरी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. "असहायतेची भावना मला शांत बसू देत नाही. लहान असल्याने मी माझ्या आईची मदत करू शकलो नव्हतो. तिच्यासोबत घडलेली घटना, तो धक्का मला आजही पचवणं सोपं नाही. जे लोक तिचा पाठलाग करत होते, तेच लोक नंतर अपघातग्रस्त अवस्थेतील तिचे फोटो काढत होते. त्या कॅमेऱ्यांचे फ्लॅश पाहिले किंवा क्लिकिंगचा आवाज जरी ऐकला तरी माझं रक्त खवळतं. माझ्या आईसोबत जे घडलं ते मला पुन्हा पुन्हा आठवतं. एक लहान मुलगा म्हणून मी जे अनुभवलं ते आठवून मला खूप चीड येते," असं ते म्हणाले.

हेही वाचा: 'हे आता मी खपवून घेणार नाही'; नेटकऱ्याच्या कमेंटवर भडकली सोनाली

आईच्या निधनानंतर व्यसनेच्या अधीन गेल्याचंही प्रिन्स हॅरी यांनी कबूल केलं. ते पुढे म्हणाले, "मी मद्यपान करण्यास तयार होतो, मी ड्रग्ज घेण्यास तयार होतो. मला होणारा त्रास कमी करण्यासाठी मी ते सर्व करण्यास तयार होतो. पण नंतर मी स्वत:ला सावरलं. आठवड्यातून फक्त एक किंवा दोन दिवस मी मद्यपान करायचो."

डायना या जगातील सर्वांत प्रसिद्ध स्त्रियांपैकी एक होत्या. वैयक्तिक आयुष्य आणि काम यांमुळे त्या सतत चर्चेत असायच्या.

loading image
go to top