पुण्याचा प्रसाद बनला ग्लोबल 'आयर्न मॅन'

नीलेश शेंडे
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

'या स्पर्धेतील सहभाग दमवणारा असतो; परंतु मलेशियातील स्थानिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि पाठिंब्यामुळे उत्साह वाढला. या स्पर्धेचं आव्हान खडतर होतं; पण अशक्‍य नव्हतं. स्पर्धेत यश मिळवून देशाचं नाव उंचावल्याचा अभिमान वाटतो.''

- प्रसाद शिंदे

वजन अति वाढल्यामुळे 'फिटनेस' गमावला आणि अनेक त्रास मागे लागले, त्यातून वाचण्यासाठी त्याने व्यायाम सुरू केला. त्यानंतर त्याला व्यायामाची अशी काही गोडी लागली, की त्याला थेट आंतरराष्ट्रीय पातळीवरील 'फिटनेस'चा कस पाहिल्या जाणाऱ्या 'ट्रायथलॉन' शर्यतीत सहभागी होण्याचे वेध लागले. हे स्वप्नदेखील त्याने लगोलग सत्यात उतरवले, थेट 'आयर्न मॅन' हा किताब मिळवून.

दिवाळीच्या फराळावर मनसोक्त ताव मारल्यानंतर आता गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करून घाम गाळायचे दिवस सुरू झालेत; परंतु आजच्या 'जंक फूड'च्या जमान्यात स्थूलपणा डोकेदुखी ठरत आहे. त्यावर व्यायाम हाच एकमेव उपाय आहे; परंतु बहुतेकांचा व्यायामाचा निश्‍चय काही दिवसांनंतर संपलेला असतो. मात्र व्यायामात सातत्य ठेवल्यास 'फिटनेस' मिळतोच, हे पुण्यातील प्रसाद शिंदे (वय 35) या तरुणाने थेट आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत यश मिळवून दाखवून दिले आहे.
प्रसादचे वजन अति वाढले होते, त्यामुळे त्याने 'फिटनेस' गमावला होता. त्यातून अनेक शारीरिक व्याधी त्याच्या मागे लागल्या होत्या. त्यामुळे त्याने पुण्यातील तळजाई टेकडीवर फेऱ्या मारायला सुरवात केली. त्यातून त्याला व्यायामाची अशी काही गोडी लागली, की थेट आंतरराष्ट्रीय पातळीवरील फिटनेसचा कस पाहिल्या जाणाऱ्या 'ट्रायथलॉन' शर्यतीत सहभागी होण्याचे वेध त्याला लागले. हे स्वप्नदेखील त्याने लगोलग सत्यात उतरवले. 

फिटनेसचा कस पाहणारी, मलेशियात झालेली ही अनोखी खडतर शर्यत पूर्ण करून त्याने 'आयर्न मॅन'चा किताब मिळविला.
मराठमोळा अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण, जलतरणपटू कौस्तुभ राडकर यांनी यापूर्वी ही कामगिरी केली आहे. कौस्तुभने सलग चारवेळा हा किताब मिळविला आहे. अभिनेता मिलिंद सोमण याने मागील वर्षी वयाच्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर असताना 'आयर्न मॅन' किताब पटकावला आणि या स्पर्धेची भारतभर चर्चा झाली. 'फिटनेस'ची खडतर परीक्षा घेणारी ही स्पर्धा. या स्पर्धेतच काय, साधी तळजाईची टेकडीही आपण सर करू की नाही, अशा विचारात असलेल्या प्रसाद शिंदे याने स्थूलपणावर मात करण्यासाठी व्यायामाला सुरवात केली. 
काही वर्षांपूर्वी वजनाची शंभरी ओलांडलेल्या प्रसादने खडतर व्यायामातून फिटनेस मिळवला. त्यानंतर पुण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली त्याने काही मॅरेथॉन शर्यतींमध्येही सहभाग घेतला. सन 2015 मध्ये 42 किलोमीटरची हैदराबाद मॅरेथॉन साडेचार तासांत, सन 2016 मध्ये 42 किलोमीटरची मुंबई मॅरेथॉन 4 तास 13 मिनिटांमध्ये पूर्ण केली.
दरम्यानच्या काळात त्याने मिलिंद सोमण याने 'आयर्न मॅन' किताब जिंकल्याची बातमी पाहिली. त्यातून त्यानेही ही स्पर्धा जिंकण्याचा चंग बांधला. त्यासाठी त्याने कसून सराव सुरू केला. 

मलेशियात 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेत त्याने सहभाग घेतला आणि 14 तास 12 मिनिटांमध्ये ही स्पर्धा यशस्विरीत्या पूर्ण करून भारताचा तिरंगा ध्वज अभिमानाने फडकावला.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकास सलग 2.8 किलोमीटर पोहणे, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर धावणे अशा तीन प्रकारांतील 224.8 किलोमीटर अंतर ठराविक वेळेत पूर्ण करावे लागते. त्यात जगभरातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये प्रसादने निश्‍चित केलेल्या वेळेपूर्वी (14 तास 28 मिनिटे) शर्यत पूर्ण करून 'आयर्न मॅन' किताब पटकावला.

'या स्पर्धेतील सहभाग दमवणारा असतो; परंतु मलेशियातील स्थानिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि पाठिंब्यामुळे उत्साह वाढला. या स्पर्धेचं आव्हान खडतर होतं; पण अशक्‍य नव्हतं. स्पर्धेत यश मिळवून देशाचं नाव उंचावल्याचा अभिमान वाटतो.''

- प्रसाद शिंदे

Web Title: pune's prasad shinde becomes iron man