Pushkar Shrotri: रंगाचा आणि धर्माचा काय संबंध.. पुष्कर श्रोत्री कडून राम कदमांचा समाचार.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pushkar Shrotri slams ram kadam for pathan bikini controversy

Pushkar Shrotri: रंगाचा आणि धर्माचा काय संबंध.. पुष्कर श्रोत्री कडून राम कदमांचा समाचार..

Pushkar Shrotri: सध्या देशभरात 'पठाण' चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून केली जात आहे. या चित्रपटातील एका गाण्यात 'भगव्या' रंगाची बिकिणी दीपिकाने घातल्याने या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. शाहरुख- दीपिकावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करून या प्रकरणाला धार्मिक रंग दिला जात आहे. भाजप आमदार राम कदम यांनीही या चित्रपटाला विरोध दर्शवला होता. पण अभिनेता आणि निर्माता पुष्कर श्रोत्री याने तीव्र शब्दात राम कदम यांचा समाचार घेतला आहे.

(Pushkar Shrotri slams ram kadam for pathan bikini controversy )

'पठाण' चित्रपटाला विरोध करत राम कदम यांनी एक ट्वीट केले होते. त्यात ते म्हणाले, “पठाण चित्रपटाला देशभरातील साधू-संतांसह सोशल मीडियावर विरोध होत आहे. अनेक हिंदू संघटना या चित्रपटाला विरोध करताना दिसत आहेत. महाराष्ट्रातही सध्या हिंदुत्व विचारधारा असणारं सरकार आहे. त्यामुळं चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकांनी समोर येऊन त्यांची बाजू स्पष्ट करावी. अन्यथा चित्रपट चालू देणार नाही,” असे राम कदम यांनी ट्विट केले होते. त्यावर आता पुष्करने एका मुलाखतीत सणसणीत उत्तर दिले आहे.

या मुलाखतीत पुष्कर म्हणाला, 'कोव्हिड नंतर प्रेक्षक हे चित्रपटगृहात येत नाही. एक निर्माता दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून मला याची धास्ती आहे. प्रेक्षकांची चित्रपटगृहात यावं आणि पूर्वीसारखं चित्रपटाचा आनंद घ्यावा यासाठी मी काय करायला हवं याचा विचार मी कायम करत असतो. कोणत्याही एका क्षुल्लक कारणावरुन कपड्याचा रंग हा असावा की तो असावा हा प्रश्न किती किरकोळ आहे. त्या गाण्यात दीपिका पदुकोणने अनेक रंगाचे कपडे घातले आहेत. सोनेरी, पिवळा, निळा, सप्तरंगी असे रंग घातलेत. त्यामुळे रंगावर प्रत्येक पक्षाचा किंवा धर्माचा हक्क असू शकत नाही.

''त्यापेक्षा लोकांना चित्रपटगृहात आणण्यासाठी तुम्ही सर्वांनी आम्हाला मदत करायला हवी. राम कदम असू दे किंवा आणखी कोणी राजकीय नेतेमंडळी, पक्षातील लोकांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली आहे. पण यापुढेही करायला हवी की लोकांनी चित्रपटगृहात यायला हवं. चित्रपट हे चित्रपटगृहात बघायला हवं, यासाठी आम्हाला मार्गदर्शन, मदत, पाठिंबा, प्रेम हे तुमच्याच कडून मिळायला हवं. कारण बॉयकॉट करणं हे चुकीचं आहे. आम्हाला त्याची फार भीती वाटते. आम्ही धास्तावलो आहेत. आमचे पैसे पणाला लागलेले असतात. निर्माते घरं गहाण टाकून चित्रपट बनवतात. या सर्वांना तुम्ही एका रंगासाठी बॉयकॉट करुन चित्रपट पाहू नका हे सांगणं चुकीचं आहे.''

''राम कदम सर तुम्ही संत महात्मांना पाठिंबा देताय ही चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही हे गाणं पाहिलं असेल त्यात तिने विविध रंगाचे कपडे घातलेत. या एका रंगावर माझा हक्क आहे आणि हा रंग त्यांचा आहे असं आपण म्हणू शकत नाही. जर बॉयकॉट करायचा नसेल तर तुम्ही इथे जाहीरपणे सांगा की चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहा, जर तो तुम्हाला आवडला तर ते जाहीरपणे सांगा. तसेच जर नाही आवडला तर तुम्ही ते वाईट आहे तो बघायला जाऊ नका, असे देखील दुपटीने सांगा. पण तुम्ही चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहा, असं जाहीरपणे का सांगत नाहीत?''

''सोशल मीडियावर सतत चर्चेत राहण्यासाठी या गोष्टी केल्या जात आहेत. कंपनीकडून २ जीबीचा डेटा मला फुकट मिळतोय. त्यामुळे मी लेखक, दिग्दर्शक आणि न्यायधीश झालोय, मी सांगतो म्हणून हे बॉयकॉट करा असं म्हणण्याचा अधिकार कोणालाही नाही”, अशा शब्दात पुष्करने राम कदम यांचा समाचार घेतला आहे.