
आर. माधवनच्या मुलाचं देशासाठी स्वप्न; वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान!
बॉलिवूडमधील अनेक स्टारकिड्स आपल्या आईवडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत अभिनयक्षेत्रात पदार्पण करत आहेत. काही पदार्पण करण्याच्या तयारीत आहेत. तर असेही काही स्टारकिड्स आहेत, ते अभिनयाशिवाय वेगळ्याच क्षेत्रात कर्तृत्व गाजवत आहेत. अभिनेता आर. माधवनचा (R Madhavan) मुलगा वेदांतने (Vedaant) स्विमिंगमधील अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावलंय. ऑक्टोबरमधील ज्युनियर नॅशनल अॅक्वाटिक चॅम्पियनशिप २०२१ यासह अनेक पदकं जिंकून १६ वर्षीय वेदांतने आपलं नाव कमावलंय. इथेच न थांबता भविष्यात ऑलिम्पिक स्पर्धेत देशासाठी पदक जिंकण्याचं त्याचं स्वप्न आहे. याविषयी तो नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाला.
'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत वेदांत पोहण्याच्या आवडीविषयी म्हणाला, "लहानपणापासून मला पोहण्याची आवड आहे. या आवडीमुळेच शाळेत मी जलतरण संघात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या संघातून मी विविध स्पर्धेत भाग घेऊ लागलो. गेल्या चार वर्षांपासून मी विविध जलतरण स्पर्धांमध्ये भाग घेतोय." वडील माधवन यांच्याकडून कामासाठी असलेली समर्पणाची भावना शिकल्याचं त्याने सांगितलं. "मला वडिलांच्या कामाची पद्धत खूप आवडते. प्रत्येक काम ते खूप मनापासून करतात आणि तीच सवय मलासुद्धा आहे. त्यांना अभिनयात जशी आवड आहे, तशी मला पोहण्यात आहे. ते माझे प्रेरणास्थान आहेत", असं तो पुढे म्हणाला. आपल्या स्वप्नाविषयी त्याने सांगितलं, "सध्या ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकण्याचं माझं स्वप्न आहे. त्या ध्येयासाठी मी रोज काम करतोय आणि माझ्या मनात सध्या ती एकच गोष्ट आहे."
हेही वाचा: बिग बॉस मराठी ३: मीनल शाह ठरली ग्रँड फिनालेमध्ये जाणारी पहिली स्पर्धक?
बेंगळुरूमध्ये पार पडलेल्या ४७व्या ज्युनिअर नॅशनल अॅक्वेटिक चॅम्पियनशिपमध्ये त्याने सातवं पदक जिंकलं होतं. वेदांतने आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये ४ रौप्य आणि ३ कांस्य पदक जिंकले आहेत. त्याच्या या यशावर नेटकऱ्यांकडून भरभरून कौतुक होत आहे. स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये वेदांतने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतं. आर. माधवनने हिंदी, तमिळ, कन्नड, तेलुगू आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 'थ्री इडियट्स', 'रंग दे बसंती', '१३ बी', 'तनू वेड्स मनू', 'गुरू', 'रहना है तेरे दिल मे', 'झिरो' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. माधवन लवकरच 'रॉकेटरी : द नंबी इफेक्ट' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Web Title: R Madhavans Son Vedaants Dream For India You Will Feel Proud Of Him
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..