'बाबुमोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिये'; राजेश खन्ना यांच्या जन्मदिनानिमित्त जाणून घ्या त्यांचा प्रवास

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 December 2020

1969 मध्ये आलेली फिल्म आराधनाने राजेश खन्ना यांना अमाप प्रसिद्धी दिली आणि बघता बघता ते तरुणांच्या गळ्यातले ताईत बनले.

नवी दिल्ली : बॉलिवूडमध्ये राजेश खन्ना यांचं नाव जेंव्हाही घेतलं जातं तेंव्हा डोक्यात एका अशा सुपरस्टारची प्रतिमा निर्माण होते ज्याने आपलं आयुष्य फक्त आपल्या अटींवर जगलं आहे. ज्याने हिंदी सिनेमाला मोठ्या काळासाठी सुपरहिट चित्रपटांची मेजवानी दिली. देवानंद यांच्यानंतर बॉलिवूडमध्ये जर कुणी सलग हिट फिल्म्स दिल्या असतील तर ते राजेश खन्ना यांनीच.

राजेश खन्ना यांच्याबाबतचे किस्से तर अगदी प्रसिद्ध आहेत. असं म्हणतात की जेंव्हा राजेश खन्ना आपल्या शैलीमध्ये पापण्या मिटायचे तेंव्हा थिएटर्समध्ये मुली घायाळ व्हायच्या. तरुणी त्यांच्या कारवरची धुळ आपल्या भांगेमध्ये भरायच्या. त्यांची लोकप्रियता इतकी होती की लोक वेडे व्हायचे. एका सुपरस्टारला ज्याप्रकारे वेडेपणा अपेक्षित असतो तो सगळा राजेश खन्ना यांना आपल्या चाहत्यांकडून मिळाला.  29 डिसेंबर 1942 रोजी अमृतसरमध्ये त्यांचा जन्म झाला. जतिन खन्ना हे त्यांचं मूळ नाव होतं. मात्र चित्रनगरीत ते राजेश खन्ना नावाने प्रसिद्धीस पावले. सुरवातीला त्यांना अपयश आलं मात्र त्यानंतर त्यांच्या यशाची घौडदौड तुफान वेगाने सुरु राहिली. 

हेही वाचा - Look Back 2020: टॉप 10 इंडियन वेब सीरिज, तुम्ही पाहिल्यात का?

1969 मध्ये आलेली फिल्म आराधनाने राजेश खन्ना यांना अमाप प्रसिद्धी दिली आणि बघता बघता ते तरुणांच्या गळ्यातले ताईत बनले. या चित्रपटात शर्मिला टागोर यांच्यासोबत त्यांची जोडी खूपच गाजली. आराधना नंतर त्यांचं नशीब चमकलं आणि त्यानंतर पुढील चार वर्षांपर्यंत त्यांनी सलग 15 सुपरहिट चित्रपट दिले. 1970 मध्ये बनलेली फिल्म सच्चा झूठाने त्यांना पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी फिल्मफेअर अवार्ड मिळाला. 1971 हे वर्ष राजेश खन्ना यांच्यासाठी करिअरमधील सर्वांत अविस्मरणीय वर्ष राहिलं. यावर्षी त्यांनी कटी पतंग, आनंद, आन मिलो सजना, महबूब की मेहंदी, हाथी मेरे साथी आणि अंदाज यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले. दो रास्त, दुश्मन, बावर्ची, मेरे जीवन साथी, जोरु का गुलाम, अनुराग, दाग, नमक हराम आणि हमशक्ल यांसारख्या हिट चित्रपटांच्या द्वारे त्यांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 

राजेश खन्ना यांनी आपल्या कारकिर्दित अनेक अभिनेत्रींसोबत चित्रपट केले आहेत. मात्र शर्मिला टागोर आणि मुमताज यांच्या सोबत त्यांची जोडी खासकरुन लोकप्रिय ठरली. त्यांनी शर्मिला टागोर यांच्यासोबत आराधना, सफर, बदनाम, फरिश्ते, छोटी बहु, अमर प्रेम, राजा रानी आणि आविष्कार या चित्रपटात काम केले. तर दो रास्ते, बंधन, सच्चा झूठा, दुश्मन, अपना देश, आपकी कसम, रोटी आणि प्रेम कहानी मध्ये त्यांनी मुमताज यांच्या सोबत काम केलं.  राजेश खन्ना यांनी 1973 मध्ये त्यांच्याहून वयाने खूप लहान असणाऱ्या नवोदित अभिनेत्री डिम्पल कपाडिया यांच्यासोबत विवाह केला आणि त्यांना ट्विंकल आणि रिंकी या दोन मुली झाल्या.  राजेश खन्ना आणि डिम्पल यांचं वैवाहिक आयुष्य जास्त दिवस टिकू  शकलं नाही. काही दिवसांनी ते विलग झाले. राजेश खन्ना यांचं फिल्मी करिअर 80 च्या दशकात उतारास लागलं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 1991 ते 1996 दरम्यान नवी दिल्लीमधून ते काँग्रेसचे खासदार राहिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajesh kahnna birth anniversary know the life span of rajesh khanna kaka