Chhalaang Poster : 'मोठी उडी घेण्यासाठी, झोपेची गरज आहे' बघा काय म्हणतोय राजकुमार राव !

वृत्तसंस्था
Friday, 24 January 2020

Chhalaang Poster : राजकुमार रावचा नवा चित्रपट प्रेक्षकांना भेटायला येत आहे. 'छलांग' असं त्या चित्रपटाचं नाव असून त्याचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 

मुंबई : नव्या वर्षाला सुरुवात झाल्यापासून प्रेक्षकांना वेगवेगळ्या चित्रपटांच्या मनोरंजनाची मेजवानी मिळत आहे. विविध चित्रपटांची शर्यत सुरु आहे आणि त्यामध्ये बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरण्यासाठी प्रयत्नही करत आहेत. तान्हाजीची आता 200 कोटींकडे वाटचाल सुरु आहे. दरम्य़ान राजकुमार रावचा नवा चित्रपट प्रेक्षकांना भेटायला येत आहे. 'छलांग' असं त्या चित्रपटाचं नाव असून त्याचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 

राजकुमार राव नेहमीच चौकटी बाहेरच्या भूमिका साकारताना दिसतो. अगदी गंभीर विषयांवर आधारीत असणाऱ्या सिनेमाला कॉमेडीची झलक असते. सहज आणि सोप्या पद्धतीने तो अभिनय साकारतो. राजकुमार त्याच्या आगामी चित्रपटातून अशीच एक वेगळी भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याचा पोस्टर मजेशीर आहे ज्यामध्ये राजकुमार राव फुटबॉलसोबत निवांत झोपताना दिसतो आहे. आजुबाजुला शाळेतील मुलांचा घोळका त्याला पाहतो आहे. तर, अभिनेत्री नुशरत भरुचा त्याच्याकडे रागाने पाहत आहे. या पोस्टरला कॅप्शन देताना राजकुमारने लिहिलं आहे, ''मोठी उडी घेण्यासाठी, जास्त झोपेचीही गरज आहे''. 

'लंबी छलांग के लिए, लंबी नींद जरूरी'
हा चित्रपट एक मजेशीर आणि कॉमेडी आणि तरीही महत्त्वपूर्ण मेसेज देणारा आहे. सिनेमा 'छलांग' हा एका पी.टी. शिकवणाऱ्या शिक्षकावर आधारीत आहे. मजेशीर पण प्रेरणादायी अशी त्याची कथा असणार आहे. उत्तर भारतात एका सरकारी शाळेत पी.टी. टीचर मोंटू (राजकुमार) शिकवत असतो. मोंटूसाठी त्याची नोकरी हेच त्याचं आयुष्य आहे. पण, त्याच्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात ज्यामुळे त्याला सर्वकाही पणाला लावून स्वत: ला सिद्ध करावे लागते. त्यातून तो अनोखी कामगिरी करतो ज्याचा कोणी विचारही केला नसेल. 

राजकुमार राव यामध्ये मोंटू या व्यक्तीरेखेत दिसणार आहे तर, अभिनेत्री नुशरत भरुंचा नीलू या भूमिकेत दिसणार आहे. नीलू मोंटूची प्रेयसी आहे. तर, मोहम्मद जीशान अयूब हा या चित्रपटामध्ये एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. हंसल मेहता या चित्रपटाचं दिग्दर्शन करीत असून 13 मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajkumar raos upcoming movie Chhalaang movie poster