बॉलिवुडमध्ये 'KGF 2' कुणालाही आवडला नाही.. राम गोपाल वर्मांचे वादग्रस्त विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ram Gopal Varma says no one from Bollywood liked KGF Chapter 2

बॉलिवुडमध्ये 'KGF 2' कुणालाही आवडला नाही.. राम गोपाल वर्मांचे वादग्रस्त विधान

ram gopal varma : बॉलीवुड मधील एक दिग्गज दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे कायमच चर्चेत असणारं व्यक्तिमत्व आहे. आपल्या बोलण्यामुळे निर्माण होणारा वाद आणि त्याची चर्चा हे त्यांना विशेष आवडत असल्याचे दिसून आले आहे. दर काही दिवसांनी त्यांची वादग्रस्त विधाने समोर येत असतात. कधी मनोरंजन विश्वावर तर कधी राजकीय विश्वावर तर टीका करत असतात. आता तर त्यांनी आपला मोर्चा चक्क दाक्षिणात्य चित्रपटाकडे वळवला आहे. ज्या चित्रपटाने जगाला वेड लावलं अशा केजीएफ २ (KGF Chapter 2)या चित्रपटावर त्यांनी सडकून टीका केली आहे.

प्रशांत नील दिग्दर्शित आणि दाक्षिणात्य अभिनेता यश याचा दमदार अभिनय असलेला केजीफ-२ हा चित्रपट भरपूर गाजला. १४ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले. केवळ भारतातच नाही तर परदेशातही या चित्रपटाला विशेष पसंती मिळाली. पण चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी या चित्रपटाबाबत वादग्रस्त विधान केले आहे.

एका मुलाखतीत ते म्हणाले की, 'बॉलिवुडमधील कोणालाही 'केजीएफ २' हा चित्रपट आवडला नाही. तरीही त्याला इतकं यश का मिळालं हा मोठा संभ्रमच आहे. बॉलिवुडच्या एका मोठ्या दिग्दर्शकाने मला सांगितले की, रामू, मी हा चित्रपट ५ वेळा पाहण्याचा प्रयत्न केला पण मी अर्ध्या तासाच्या पुढे तो पाहू शकलो नाही. अत्यंत तर्क हीन असा हा चित्रपट आहे. पण हॉलीवूडमध्ये एक ओळ आहे, ‘तुम्ही आशयाशी वाद घालू शकता, पण यशाशी वाद घालू शकत नाही’! म्हणूनच, तुम्हाला चित्रपट आवडो किंवा न आवडो तुम्ही त्याच्या यशाकडे दुर्लक्ष करू शकत नाही,'

पुढे ते म्हणाले, ' KGF 2 हा अमिताभ बच्चन यांच्या ७० च्या दशकातील अॅक्शन चित्रपटांसारखा वाटत आहे. मला चित्रपट आवडला नाही असे नाही पण मला त्याचे वर्णन करण्यासाठी योग्य शब्द मिळत नाहीय. फक्त हा चित्रपट पाहताना मी प्रचंड अस्वस्थ होतो, बस्स.. एका चित्रपट निर्मात्याने तर अभिनेता यशला 'भूत' म्हटले आहे जे बॉलिवुडवर घिरट्या घालत आहे. ' त्यांच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. 'KGF 2' हा केवळ आतापर्यंतचा सर्वात मोठा कन्नड चित्रपट नाही तर तो २०२२ मधील सर्वात मोठा भारतीय चित्रपट देखील आहे. या चित्रपटाने जगभरात ११०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

Web Title: Ram Gopal Varma Says No One From Bollywood Liked Kgf Chapter 2

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..