esakal | 'रामायणा'त रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचं निधन
sakal

बोलून बातमी शोधा

'रामायणा'त रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचं निधन

'रामायणा'त रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचं निधन

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिका रामायणमधील (Ramayan) रावणाची (Raavan) भूमिका साकारणारे कलाकार अरविंद त्रिवेदी () यांचं मंगळवारी रात्री निधन झालं. त्यांचं वय 83 वर्षे होतं. ते गेल्या काही काळापासून आजारी होते. रामानंद सागर यांच्या रामायण (Ramanand Sagar mythological show 'Ramayan') या मालिकेने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. (Arvind Trivedi Who-Played Role Of Ravana In Ramayana Passes Away At 83 Years)

अरविंद त्रिवेदी यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनी या मृत्यूच्या बातमीला पुष्टी देत म्हटलं की, मंगळवारी (5 ऑक्टोबर) रात्री 10 वाजल्याच्या सुमारास त्यांचं निधन झालं आहे. त्यांनी म्हटलंय की, काका, गेल्या काही वर्षांपासून सातत्याने आजारपणातून जात होते. गेल्या तीन वर्षांपासून त्यांची तब्येत आणखीनच खालावली होती. त्यांना दोन-तीन वेळा दवाखान्यात देखील दाखल करण्यात आलं होतं. एका महिन्यापूर्वीच ते दवाखान्यातून परतले होते. मंगळवारी रात्री त्यांना हृदयरोगाचा झटका आला आणि त्यांनी कांदिवलीतील आपल्या घरी अखेरचा श्वास घेतला.

मेमध्ये पसरली होती मृत्यूची अफवा

यावर्षीच मे महिन्यात अरविंद त्रिवेदी यांचं निधन झाल्याची अफवा पसरली होती. मात्र, या अफवेचं खंडन रामायणमध्ये लक्ष्मणची भूमिका निभावणाऱ्या सुनील लहरी यांनी केलं होतं. त्यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती.

अरविंद त्रिवेदी यांनी रामानंद सागर यांच्याद्वारे निर्मित केलेली रामायण मालिकेत रावणाची अविस्मरणीय अशी भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेल्या रावणाला पाहून त्याकाळी लोक घाबरायचे. त्यांची नजर भेदक होती तसेच रावणाच्या प्रतिमेला आवश्यक गुण त्यांच्या भूमिकेतून हुबेहुब उतरायचे. आजही अनेक लोकांच्या मनात रावणाची हीच प्रतिमा डोळ्यांसमोर असणं, हे त्यांनी यशस्वीरित्या भूमिका पार पाडल्याचे द्योतक आहे.

अरविंद त्रिवेदी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1938 मध्ये मध्यप्रदेशातील इंदौरमध्ये झाला होता. त्यांचा अभिनयातील प्रवास गुजराती रंगमंचावरुन सुरु झाला होता. त्यांचे भाऊ उपेंद्र त्रिवेदी गुजराती सिनेमातील एक प्रसिद्ध नाव आहे. रामायणमध्ये भूमिका साकारुन प्रत्येक घराघरात पोहोचलेले अरविंद त्रिवेदी यांनी इतरही अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. त्यांनी जवळपास 300 हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.

loading image
go to top