Sourav Ganguly Biopic: रणबीर कपूर साकारणार दादाची भूमिका; लवकरच शूटिंगला सुरूवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ranbir kapoor and sourav ganguly

Sourav Ganguly Biopic: रणबीर कपूर साकारणार दादाची भूमिका; लवकरच शूटिंगला सुरूवात

इंडियन क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीच्या बायोपिकची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. एमएस धोनी, सचिन तेंडुलकर यांसारख्या दिग्गज खेळाडूंनंतर आता बॉलीवूड भारतीय क्रिकेट संघाचा 'दादा' म्हणजेच सौरव गांगुलीचा बायोपिक चित्रपट बनणार आहे.

यामध्ये सौरवच्या भूमिकेसाठी हृतिक रोशनपासून सिद्धार्थ मल्होत्रापर्यंत बऱ्याच अभिनेत्यांच्या नावाची चर्चा झाली. संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीवर बायोपिक बनवण्याची घोषणा खूप आधी झाली होती.

लव फिल्म्सच्या बॅनरखाली बनत असलेल्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टला सौरव गांगुलीने मंजुरी दिली आहे. स्क्रिप्ट फायनल झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की मोठ्या पडद्यावर कोणता बॉलिवूड अभिनेता 'दादा'ची भूमिका साकारणार आहे?

आता दादाच्या भूमिकेसाठी एका सुपरहिट अभिनेत्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या बायोपिकच्या शूटिंगलाही लवकरच सुरुवात होणार आहे. निर्मात्यांनी अद्याप अधिकृतरित्या त्या अभिनेत्याची घोषणा केली नाही.

अलीकडेच स्क्रिप्ट फायनल करण्यासाठी मुंबईत आलेल्या सौरव गांगुलीने त्याच्या बायोपिकच्या कथेवर शिक्कामोर्तब केले आहे. यानंतर आता 'दादा'च्या जीवनावर बनत असलेल्या या चित्रपटाचे शूटिंग कोलकाता येथे लवकरच सुरू होणार असल्याची बातमी आहे. आता स्क्रिप्ट फायनल झाल्यानंतर ऑनस्क्रीन सौरव कोण होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रिपोर्ट्सनुसार, हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून रणबीर कपूर असल्याचं समजतंय. सौरव गांगुलीच्या बायोपिकसाठी रणबीरचं नाव कन्फर्म असल्याचं म्हटलं जातंय. सौरव गांगुलीच्या जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, 'बायोपिकसाठी रणबीर कपूरचे नाव निश्चित झाले असून तो सौरव गांगुलीची ऑनस्क्रीन भूमिका साकारणार आहे.'

याशिवाय चित्रपटाच्या शूटिंग शेड्यूलबाबतही मोठी बातमी समोर येत आहे. असे म्हटले जात आहे की सौरव गांगुलीने स्क्रिप्ट मंजूर केल्यानंतर, बायोपिकचे शूटिंग कोलकातामध्ये लवकरच सुरू होईल. या चित्रपटाचे बजेट जवळपास 250 कोटी रुपये असेल. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रणबीर सध्या त्याच्या आगामी 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.