esakal | रणधीर कपूर यांना ICU मध्ये हलवलं

बोलून बातमी शोधा

Randhir Kapoor

रणधीर कपूर यांना ICU मध्ये हलवलं

sakal_logo
By
स्वाती वेमूल

ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण झाली असून गुरुवारी त्यांना मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर आता रणधीर कपूर यांना अतिदक्षता विभागात (ICU) हलवण्यात आलं आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांच्या कोव्हिडसंबंधित आणखी काही चाचण्या करण्यात येणार आहेत. रणधीर कपूर यांच्यासोबतच त्यांच्या काही स्टाफलाही कोरोनाची लागण झाली आहे. सुदैवाने त्यांची पत्नी आणि अभिनेत्री बबिता कपूर, मुली करिश्मा आणि करीना कपूर यांना कोरोनाची लागण झाली नाही.

"मला कोरोनाची लागण कशी झाली याची मला काहीच कल्पना नाही. मलासुद्धा आश्चर्याचा धक्का बसला आहे. माझ्या पाच कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनासुद्धा कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे", अशी माहिती स्वत: रणधीर कपूर यांनी 'ई टाइम्स'शी बोलताना दिली होती. रणधीर यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतले होते. थंडी आणि ताप आल्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. योग्य उपचार मिळावेत यासाठी ते रुग्णालयात दाखल झाले आणि आता त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं आहे.

रणधीर कपूर हे ७४ वर्षांचे आहेत. त्यांनी 'श्री 420' या चित्रपटातून एक बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. कल आज और कल, जवानी दिवानी, रामपूर का लक्ष्मण आणि चाचा भतीजा चित्रपटातील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.