RHTDM 21 Years: असं काय झालं की 'मॅडी- रिना' पुन्हा एकत्र दिसलेच नाहीत? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RHTDM 21 Years: असं काय झालं की 'मॅडी- रिना' पुन्हा एकत्र दिसलेच नाहीत?

RHTDM 21 Years: असं काय झालं की 'मॅडी- रिना' पुन्हा एकत्र दिसलेच नाहीत?

RHTDM movie 21 years: प्रसिद्ध अभिनेता आर माधवन, सैफ अली खान आणि अभिनेत्री दीया मिर्झा यांचा रहना है तेरे दिल में आजही लाखो तरुणांच्या मनातील चित्रपट आहे. आज या चित्रपटाला 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटातील गाणी, संवाद, कलाकारांच्या भूमिका हे सारं प्रेक्षकांना कमालीचे भावले. इतक्या वर्षानंतरही हा चित्रपट नेहमीच वेगवेगळ्या कारणास्तव चर्चेत असतो. दीया मिर्झाला एक वेगळी ओळख या चित्रपटानं मिळवून दिली. त्यानंतर तिच्या वाट्याला कित्येक नवनवे प्रोजेक्ट आले. माधवन आणि सैफची जोडीही प्रेक्षकांना वेड लावून गेली.

मॅडी आणि रिनाच्या त्या अनोख्या लवस्टोरीनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. प्रेक्षकांना एका गोष्टीचे कायम विशेष वाटत राहिले. ते म्हणजे रहना है तेरे दिल में नंतर मॅडी आणि रिना हे पुन्हा कधी एकत्र दिसले नाहीत. त्यामागील कारण तितकेच भन्नाट होते. आरएचडीटीएम ( Rehnaa Hai Terre Dil Mein) ला 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या कलावंतांनी सोशल मीडियावरुन पोस्ट केल्या आहेत. त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. 19 ऑक्टोबर 2001 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

सच कह रहा है दिवाना, जरा जरा महकता है.... सारख्या गाण्यांनी तरुणाईला वेड लावले होते. दिग्दर्शक गौतम वासुदेव मेनन यांनी या चित्रपटासाठी दहा पेक्षा अधिक गाणी रेकॉर्ड केली होती. मात्र त्यापैकी सात गाण्यांना त्यांनी चित्रपटात स्थान दिले. ती सातही गाणी कमालीची लोकप्रिय झाली. तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण रहना है तेरे दिल में हा काही ओरिजनल हिंदी चित्रपट नाही तर तो लोकप्रिय तमिळ चित्रपट मिन्नेलचा रिमेक आहे. मात्र मुळ चित्रपटाचे दिग्दर्शक देखील गौतम वासुदेव मेनन हेच होते. साऊथ मधील चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्यानंतर त्यांनी हिंदीमध्ये रिमेक करण्याचा निर्णय घेतला.

या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसलेल्या आर माधवन आणि दीया मिर्झा हे पुन्हा कोणत्याच चित्रपटात दिसले नाही. अभिनेत्रीनं दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, आम्हाला पण पुन्हा एकत्रित काम करण्यासाठी योग्य अशी स्क्रिप्ट पुन्हा आलीच नाही. असं नाही की, या चित्रपटाचा रिमेक तयार करण्याचा विचार निर्मात्यांनी केला नाही. मात्र मॅडी आणि माझा एकत्रित काम करण्याचा योग काही जुळून आला नाही. आमच्यातील संवाद हा नेहमीच एक वेगळाच मुद्दा होता. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तेवढ्या प्रभावीपणे समोर येत नव्हत्या. हेही सांगावे लागेल.