शाहीर साबळेंच्या नातवाचा ‘लगी तो छगी’

lagi to chagi
lagi to chagi

पद्मश्री शाहीर साबळे यांचे नातू शिवदर्शन साबळे अर्थात शिबू साबळे याने ‘लगी तो छगी’ चित्रपट आणलेला आहे. आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे त्याने आपले दिग्दर्शकीय कौशल्य दाखविले होते. त्यामुळे साहजिकच त्याच्या या चित्रपटाबद्दल उत्सुकता होती. 

हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असला, तरी त्याला कॉमेडीची फोडणीही देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटात अस्सल नमुनेदार अशी कॅरेक्‍टर्स आहेत आणि त्यांच्या नाना तऱ्हा आहेत. आलाप सहस्रबुद्धे (अभिजित साटम) हा पुण्यातून मुंबईत बिझनेस करण्यासाठी येतो. गाड्यांचे शो रूम उघडण्याचे त्याचे स्वप्न असते. येथे आल्यानंतर तो त्याचा सरदार मित्र बंटी (रवींद्रसिंग बक्षी) सोबत राहत असतो. एका ठिकाणी तो वेटरचे काम करीत असतो. त्यातूनच आपण एके दिवशी मोठे होऊ अशी आशा तो बाळगून असतो. त्याचा सरदार मित्र हा बेटिंग करीत असतो. त्यामध्ये तो सतत हरत असतो. एके दिवशी गुंडाकडून पैसे घेऊन आलाप आणि त्याचा मित्र सरदार बेटिंग लावतात आणि त्यामध्ये सपशेल फसतात. त्यांच्या या संपूर्ण प्रवासात अधेमधे विविध प्रकारची कॅरेक्‍टर्स येत असतात. त्यामध्ये गुंड उगली शेट्टी (मिलिंद उके) असतो. अमली पदार्थाची तस्करी करणारा जॉनी (सागर आठल्येकर) असतो. या जॉनीचा खूप मोठा दरारा असतो. त्याला काही भ्रष्ट पोलिस अधिकारी मदत करीत असतात. त्यामुळे त्याचा धंदा जोरात सुरू असतो. बेटिंग चालविणारा पठाण (सुरेंद्र पाल), अमली पदार्थाचा व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध लढणारी पोलिस अधिकारी सुरभी म्हापसेकर (निकिता गिरीधर) अशी एकापाठोपाठ एक कॅरेक्‍टर्स येतात आणि कथानक पुढे सरकत जाते. 

खरे तर या चित्रपटाला शिबूने चांगली ट्रिटमेंट दिली आहे. त्याला कलाकारांच्या अभिनयाची चांगली दाद लाभलेली आहे. आलापच्या भूमिकेतील अभिजित साटम असो किंवा उंगलीभाई मिलिंद उके असो... सगळ्यांनी छान कामगिरी केली आहे. पठाणाच्या भूमिकेतील सुरेंद्र पाल नक्कीच भाव खाऊन गेले आहेत. त्यांनी आपल्या डोळ्यांतून त्या पठाणाचा दरारा आणि जरब व्यक्त केली आहे. योगेश सोमण, असित रेडीज, निकिता गिरीधर, शैला काणेकर अशा सगळ्याच कलाकारांनी आपापल्या वाट्याला आलेल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी छान.

खरे तर हा चित्रपट पाहत असताना प्रियदर्शन यांच्या ‘हेराफेरी’ किंवा ‘फिर हेराफेरी’ची आठवण करून देतो. परंतु येथे दिग्दर्शकाचा काहीसा गोंधळ दिसतो. कॅरेक्‍टर्स एस्टॅब्लिश करण्याच्या नादात कथेकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे, असेच जाणवते. धावपळ आणि पळापळीच्या नादात अन्य बाबींकडे दुर्लक्ष झाले आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध खिळवून ठेवतो खरा; परंतु नंतर गोंधळ उडतो. त्यातल्या त्यात गोव्यातील काही लोकेशन्स ठीकठाक. हा चित्रपट अधिकाधिक मनोरंजनात्मक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे खरा; परंतु ते प्रयत्न तोकडे पडले असेच म्हणावे लागेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com