'मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर' : आई आणि मुलाच्या भावनिक नात्याची कथा

संतोष भिंगार्डे
शनिवार, 16 मार्च 2019

झोपडपट्टीत राहणारी माणसे व मुले; तसेच त्यांचे भावविश्‍व आणि त्यांच्या समस्या चित्रपटात टिपण्यात आल्या आहेत. ही छोटी फिल्म आहे; पण बरेच काही सांगणारी आहे. मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देणारी आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांत बॉलिवूडमध्ये मनोरंजनाबरोबरच सामाजिक मुद्द्यांना हात घालणाऱ्या चित्रपटांची निर्मिती होत आहे. 'टॉयलेट-एक प्रेमकथा', 'पॅडमॅन', 'सुई धागा' असे काही चित्रपट आलेले आहेत. भविष्यातही काही येणार आहेत. 'प्यारे प्राईम मिनिस्टर' या चित्रपटातही सामाजिक समस्येला हात घालण्यात आला आहे.

स्वच्छता तसेच उघड्यावर शौचास जाणे किती धोकादायक ठरू शकते, महिलांसाठी हे किती गंभीर आहे, या प्रश्‍नांवर हा चित्रपट भाष्य करणारा आहे. खरे तर 'टॉयलेट-एक प्रेमकथा' या चित्रपटात हा मुद्दा मांडण्यात आला होता आणि हाही चित्रपट याच विषयावर आधारलेला आहे. परंतु, दोन्ही चित्रपटांची ट्रिटमेंट निराळी आहे. दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी कथानकाची मांडणी वेगळी केली आहे. आई आणि मुलाच्या भावनिक नात्याची कथा आहे.

आठ वर्षांचा कन्हैय्या (ओम कनोजिया) आपल्या आईसह (अंजली पाटील) एका झोपडपट्टीत राहत असतो. हजारोंची लोकसंख्या असलेल्या या झोपडपट्टीत एकही शौचालय नसते. त्यामुळे साहजिकच येथील मुले तसेच वयस्कर मंडळी झोपडपट्टीजवळील पाईमृप लाईनशेजारी उघड्यावर शौचालयास जातात. महिला रात्रीच्या अंधारात रेल्वे रुळाशेजारी शौचास जात असतात. एके दिवशी कन्नूच्या आईवर अर्थात सरगमवर अतिप्रसंग होतो. त्यामुळे कन्नूची आई अक्षरशः भेदरते आणि मनाने खचून जाते. त्याचवेळी कन्नू आपल्या आईसाठी शौचालय बांधण्याचे ठरवितो. त्याकरिता तो आपल्या मित्रमंडळींसमवेत पालिका कार्यालयात जातो.

झोपडपट्टी अनधिकृत असल्यामुळे प्रशासन येथे शौचालय बांधू शकत नाही. मग तो आपल्या मित्रांच्या साह्याने शौचालय बांधण्याचा प्रयत्न करतो; पण त्याचा तो प्रयत्न असफल ठरतो आणि मग तो पंतप्रधानांना एक पत्र लिहितो. ते पत्र देण्यासाठी तो थेट दिल्लीला जातो. पुढच्या प्रवासाने चित्रपटाची गोष्ट रंजक होत जाते. व्यवस्थेला जाब विचारते. 

राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी यापूर्वी चांगले चित्रपट दिले आहेत. 'रंग दे बसंती', 'भाग मिल्खा भाग' हे त्यांचे चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर यशस्वी ठरलेले आहेत. या चित्रपटाचाही आशय आणि विषय हटके आहे. एक आठ वर्षांचा मुलगा आपल्या आईच्या प्रेमापोटी तिला शौचालय बांधून देण्यासाठी कशी धडपड आणि कसे प्रयत्न करतो... याचे चित्रण या चित्रपटात असले तरी बलात्कार झालेल्या महिलेची मानसिक स्थिती काय असते... आपला समाज त्या महिलेकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो... तिला कोणत्या यातना सहन कराव्या लागतात, हेदेखील या चित्रपटात अधोरेखित करण्यात आले आहे. 

अंजली पाटील, मकरंद देशपांडे, अतुल कुलकर्णी, रसिका आगाशे; तसेच बालकलाकार ओम कनोजिया आदी सगळ्याच कलाकारांनी समरसून कामे केली आहेत. अंजली पाटीलने सरगमची भूमिका सहजसुंदर वठविली आहे. चित्रपटातील काही संवाद सरकारी यंत्रणेला चिमटे काढणारे आहेत. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी छान आहे. संगीत ठिकठाक. चित्रपटाचा पूर्वार्ध काहीसा संथ असला तरी उत्तरार्धात कथानक वेगाने पुढे सरकते.

झोपडपट्टीत राहणारी माणसे व मुले; तसेच त्यांचे भावविश्‍व आणि त्यांच्या समस्या चित्रपटात टिपण्यात आल्या आहेत. ही छोटी फिल्म आहे; पण बरेच काही सांगणारी आहे. मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देणारी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Review of Movie Mere Pyare Prime Minister