नवा चित्रपट : कलंक

मंदार कुलकर्णी
गुरुवार, 18 एप्रिल 2019

- दीपवून टाकणारी; पण न भिडणारी "कलंक'शोभा 
कलंक हा चित्रपट भव्य आहे, इंटेन्स आहे, नाट्यमय आहे, उत्कंठावर्धक.

दीपवून टाकणारी; पण न भिडणारी "कलंक'शोभा 
कलंक हा चित्रपट भव्य आहे, इंटेन्स आहे, नाट्यमय आहे, उत्कंठावर्धक आहे यात वादच नाही. अभिषेक वर्मन यानं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अप्रतिम चित्रचौकटी आहेत; रंग, प्रकाश, भावना यांचा विलक्षण खेळ आहे. पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत प्रत्येक गोष्ट अभिषेक वर्मननं भरजरी, राजवर्खी केलेली आहे, संजय लीला भन्साळीनंही तोंडात बोटं घालावीत असे अतिभव्य सेट्‌स आहेत; "दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', "त्रिशूल', "देवदास', "पाकिजा' अशा अनेक चित्रपटांमधल्या तुकड्यांची आठवण करून देणारी भव्यता आणि समरसता आहे; मल्टिस्टारकास्ट असला, तरी प्रत्येक कलाकारानं शंभर टक्के मेहनत घेतल्याचं जागोजागी दिसतं हेही खरं आहे...पण एवढं सगळं असलं, तरी हा अतिशय देखणा चित्रपट मनाला भिडत नाही.

तो डोळे दीपवून टाकतो; पण कुठंही मन उजळवून टाकत नाही. या चित्रपटातल्या भव्य सेट्‌ससारखाच एक "भव्य रटाळ'पणाही त्याला लाभला आहे आणि तर्काच्या कसोट्यांवर न पटणारा कथेचा डोलारा असल्यामुळं सेट्‌सची भव्यताही नंतर बेगडी वाटायला लागते. उगीचंच येणारी गाणी, कृत्रिम वाटणारे संवाद यांनीही अक्षरशः "कळस' गाठल्यामुळं "कलंक'नं शेवटी शोभाच करून घेतली असंच आपल्या मनात येतं. 

सत्या चौधरी (सोनाक्षी सिन्हा) कर्करोगामुळं मरणार आहे. त्यामुळं ती आपला पती देवचं (आदित्य रॉय कपूर) लग्न रूपशी (आलिया भट्ट) लावून देते. तिचे सासरे बलराज (संजय दत्त) यांचा या लग्नाला पाठिंबा आहे. लग्नानंतर देव रूपला "मी सत्याला विसरू शकणार नाही,' असं म्हणतो, त्यामुळं रूप निराश होते. त्याच वेळी हुस्नबाद शहरातल्या हिरामंडी या "बदनाम मुहल्ल्या'तून बहार बेगमचे (माधुरी दीक्षित) सूर रूपला ऐकू येतात. ती तिच्याकडं गाणं शिकायचा हट्ट धरते. तिथं जफर (वरुण धवन) हा तरुण लोहारकाम व्यावसायिक तिला भेटतो. त्यातून त्यांचं प्रेम जमतं आणि पुढं या सगळ्यांचीच एकमेकांत गुंफलेली आयुष्यं कशी वळणं घेत जातात याची ही कथा. 

"कलंक'ला एक इंटरेस्टिंग कथा मिळाली आहे हे खरं असलं, तरी ती कन्व्हिंसिंग नाही. हिंदू-मुस्लिम संघर्ष, फाळणीपासून यांत्रिकीकरणामुळं मनुष्यबळावर झालेले परिणाम, "नाजायज औलाद', स्त्रीचं स्वातंत्र्य असे बरेच प्रश्नही अभिषेकनं मांडले आहेत आणि त्याबद्दल कौतुकही करायला हवंच; पण तरीही हे सगळं कुठंही पटत नाही. वर्षानुवर्षांचे चित्रपटीय तर्क एकीकडं अनेक चित्रपटांनी फेकून दिलेले असताना हा चित्रपट पुन्हा त्याच तर्कांना धरू बघतो हीच मुळात या चित्रपटातली सर्वांत मोठी चूक वाटते. 

मुळात सत्या रूपचं लग्न स्वतःच्या पतीशी लावून देते तिथूनच प्रेक्षकांना प्रश्न पडायला लागतात आणि ते शेवटपर्यंत संपतच नाहीत. देव आणि बलराज यांचं एक दैनिक आहे. सत्या अचानकच रूपला तिथं काम करायला सांगते. देव आणि रूप यांचं लग्न झालेलं असूनही एकमेकांना ते ओळखत नाहीत. बहार बेगमकडं गाणं शिकायला गेलेली रूप अचानकच नृत्यच करायला लागते, जफर अचानकच रूपवर प्रेम करायला लागतो, देव अचानकच एका "प्रतिभेच्या अस्फुट क्षणी' सूटबूट बाजूला टाकून चक्क एका नदीकिनारी दारू प्यायला येतो, इतर सगळ्या गोष्टींची खडान्‌ खडा माहिती असणाऱ्या जफरला देवला ओळखता येत नाही असे किती तरी प्रश्न प्रेक्षकांना पडत राहतात.

एका वर्तमानपत्रातल्या एका लेखामुळं गावात लोखंडाची फॅक्‍टरी सुरू होणं किंवा लोहारकाम करणारे सगळे फक्त एकाच धर्माचे असणं वगैरे गोष्टीही पटत नाहीत. या सगळ्या गोष्टींमुळंच खरं तर "कलंक'मधलं आपलं मन उडून जातं. पडद्यावर दिसणारं नाट्य उत्तम, नेत्रसुखद आहे हे काही खोटं नाही; पण तरीही प्रेक्षक नेहमी पहिल्यांदा कथेशी सांधा जुळतोय का हे आधी बघतो आणि किमान त्यात शिरायला बघतो. इथं मात्र प्रेक्षकाला त्या विश्वात शिरावं वाटत नाही. कुठल्याही व्यक्तिरेखेच्या आत्म्याशी तादात्म्य जुळत नाही. रूपचं सुरवातीचं गाणं, जफरचं इंट्रॉडक्‍शनचं गाणं, रूप बहार बेगमकडं आलेली असताना "दशहरे का उत्सव' येणं वगैरे भाग कृत्रिम वाटत राहतात. 

अर्थात कथेचा पाया भुसभुशीत असला, तरी अभिषेकनं त्यावर बांधलेला महाल उत्तम आहे हेही मान्य करायला हवं. सगळ्या व्यक्तिरेखा एकमेकांमध्ये गुंफलेल्या असल्यामुळं वेगवेगळ्या पात्रांच्या एंट्री, एक्‍झिट्‌स, त्यांच्या पोझिशन्स फार महत्त्वाच्या आहेत. त्या दाद देण्यासारख्या आहेत. विशेषतः एक पात्र दिसत असताना दुसऱ्या पात्राला दिलेली पोझिशन प्रेक्षकांनी मुद्दाम आवर्जून बघावी. त्यात अतिशय कल्पकता आहे. जफर रूपला बघत असताना मागं राम आणि रावण यांच्या युद्धाचा केलेला उत्तम वापर, बहार बेगमच्या महालातून जफर पळत येत असताना छत्र्यांचा केलेला वापर, जफरची रेड्याशी स्पर्धा, मध्यंतरापूर्वीच्या सगळ्या पात्रांच्या एकेक रिऍक्‍शन्स अशा अनेक गोष्टी जबरदस्त आहेत. बहार बेगमच्या कोठ्यातले सगळेच प्रसंग उत्तम आहेत. क्‍लायमॅक्‍स थरारक आहे. मात्र, तरीही "देवदास' साधारण याच "टेक्‍स्चर'चाच चित्रपट होता, तोही असाच मेलोड्रॅमॅटिक होता हे खरं असलं, तरी तो किमान कन्व्हिंसिंग होता- "कलंक' त्यात कमी पडतो. 

आलिया भट्ट आणि वरुण धवनला खूप मोठं फूटेज मिळालं आहे. आलिया नेहमीसारखीच उत्तम आहे. तिचा सहजपणा काही वेळा थक्क करून टाकतो. वरुणला अनेक शेड्‌स दाखवायला मिळाल्या आहेत, मात्र लेखनात या व्यक्तिरेखेला काहीसं फाइन ट्युनिंग न केल्याचा फटका त्याला बसल्याचं जाणवतं. सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त ठीकठाक आहेत. आदित्य रॉय कपूरनं या सगळ्या मेलोड्रामाला छेद देणारा अंडरप्ले केला आहे. तो अभिनयसामर्थ्यामुळं आहे, की त्याला तेवढंच जमतं हे नक्की ठाऊक नसलं तरी त्याचा हा शांतपणा चित्रपटात भाव खाऊन जातो. माधुरी दीक्षितच्या वाट्याला पुन्हा एकदा "तवायफ'ची भूमिका आली आहे. तिनं देवदाससारखीच ती ग्रेसफुल पद्धतीनं साकारली आहे. "तबाह हो गये' हे गाणं तिच्या चाहत्यांना नक्की आवडेल. कुणाल खेमू छोट्या भूमिकेत उत्तम.
प्रीतम यांची काही गाणी चांगली आहेत. विशेषतः पार्श्वसंगीतामुळं हा सगळा भव्यपणा आणखी गडद होतो. विनोद प्रधान यांचं छायाचित्रण हे उच्च दर्जाचं आहे. चित्रपटाचं हे देखणेपण मोठ्या पडद्यावर बघितलं तरच त्याची मजा येईल. 
एकुणात, "कलंक' हा चित्रपट विंडो शॉपिंगसारखा आहे. काचेच्या पलीकडून एखादा ड्रेस आपल्याला अतिशय आवडतो; पण तो अंगात घातला, की एका धुलाईत विरणार हे लक्षात येतं.

"कलंक' तसाच आहे. बाहेरून हा ड्रेस भरजरी, देखणा, महागतम आहे; पण तो घालून बघितल्यावर हा ड्रेस विरून जाणार हे लक्षात येतं. "कलंक' असं चित्रपटाचं नाव आहे. तो नक्की कुणावर आहे असा प्रश्न पडतो, तेव्हा शेवटी त्याचं उत्तर एकच येतं.... ः भाबड्या प्रेक्षकांवर!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Review of New Movie Kalank