esakal | तुम्हाला माहितीये का, ऋषी कपूर स्वत:च्या लग्नात पडले होते बेशुद्ध

बोलून बातमी शोधा

Rishi Kapoor and Neetu Kapoor
तुम्हाला माहितीये का, ऋषी कपूर स्वत:च्या लग्नात पडले होते बेशुद्ध
sakal_logo
By
टीम ई सकाळ

दिवंगत बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर 'बॉबी' या चित्रपटानंतर प्रकाशझोतात आले होते. ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसोबतच ऑफस्क्रीन केमिस्ट्रीसुद्धा प्रेक्षकांना विशेष आवडली होती. या दोघांची पहिली भेट ही 'जहरीला इंसान' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. नीतू कपूर यांच्याआधी ऋषी कपूर दुसऱ्या तरुणीला डेट करत होते. तिच्यासोबत भांडण झाल्यानंतर तिचं मन जिंकण्यासाठी नीतू त्यांची मदत करत होत्या. मात्र चित्रपटाच्या शूटिंगनंतर ऋषी आणि नीतू यांच्यात जवळीक वाढली. नीतूच्या आठवणीत त्यांनी पत्रदेखील लिहिली होती. त्यानंतर 'खेल खेल' या चित्रपटासाठी हे दोघं पुन्हा एकदा एकत्र आले आणि या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं.

ऋषी कपूर यांचे वडील राज कपूर यांना रिलेशनशिपविषयी समजताच त्यांनी नीतूसोबत लग्न करण्याचा त्यांना सल्ला दिला. १९७९ मध्ये ऋषी कपूर आणि नीतू लग्नबंधनात अडकले. हा लग्नसोहळासुद्धा नीतू कपूर आणि उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला. कारण सोहळ्यात ऋषी कपूर यांना भोवळ आली होती. लग्नातील गर्दी पाहून त्यांना चक्कर आली असावी असं नंतर नीतू यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

ऋषी कपूर यांनी त्यांच्या प्रत्येक चित्रपटात स्वत:ची छाप पाडली. त्यांचा पडद्यावरील वावर अत्यंत आत्मविश्वासपूर्ण होता. सिनेमा हा औटघटका मनोरंजन करण्याचं साधन आहे, हे मानणाऱ्या अगणित सिनेप्रेमींचे ते लाडके होते. कर्करोगाशी वर्षभर झुंज दिल्यानंतर गेल्या वर्षी ३० एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.