हो, ऋषी कपूर भारतात येताहेत! तब्बल एक वर्षानंतर...

वृत्तसंस्था
Monday, 9 September 2019

ऋषी कपूर भारतात येण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. ते उद्या म्हणजे मंगळवारी पत्नी नीतू कपूरसोबत मुंबईत येणार आहेत.

मुंबई : बॉलिवू़ड अभिनेते ऋषी कपूर यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये ते कर्करोगावर उपचार घेण्यासाठी गेले होते. ऋषी कपूर भारतात येण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. ते उद्या म्हणजे मंगळवारी पत्नी नीतू कपूरसोबत मुंबईत येणार आहेत.

यावर ऋषी कपूर यांचे मित्र अभिनेता अनुपम खेर यांनी एक ट्विट आणि फोटो शेअर केले आहेत. ट्विट करताना त्यांनी लिहिलं," प्रिय, नीतू कपूर आणि ऋषी ! न्यूयॉर्कमध्ये जवळपास एक वर्ष राहिल्यानंतर तुम्ही परत येत आहात. तुमच्या प्रवासाकरीता शुभेच्छा. माझ्या मनात मिश्र प्रतिक्रिया आहेत. मी एकाचवेळी आनंदी आणि दु:खी पण आहे. तुझ्यासोबत मी चांगला वेळ घालवला आहे. मी तुम्हाला खूप मिस करणार आहे. प्रेम आणि प्रार्थना !"

न्यूयॉर्कमध्ये ऋषी त्यांच्या आजारावर उपचार घेत होते तर मुंबईत त्यांच्या आईचं कृष्णा राज कपूर यांचं 1 ऑक्टोबरला निधन झालं. आईच्या अंत्यसंस्कारालाही ते उपस्थित राहू शकले नव्हते. एका वर्षाच्या कालावधीत अनेक बॉलिवूड कलाकार ऋषी यांना भेटायला थेट न्यूयॉर्कला गेले होते. विचारपूस करण्यासोबतच त्यांच्यासोबत वेळदेखील घालवला. शाहरूख खान, विकी कौशल, मलायका अरोरा- अर्जुन कपूर, ऐश्वर्या- अभिषेक, रितेश देशमुख- जेनेलिया आणि राजकुमार राव असे अनेक कलाकार त्यांना भेट देऊन आले. 

एका वर्षात ऋषी यांनी अनेक ट्विट केले. कठीण काळात आधार दिल्याबद्दल नीतू यांचे अनेकदा आभार मानले. शिवाय भारतात लवकर पोहचून कामाला सुरुवात करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rishi Kapoor Neetu to Finally Return India, Anupam Kher Wishes Them Safe Trip