बिग बॉस १४: रुबिना दिलैकचा पती अभिनवसोबत यावर्षीच होणार होता घटस्फोट...

दिपाली राणे-म्हात्रे
Monday, 30 November 2020

अभिनेत्री रुबिना दिलैक आणि तिचा पती अभिनव शुक्ला यांच्यामुळे हा शो चर्चेत आला आहे. नुकताच रुबिनाने तिच्या आणि अभिनवच्या नात्याविषयी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

मुंबई- 'बिग बॉस' हा शो दरवेळी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. यंदाचा १४ वा सिझन देखील तसाच आहे. कोरोना व्हायरसच्या काळात लॉकडाऊनमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सुरु झालेला यंदाचा सिझन फारशी कमाल करत नव्हता. गेल्या सिझनसारखी या सिझनमध्ये मजा नाही असं प्रेक्षकांचं मत होतं. मात्र आता 'बिग बॉस'ने टॅगलाईनप्रमाणे 'सीन पलटेगा' असं दाखवून दिलंय. आतापर्यंत या सिझनमध्ये अनेक वादग्रस्त घटना घडल्याचं पाहायला मिळालं आहे. यावेळी मात्र अभिनेत्री रुबिना दिलैक आणि तिचा पती अभिनव शुक्ला यांच्यामुळे हा शो चर्चेत आला आहे. नुकताच रुबिनाने तिच्या आणि अभिनवच्या नात्याविषयी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

हे ही वाचा: अभिनेता सोनू सूद चाहत्याच्या शस्त्रक्रियेचा खर्च करत पुन्हा बनला देवदूत   

 ‘बिग बॉस' मध्ये पहिल्यांदाच रिअल लाईफमध्ये पती-पत्नी असलेल्या जोडीने सहभाग घेतला. त्यामुळे सध्या अभिनव आणि रुबिना या जोडीची सोशल मीडियावर भरपूर चर्चा आहे. रुबिनाचे किती चाहते आहेत हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. 'बिग बॉस'मध्ये सहभागी झालेली ही जोडी एकत्रंच खेळत होती मात्र आता अनेकदा त्यांच्यात खटके उडत असल्याचं दिसतंय. त्यामुळे ही जोडी चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरलीये. त्यातच आता रुबिनाने एका सिक्रेट टास्क दरम्यान अभिनवसोबतच्या नात्याविषयी धक्कादायक खुलासा केला असून 'बिग बॉस'मध्ये येण्यापूर्वी आम्ही घटस्फोट घेणार असून एकमेकांना शेवटची संधी दिली असल्याचा खुलासा केला आहे.

‘बिग बॉस’च्या आगामी भागात घरातील स्पर्धकांना त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं सिक्रेट प्रेक्षकांना सांगायचं आहे. या टास्कमध्येच रुबिना आणि अभिनवने 'बिग बॉस'मध्ये एकत्र येण्याचं कारण सांगितलं. हे सांगताना रुबिना म्हणाली, “एक वेळ अशी आली होती, जेव्हा मला अभिनवपासून घटस्फोट हवा होता. त्यामुळे आम्ही एकमेकांना नोव्हेंबरपर्यंत विचार करण्याचा वेळ दिला होता. याचदरम्यान आम्हाला 'बिग बॉस १४' ची ऑफर आली. या शोच्या निमित्ताने आम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवता येईल म्हणून आम्ही या शोची ऑफर स्वीकारली”, असं रुबिनाने सांगितलं आणि तिला रडू कोसळलं. विशेष म्हणजे रुबिनाला रडताना पाहून अभिनव देखील भावूक झाला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

रुबिनाचा हा खुलासा तिच्या लाखो चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. कारण आत्तापर्यंत रुबिना आणि अभिनव यांचा एकमेकांसोबतचा समजुतदारपणा प्रेक्षकांना या जोडीविषयी भूरळ घालत होता. अभिनव आणि रुबिना ही जोडी 'बिग बॉस'मध्ये येण्याआधीच त्यांच्या नात्याविषयी अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र सध्या दोघांमधील वाद मिटला असून त्यांनी त्यावर विचार केल्याची चर्चा आहे. 

rubina dilaik got emotional and said me and abhinav were heading towards divorce before bigg boss  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rubina dilaik got emotional and said me and abhinav were heading towards divorce before bigg boss