दिल, दोस्ती : ‘आवडीनिवडी समान’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rushi saxena and isha keskar

कोणत्याही नात्याची सुरुवात मैत्रीपासून होते. पुढे तो मैत्रीचा धागा घट्ट होत गेला, की ते नातंही खुलत जातं. ऋषी सॅक्सेना आणि ईशा केसकर यांच्याबाबतीतही असंच झालं.

दिल, दोस्ती : ‘आवडीनिवडी समान’

- ऋषी सॅक्सेना, ईशा केसकर

कोणत्याही नात्याची सुरुवात मैत्रीपासून होते. पुढे तो मैत्रीचा धागा घट्ट होत गेला, की ते नातंही खुलत जातं. ऋषी सॅक्सेना आणि ईशा केसकर यांच्याबाबतीतही असंच झालं. ते एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स आहेत. चार-पाच वर्षांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली होती. पहिल्या भेटीत त्यांच्यात अगदीच औपचारिक बोलणं झालं आणि हळूहळू ओळख वाढत घट्ट मैत्री होत गेली.

ऋषी म्हणाला, ‘‘माझा स्वभाव मितभाषी असल्याने मला खूप कमी मित्र-मैत्रिणी आहेत; पण माझ्याबद्दल सगळं काही माहीत असलेली माझी एकमेव मैत्रीण म्हणजे ईशा. तिला भेटण्यापूर्वी मी तिचं काम पाहिलं नव्हतं; पण तिच्याबद्दल खूप ऐकून होतो. माझ्या ओळखीचे अनेकजण म्हणायचे, की ‘जय मल्हार’ मालिकेत बानूची भूमिका सकारते, त्या मुलीचे डोळे खूप मस्त आहेत. ती अत्यंत दिलखुलास, मनमोकळी, गप्पिष्ट, सगळ्यांमध्ये पटकन मिसळणारी मुलगी आहे. ती कोणतीच गोष्ट मनात ठेवत नाही. एखादी गोष्ट पटली, आवडली किंवा नाही आवडली तर ती ते स्पष्टपणे सांगते.

कोणाशीही वागता बोलताना ती आडपडदा ठेवत नाही. ती अतिशय जिद्दी आहे. कधीच ती हार मनात नाही. जर कधी आमच्यात मतभेद झाले, तर ती तिचा मुद्दा मला पटवून देण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करत असते. मी खूप फुडी आहे हे मला तिच्यामुळे जाणवलं. ईशा कुठलाही पदार्थ उत्तम बनवते. मराठी पद्धतीचं जेवण मी सर्वांत पहिल्यांदा तिच्याच हातचं खाल्लं त्यामुळे आता तिच्या हातच्या चवीची मला सवय झाली आहे. मला चिकन आवडतं आणि ती एका विशिष्ट पद्धतीचं चिकन बनवते ते मला प्रचंड आवडतं. ती अभिनेत्री म्हणूनही तितकीच टॅलेंटेड आहे. तिच्या आगामी ‘लव सुलभ’ या चित्रपटात तिने साकारलेली भूमिका मला फार आवडली. आमच्या अशाच काही सारख्या आणि काही भिन्न आवडीनिवडी आणि स्वभावामुळे आमच्यातली मैत्री इतकी छान टिकून आहे.’

ईशाने सांगितले, ‘त्याची ‘काहे दिया परदेस’ मालिका मी अधूनमधून बघायचे. तेव्हा मला त्याचं खूप कौतुक वाटायचं. कारण एका अमराठी व्यक्तीने मराठी येत नसताना मराठी मालिकेत काम करणं हे त्याच्यासाठी किती आव्हानात्मक असेल हे मी समजू शकत होते. प्रत्येकाशी आदराने वागणं, बोलणं, लोकांच्या मदतीला धावून जाणं, समोरच्याचा मान राखणं असा ऋषीचा स्वभाव आहे. कधीच तो कोणाचं मन दुखावत नाही. त्याच्यात कमालीचा संयम आहे. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो. आपल्याला एखादी मिळणार नाही, हे आपल्याला जमणार नाही या भावनेने तो कोणतंच काम करत नाही. त्याच्याकडून अशा अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत.

तो आधी रणजी, आयपीएल असे सामने तो खेळाला आहे. त्यामुळे वयाच्या दहाव्या वर्षांपासून तो डाएट पाळतो, नियमित प्राणायाम आणि व्यायाम करतो. त्याच्या संगतीत राहून मीही आता योग्य आहार घेऊ लागले आहे, व्यायाम करू लागले आहे. तो खूप मेहनती आहे. गेल्या काही वर्षात त्याने मराठी बोलण्यातही बरीच प्रगती केली आहे. मन लावून तो मराठीचा अभ्यास करतो. यात मीही त्याला मदत करते. व्याकरण, अंक, शब्द अशा अनेक गोष्टी शिकण्यासाठी मी त्याला मदत करत असते. कामाच्या बाबतीतही तो तितकाच मेहनती आहे. आमची काम करण्याची, विचार करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. त्याच्या पाठडीतली एखादी भूमिकाही तो तितकीच एकाग्रतेने साकारतो जितकी तो त्याच्यासाठी कठीण असलेली एखादी भूमिका साकारेल. त्याने साकारलेली ‘पावनखिंड’ चित्रपटातील भूमिका मला फार आवडली. विविध भारतीय तसेच परदेशी कलाकृती बघणं, वेगवेगळे पदार्थ खाणं, प्राणिप्रेम अशा आमच्या अनेक आवडीनिवडी सारख्या आहेत.’’

(शब्दांकन : राजसी वैद्य)

टॅग्स :Entertainment