बॉक्स ऑफिसवर 'साहो'चा धुमाकूळ!

वृत्तसंस्था
Saturday, 31 August 2019

एकीकडे चित्रपटाविषयी अनेक नकारात्मक रिव्ह्यु येत असतानाच दुसरीकडे 'साहो' ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. 

मुंबई : साऊथ सुपरस्टार प्रभासचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'साहो' शुक्रवारी प्रदर्शित झाला. आणि बॉक्स ऑफिसवर साहोने कल्ला करण्यास सुरूवात केली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'साहो' चे रिव्ह्यूविषयी उलटसुलट चर्चा ऐकायला मिळाल्या.

एकीकडे चित्रपटाविषयी अनेक नकारात्मक रिव्ह्यु येत असतानाच दुसरीकडे 'साहो' ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. 

जितकी चर्चा या सिनेमाची होती तितकीच चर्चा त्याला तयार करण्यासाठी लागलेल्या बजेटचीही होती. जवळपास 350 कोटी रुपयांचा खर्च या सिनेमावर करण्यात आला होता. 'साहो'ला हिंदी, तमिळ, मल्याळम आणि तेलुगू अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आलं असून तज्ज्ञांच्या मते चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली ओपनींग केली आहे.

हिंदीमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्य़ा 'साहो'ने पहिल्या दिवशी 10 कोटीचा गल्ला जमवेल असा अंदाज लावण्यात आला होता. मात्र, पहिल्या दिवशी या चित्रपटाने 24.40 कोटींचा गल्ला जमविला आहे. यावर्षी प्रदर्शित झालेल्या सलमानच्या 'भारत', अक्षय कुमारच्या 'मिशन मंगल' या चित्रपटांनंतर पहिल्या दिवशी जास्त कमाई करणारा 'साहो' हा तिसरा चित्रपट ठरला आहे. 

बाहुबलीच्या जबरदस्त यशानंतर प्रभासचं नाव आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींच्या यादीत पोहोचलं आहे. 'साहो'मध्ये प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्यासोबत नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी आणि चंकी पांडे ही मंडळीदेखील आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saaho movie first day collection on box office