सलमानचा 'राधे' ईदला प्रदर्शित होणार नाही

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

सलमानचा 'राधे' ईदला प्रदर्शित होणार नाही

मुंबई: आमीर खान, शाहरूख खान आणि सलमान खान यांचे चित्रपट दिवाळी, ईद किंवा ख्रिसमस अशा सणांच्या वेळीच प्रदर्शित होत असतात. शाहरूख खानचे बहुतेक चित्रपट दिवाळीत प्रदर्शित झालेले आहेत आणि सुट्टीच्या या हंगामाचा त्याला चांगलाच फायदा झाला आहे. दिवाळीत त्याचा प्रदर्शित झालेला दिलवाले, दुल्हनियां ले जायेंगे हा चित्रपट अजूनही मुंबईतील मराठा मंदिरला मॅटिनीला सुरू आहे. आमीर खानचे बहुतेक चित्रपट ख्रिसमसला प्रदर्शित झालेले आहेत तर आपला भाईजान अर्थात सलमान खानचे ईदला प्रदर्शित झालेले आहेत. सलमानचे चाहते ईदला त्याच्या चित्रपटाची वाट पाहात असतात.

यावर्षी कोरोनामुळे त्याच्या चाहत्यांची निराशा होणार आहे. त्याचा राधे हा चित्रपट ईदला म्हणजेच 22 मे रोजी प्रदर्शित करण्याचे निश्चित केले होते. तशी अधिकृत घोषणाही करण्यात आली होती. मात्र आता हे सारंच गणित कोलमडलं आहे. चित्रपटाचा काहीसा भागही चित्रीत करणं बाकी आहे. शिवाय व्हीएफएक्स, एडिटींग अशा चित्रपटाच्या काही तांत्रिक बाबींवरही काम करणं बाकी आहे. सध्याची परिस्थिती पाहता अगदी कमी दिवसात चित्रपट पूर्ण करणं शक्य नसल्याचं राधेच्या संपूर्ण टीमचं म्हणणं आहे.

त्यामुळे राधे ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार नाही. याआधीही सलमानच्या किक 2, इंशाअल्लाह  हे चित्रपट टाळे बंद झाले. त्यामुळे सलमानच्या राधेकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र आता हा चित्रपटही रखडल्याने सलमानच्या चाहत्यांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले आहे. आता तो कधी येईल किंवा नाही हेही सांगता येत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salman Khan Radhe movie to not release on Eid 2020