सांगली-मिरजेशी अरुण दातेंचं नातं

सांगली-मिरजेशी अरुण दातेंचं नातं

मराठी भावसंगीताच्या क्षेत्रात सर्वोच्च पदावर पोचून गायक अरुण दाते यांनी रसिकमनावर साडेपाच दशकांहून अधिक वर्षे अधिराज्य गाजवलं. जुन्या पिढीवर तर त्यांच्या गाण्यांची मोहिनी आजही कायम आहेच; परंतु नव्या पिढीतल्या गानरसिकांनाही त्यांची गाणी तितकीच प्रिय आहेत. वरकरणी शांत, धीरगंभीर वाटणाऱ्या अरुणजींचा अत्यंत सुरेल, गोड गळ्याचा गायक म्हणून नावलौकिक होता. सांगली-मिरजेत झालेल्या मैफलीतून आजही अरुणजींच्या आठवणी ताज्या आहेत. त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा...

२४ जानेवारी १९९६ ला ‘सकाळ’ सांगली विभागीय कार्यालयाच्या वर्धापनदिनी येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात तपपूर्तीनिमित्त ‘शुक्रतारा’ हा कार्यक्रम झाला. हजारो सांगलीकरांच्या उपस्थितीत अरुणजींच्या अवीट स्वरांची मैफल आयोजित केली होती. ही भावगीतांची स्वरगंगा अपूर्व रंगली... सुमारे दोन तास सांगलीकर अक्षरशः तल्लीन झाले होते. मनावर प्रसन्नतेचा शिडकावा करणारी मऊ-मुलायम-मखमली आवाजातली कितीतरी गाणी आजही सांगलीकरांच्या आठवणीत आहेत. 

मिरजेत सुवर्णकाळ 
नाट्य परिषदेचे कार्यवाह ओंकार शुक्‍ल यांनी अरुणजींच्या मिरज भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘‘संगीतनगरी म्हणून लौकिक असणाऱ्या मिरज शहरात अरुणजी मोजक्‍याच वेळी आले. १९९० मध्ये भानू तालीम आणि दत्त मंगल कार्यालयात त्यांच्या गाण्यांची मैफल रंगली. शिखरे कुटुंबातील मंगल कार्यक्रमातही त्यांची मैफल झाली होती. पटवर्धन हॉलमध्ये रंगलेल्या संगीतसभेत त्यांनी एकाहून एक सरस गाणी सादर केली. त्यांच्या गायनाच्या सुवर्णकाळात त्यांना ऐकण्याची संधी मिरजकरांना मिळाली.’’

सांगलीतील ती सायंकाळ... 
‘स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’, ‘दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे’ अशी अवीट गाणी गाणारा भावगीतातील ‘शुक्रतारा’ निखळला, अशी प्रतिक्रिया अबकड कल्चरल ग्रुपचे शरद मगदूम यांनी व्यक्त केली. या वेळी त्यांनी सांगलीतील आठवणींना उजाळाही दिला. ते म्हणाले, ‘‘१९९१ मध्ये अरुणजींना कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात त्यांच्या मखमली स्वरांची मैफल झाली. त्यांनी गायलेली भावगीतं आजही जशीच्या तशी ओठांवर आहेत. भावगीतातलं एक पर्वच संपलं, असं म्हणावं लागेल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com