ऑन स्क्रीन : अटॅक : केवळ तांत्रिकदृष्ट्या सरस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Attack

अभिनेता जॉन अब्राहम, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, राकुल प्रीतसिंह, प्रकाशराज असे एकापेक्षा एक सरस कलाकार. त्यातच धमाकेदार अॅक्शन सीन्स आणि नवीन तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर अटॅक या चित्रपटात करण्यात आला आहे.

ऑन स्क्रीन : अटॅक : केवळ तांत्रिकदृष्ट्या सरस

अभिनेता जॉन अब्राहम, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, राकुल प्रीतसिंह, प्रकाशराज असे एकापेक्षा एक सरस कलाकार. त्यातच धमाकेदार अॅक्शन सीन्स आणि नवीन तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर अटॅक या चित्रपटात करण्यात आला आहे. मात्र, हा चित्रपट कमालीची निराशा करणारा आहे. सुरवातीला चित्रपट लक्ष वेधून घेतो खरा, मात्र ही उत्सुकता टिकून राहात नाही. चित्रपटाचा फॉर्म्युला नवीन असला, तरी चित्रपट फारसा खिळवून ठेवत नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब या चित्रपटात करण्यात आला आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम भारतीय सैनिकाची भूमिका साकारीत आहे. आतापर्यंत त्याने काही चित्रपटांमध्ये अशा प्रकारची भूमिका साकारली असली, तरी या चित्रपटातील त्याच्या भूमिकेला नवीन स्वरूप देण्यात आले आहे.

भारतीय सैनिक दहशतवाद्यांच्या एका अड्ड्यावर हल्ला करतात आणि तो अड्डा उद्ध्वस्त करतात. हे मिशन पूर्ण करण्याचे काम अर्जुन शेरगील (जॉन अब्राहम) करतो. त्यानंतर तो सुट्टीवर जाण्यास निघतो. विमानामध्ये त्याची भेट हवाई सुंदरी आयेशाशी (जॅकलिन फर्नांडिस) होते. पहिल्याच भेटीमध्ये त्यांच्यामध्ये प्रेमाचे धागे विणले जातात व ते जीवनसाथी बनण्याचे निश्चित करतात. त्याच दरम्यान गजबजलेल्या एका विमानतळावर दहशतवादी हल्ला होतो आणि त्यामध्ये अर्जुनचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. त्याचे प्रेम त्याच्यापासून हिरावून घेतले जाते आणि त्याच्या नवीन मार्गाची सुरुवात होते. वैज्ञानिक सभा (राकुल प्रीत सिंग) कृत्रिम बुद्धिमत्ता असलेला रोबो तयार करते. तो एका चिपच्या स्वरूपात तयार केला जातो. या तंत्राच्या मदतीने एक सैनिक अनेक बटालियनप्रमाणे लढू शकणार असतो. या चीपच्या मदतीने वैज्ञानिक अर्जुनला सुपर सोल्जर बनवितात. अर्जुनच्या या सहायकाचे नाव असते ‘इरा’. त्याच वेळी संसदेवर दहशतवादी हल्ला होतो आणि पंतप्रधानांसह खासदारांना दहशतवादी किडनॅप करतात. त्यामुळे मोठी भीषण परिस्थिती निर्माण होते. मग अशा वेळी या सुपर सोल्जरचा वापर करायचा असे ठरविले जाते. हा सुपर सोल्जर पंतप्रधानांना आणि खासदारांना कसे सोडवितो याचे थरारक चित्रण या चित्रपटात आहे.

दिग्दर्शक लक्ष्य राज आनंदचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात त्याची कामगिरी बेताचीच झाली आहे. काही दृश्यांना दिग्दर्शक म्हणून तो न्याय देऊ शकलेला नाही. जॉन अब्राहमने या चित्रपटात सुपर सोल्जरची भूमिका साकारली आहे. त्याचे अॅक्शन सीन्स थरारक आणि रोमांचक असे आहेत. यातील बाईक सीन्स कमालीचे झाले आहेत. राकुल प्रीत सिंगने वैज्ञानिकाची भूमिका साकारली आहे. तिने आपल्या भूमिकेला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, जॅकलिन फर्नाडिसची भूमिका फसलेली आहे. तिला या चित्रपटात फारसा वाव नाही. तिचे आणि जॉनचे रोमँटिक सीन हास्यास्पद वाटतात. प्रकाशराज यांनी नेहमीप्रमाणे आपल्या अभिनयाचे नाणे खणखणीत वाजविले आहे. त्यांनी प्रत्येक फ्रेममध्ये कमाल केली आहे, शाश्वत सचदेव यांचे संगीत फारसे प्रभावी झालेले नाही. हा चित्रपट साय-फाय अॅक्शनपॅक्ड चित्रपट आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याची कल्पना देण्यात आली आहे. या भागातील अॅक्शन दृश्ये थरारक असली, तरी चित्रपट फारसा परिणामकारक नाही.

Web Title: Santosh Bhingarde Writes Attack Movie Entertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Entertainmentmovieattack