बॉलिवूडवर शोककळा, प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचं निधन

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 3 जुलै 2020

बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शका सरोज खान यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

 

मुंबई- बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शका सरोज खान यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मुंबईच्या वांद्र्यातील गुरुनानक रुग्णालयात त्यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी सरोज यांची कोरोना टेस्टही करण्यात आली होती. या कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. गुरुवारी मध्यरात्री त्यांना अत्यवस्थ वाटू लागले आणि रात्री दोनच्या सुमारास उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

17 जूनला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मधुमेह आणि याच्यासंबंधित आजारांशीही त्या झुंज देत होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाल्याचं कुटुंबीयांकडून सांगण्यात येत होतं. चारकोप इथल्या कब्रस्तानमध्ये आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

ज्येष्ठ नाट्यकलावंत लीलाधर कांबळी यांचे दीर्घ आजाराने निधन...

गेल्या बऱ्याच काळापासून त्या बॉलिवूडपासून दूर होत्या. मात्र 2019 मध्ये मल्टिस्टारर चित्रपट कलंक आणि कंगना रणोतच्या ‘मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटात एक गाणं कोरिओग्राफ केलं होतं. त्यांनी माधुरी दीक्षित, श्रीदेवी यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचे नृत्य दिग्दर्शित केलं होतं. सरोज खान या हिंदी सिनेसृष्टीतल्या नावाजलेल्या कोरिओग्राफर होत्या. एक दो तीन.. हे गाणं असो किंवा हमको आज कल है इंतजार.. या गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. चोली के पिछे क्या है.. निंबुडा निंबुडा, डोला रे डोला या गाण्यांचंही नृत्य दिग्दर्शन सरोज खान यांनी केलं होतं. 

मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांचे निधन...

सरोज खान यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1948 रोजी झाला होता. बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. 50 च्या दशकात त्यांनी अनेक सिनेमात बॅकग्राऊंड डान्सरमधूनही काम केलं. यानंतर त्यांनी नृत्यदिग्दर्शक बी सोहनलाल यांच्याकडून नृत्याचं प्रशिक्षण घेतलं आणि 'गीता मेरा नाम' सिनेमातून नृत्यदिग्दर्शिका म्हणून आपली कारकीर्द घडवली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saroj khan pass away