
Satish Kaushik : 'पप्पू पेजर' नं हसवलं, मुत्थूस्वामीनं भुलवलं शेवटी कॅलेंडरनं रडवलं!
Satish Kaushik Memorable Performances : कलाकाराला कोणत्याही भूमिकेचे वावडे नसते. जी भूमिका वाट्याला येईल ती समरसून करणे आणि आपल्या भूमिकेचे सोने करणे यासाठीचा त्याचा संघर्ष सुरु असतो. काही कलाकारांना त्यात अमाप यश मिळते. प्रचंड लोकप्रियता वाट्याला येते. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता सतीश कौशिक अशा कलाकारांपैकी एक होते.
बॉलीवूडला पोरकं करुन जगाचा निरोप घेणाऱ्या कौशिक यांच्या वेगवेगळया भूमिकांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. त्या भूमिकेचे तोंड भरून कौतूकही झाले. कौशिक यांना प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. असं हे दिलखुलास व्यक्तिमत्वं आपल्यातून कायमचं निघून गेलं आहे. त्यांच्या जाण्यानं भारतीय चित्रपट विश्वात जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही भरुन येणारी नाही. कौशिक यांच्या वाट्याला ज्या भूमिका आल्या त्यातून त्यांनी नेहमीच प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले.
Also Read : परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर
कौशिक यांनी बॉलीवूडमधील दिग्गजांसोबत काम केले. त्यात बिग बी अमिताभ बच्चन, गोविंदा, अनिल कपूर, अक्षय कुमार, आमीर खान, अनुपम खेर, नसिरुद्दीन शहा अशी अनेक नावं घेता येईल. बड्या कलाकारांसोबत काम करतानाही आपल्या कामाचा ठसा कसा उमटवता येईल याचा विचार करत कौशिक यांनी वठवलेल्या भूमिकांचे सोने केले होते. त्यांनी साकारलेला पप्पु पेजर तर प्रेक्षकांना कमालीचा आवडला होता. त्यानंतर मिस्टर इंडियामधील कँलेंडरच्या भूमिकेनं तर प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.
१९८७ मध्ये आलेल्या मिस्टर इंडियामध्ये त्यांनी अनिल कपूरच्या घरचा कूक कँलेंडरची भूमिका साकारली होती. ती प्रेक्षकांना खूप भावली. यानंतर १९८९ मध्ये आलेल्या राम लखन या चित्रपटामध्ये त्यांनी माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ सोबत काम केले. अनुपम खेर यांच्या दुकानावर काम करणारा नोकर म्हणून कौशिकजी कायम लक्षात राहिले. तर साजन चले ससूराल मध्ये त्यांनी साकारलेलं मुत्तूस्वामी हे पात्रं गोविंदा, करिश्मा कपूर यांच्या भूमिकेपेक्षा सरस होतं.
बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या मिस्टर अँड मिसेज खिलाडी या १९९७ मध्ये आलेल्या चित्रपटामध्ये अक्षयच्या मामाच्या भूमिकेत कौशिक यांनी जो भाव खाल्ला होता. त्याला तोड नव्हती. चाहत्यांना या भूमिकेनं निखळ आनंद दिला होता. तर १९९७ मध्ये आलेल्या अनिल कपूर, गोविंदा यांच्या दीवाना मस्तानातील पप्पु पेजरच्या भूमिकेनं कौशिक यांना मोठी लोकप्रियता मिळाली होती.
गोविंदासोबत कौशिक यांचे वेगळेच ट्युनिंग होते. २००१ मध्ये आलेल्या क्योकी में झुठ नही बोलता या चित्रपटामध्ये कौशिक यांनी वकिलाचे रंगवलेले पात्र कौतूकास्पद होते. तर काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या स्कॅम १९९२ या वेबसीरिजमध्ये एका धनाढ्य व्यापाऱ्याच्या भूमिकेतील कौशिकजींनी चाहत्यांना अभिनय काय असतो हे दाखवून दिले होते.