
ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांनी मंगळवारी मुंबईत कोरोना प्रतिबंधक लस घेतली. हा अनुभव त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितला.
देशामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा एक मार्चपासून सुरु करण्यात आला. यामध्ये जेष्ठांसह (६० वर्षांवरील) सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना सरकारी रुग्णालयांत मोफत लस देण्यात येत आहे. ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांनी मंगळवारी मुंबईत कोरोना प्रतिबंधक लस घेतली. हा अनुभव त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितला. तीन तास उन्हात उभं राहावं लागलं असून केंद्राबाहेर प्रचंड गोंधळाचं वातावरण असल्याची तक्रार त्यांनी केली.
'बीकेसीमध्ये तीन तास उन्हात उभा होतो आणि अखेर मी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. बाहेर प्रचंड गोंधळ सुरू होता पण आत गेल्यावर प्रत्येकजण नियमानुसार काम करत होतं. व्हीआयपी प्रवेशाने का नाही आलो म्हणून मला नम्रपणे ओरडण्यात आलं, पण आरके लक्ष्मण यांच्या कॉमन मॅनसारखा तिथे गेल्याने मला बरं वाटलं', असं ट्विट सतीश शाह यांनी केलंय.
#COVID19Vaccination stood for 3hrs. In the hot Sun at BKC n got it done. Total chaos outside but very disciplined inside. Got politely scolded for not availing VIP entrance but felt good behaving like RK Lakshman’s common man.
— satish shah (@sats45) March 2, 2021
सतीश शाह यांना जुलै २०२० मध्ये कोरोनाची लागण झाली होती. उपचारासाठी ते आठ दिवस लीलावती रुग्णालयात दाखल होते. कोरोनावर मात केल्यानंतर ते काही दिवस घरीच क्वारंटाइनमध्ये राहत होते. याआधी अभिनेते कमल हासन यांनीसुद्धा कोरोना प्रतिबंधल लस घेतली आणि चाहत्यांनाही त्याबाबत आवाहन केलं.
लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही मोहीम १० हजार सरकारी रुग्णालये आणि २० हजार खासही रुग्णालयांमध्ये राबविण्यात येणार आहे. या यादीत महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमधील रुग्णालयांचाही समावेश आहे. या सर्व रुग्णालयांमध्ये कोरोनाची लस उपलब्ध होणार आहे.