esakal | 'सत्यजित रे' नावातचं सगळं, पथेर पांचाली ते ऑस्कर

बोलून बातमी शोधा

satyajit ray death anniversary tribute satyajit ray versatile director writer
'सत्यजित रे' नावातचं सगळं, पथेर पांचाली ते ऑस्कर
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - भारतीय चित्रपट सृष्टीतील महान दिग्दर्शक सत्यजित रे यांची आज पुण्यतिथी आहे. 23 एप्रिल 1992 मध्ये त्यांचे निधन झाले होते. जगातील सर्वात प्रतिभावान दिग्दर्शकांमध्ये सत्यजित रे यांचा समावेश केला जातो. ते त्यांच्या आगळ्या वेगळ्या प्रकारच्या दिग्दर्शनासाठी प्रसिध्द होते. भारताच्या मातीतील चित्रपट त्यांनी आपल्या परिस स्पर्शानं सा-या जगात पोहचवला होता. त्यांच्या चित्रपटांना जगातील अनेक मानाच्या चित्रपट महोत्सवात गौरविण्यात आले होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात एकुण 37 चित्रपटांची निर्मिती केली होती. आजही ते चित्रपट चोखंदळ प्रेक्षक, जाणकार रसिक, अभ्यासक आणि चित्रपट विषयाचे विद्यार्थी यांच्यासाठी मार्गदर्शक ठरताना दिसतात.

भारतीय चित्रपटासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा ऑस्कर समितीनं विशेष पुरस्कार देऊन गौरव केला होता. लाईफ टाईम अचिव्हमेंट हा तो अॅवॉर्ड होता. ते केवळ चित्रपट दिग्दर्शकच होते असे नव्हे तर एक लेखक, निर्माता, कार्टूनिस्ट, कॅलिग्राफर, ग्राफिक डिझायनर आणि चित्रपट समीक्षक म्हणूनही त्यांना नावाजले गेले होते. सत्यजित रे यांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागलं होतं. लहानपणीच त्यांच्या वडिलांचा मृत्यु झाला होता.

अर्थशास्त्र विषय़ाची पदवी घेतल्यानंतर ते शांती निकेतन येथे गेले होते. त्यांना 1950 मध्ये लंडनला जाण्याची संधी मिळाली. तिथे त्यांनी अनेक चित्रपट पाहिले. आणि त्यावेळी त्यांनी आपल्या मनाशी ठरवले की आपण भारतीय चित्रपटांनाही अशाच मोठ्या उंचीवर घेऊन जायचे. 1943 मध्ये त्यांनी ज्युनिअर व्हिज्युलायझर म्हणून सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांना 18 रुपये वेतन होते. त्यानंतर त्यांनी काही काळ डियाझनिंगमध्येही काम केले. त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे डिझाइन केले होते.

ज्यावेळी त्यांनी लंडनमध्ये काही चित्रपट पाहिले त्य़ावेळी त्यांनी आपल्याला डिरेक्टर व्हायचे असे ठरवले. त्यांचा पहिला चित्रपट होता पाथेर पांचाली. या चित्रपटाला कान्स चित्रपट महोत्सवात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. अनेक समीक्षकांनी त्या चित्रपटावर कौतूकाचा वर्षाव केला होता.