दिल, दोस्ती : पटकन झालेली मैत्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saurabh Gokhale and Sandesh Jadhav

सौरभ म्हणतो, ‘संदेश हा एक उत्तम अभिनेता आहे आणि त्याचे पाठांतर चोख आहे. मला आठवतेय, की आमच्या नाटकाच्या दरम्यान संवाद पाठ झालेला पहिला अभिनेता संदेश होता.

दिल, दोस्ती : पटकन झालेली मैत्री

- सौरभ गोखले, संदेश जाधव

मराठी रंगभूमी, मालिका, मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट अशा सर्व माध्यमातून लोकप्रिय झालेला अभिनेता सौरभ गोखले, तर अनेक मालिकांतून आणि चित्रपटांतून प्रामुख्याने पोलिस अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारणारा कलावंत म्हणजे संदेश जाधव. हे दोन कलावंत आता ‘यू मस्ट डाय’ या एका रहस्यमय नाटकाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. सौरभ आणि संदेश या दोघांनीही एकमेकांच्या विविध भूमिका आधी बघितल्या होत्या. काही पुरस्कार सोहळ्यांना किंवा काही पार्टी मध्ये या दोघांची भेटही झाली होती, पण दोघांनी एकत्र काम केले नव्हते. ''यू मस्ट डाय''च्या निमित्ताने तो योग जुळून आला आहे.

सौरभ म्हणतो, ‘संदेश हा एक उत्तम अभिनेता आहे आणि त्याचे पाठांतर चोख आहे. मला आठवतेय, की आमच्या नाटकाच्या दरम्यान संवाद पाठ झालेला पहिला अभिनेता संदेश होता. संदेश वक्तशीर आहे. तालमीच्या वेळी तो वेळेच्या आधीच हजर असतो, हे त्याचे गुण मला आवडतात. संदेशला सौरभने ‘सिम्बा’ चित्रपटात साकारलेली ‘गौरव रानडे’ ही व्यक्तिरेखा खूप आवडल्याचे त्याने सांगितला. तो म्हणाला, ‘सौरभ हा अतिशय मितभाषी आहे, शांत आहे, सर्वांशी मिळून मिसळून राहणारा आहे. तो एक प्रेमळ अभिनेता आहे.’

आपल्या भूमिकेबद्दल सांगताना सौरभ म्हणाला, ‘मी या नाटकात ‘पंकज’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. एका बंगल्यात हा पंकज काही कारणानिमित्ताने येतो आणि मग तो तिथे घडलेल्या प्रसंगात अडकत जातो, असा माझ्या भूमिकेचा प्रवास आहे.’

संदेश सांगतो, ‘मी यापूर्वी अनेक वेळा पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका केली आहे, पण ती मालिकांत आणि चित्रपटात! व्यावसायिक रंगभूमीवर मी पोलिस इन्स्पेक्टर पहिल्यांदा करतोय. मधेच शांतपणे वागणारा, पण अचानक चिडणारा असे दोन्ही पैलू मला या नाटकातील इन्स्पेक्टर करताना साकारायला मिळत आहेत.’ नीरज शिरवईकर लिखित ‘यू मस्ट डाय’ हे नाटक प्रेक्षकांना एका उत्कंठावर्धक नाटकाचा आनंद नक्कीच देईल. या नाटकाची निर्मिती अदिती राव यांनी केली आहे.

(शब्दांकन - गणेश आचवल)