तुम्ही पाहिलं का 'सावन महिनामा' ?

शिवनंदन बाविस्कर
सोमवार, 23 एप्रिल 2018

पिलखोड(ता. चाळीसगाव) - खानदेशातील अहिराणी या बोली भाषेतील 'सावन महिनामा' हे गाणे नुकतेच युट्युबर लाँच करण्यात आले. अहिराणी लोकगीतांमधील या गाण्याला चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. आतापर्यंत बारा दिवसात या गाण्याला युट्युबरवर दहा लाखांवर व्ह्यूज मिळाले आहेत.

पिलखोड(ता. चाळीसगाव) - खानदेशातील अहिराणी या बोली भाषेतील 'सावन महिनामा' हे गाणे नुकतेच युट्युबर लाँच करण्यात आले. अहिराणी लोकगीतांमधील या गाण्याला चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. आतापर्यंत बारा दिवसात या गाण्याला युट्युबरवर दहा लाखांवर व्ह्यूज मिळाले आहेत.

सध्या खानदेशात लग्नसराईची धूम आहे. त्यामुळे 'सावन महिनामा... तुला याद करनाय' या अहिराणी लोकगीताची चांगलीच चलती पाहायला मिळत आहे. या गाण्याचे लेखक व अभिनेते सचिन कुमावत यांच्याशी 'सकाळ'ने नुकताच संवाद साधला. यावेळी बोलताना, 'सावन महिनामा' हे गाणे सुरुवातीला वेगळ्या शब्दात होते. मात्र, प्रेम गीतासाठी ज्या भावना असतात, त्या आधीच्या गाण्यून व्यक्त होत नव्हत्या. शिवाय त्यातले शब्द व्यवस्थित जुळत नव्हते. त्यामुळे या गाण्याला 'रोमँन्टिक टच' देत, मूळ गाण्यात बदल केला. गाण्याचे रजिस्ट्रेशन देखील केले. त्यांनतर शेंदुर्णी (ता.जामनेर) येथील एस. के. स्टुडिओत ऑडिओ गाणे रेकॉर्ड केल्याचे कुमावत यांनी सांगितले.

सचिन कुमावत हे गेली बारा वर्षे अभिनय क्षेत्रात काम करीत आहेत. 'हाई साली प्यार करना,' 'ओ साली मी पाचोरावाला,' 'लगन मा मचाडु धुम' ही त्यांची आतापर्यंत गाजलेली गाणी आहेत. कुमावत यांच्या 'सावन महिनामा' या गाण्याच्या चालीवर 'चैत्र महिनामा माय तुना रथ सजनाय' हे देखील व्हिडिओ गाणे सप्तश्रुंगी यांत्रेच्या काळात हिट झाले. सचिन कुमावत यांनी अहिराणी सोबतच मराठी, भोजपुरी चित्रपटातही भुमिका साकारल्या आहेत, असे त्यांनी 'सकाळ'शी बोलतांना सांगितले.

गाण्याविषयी सांगताना कुमावत म्हणाले, ऑडिओ गाणे युट्युबला अपलोड केले. त्यावेळी त्याला दहा लाख व्ह्यूज मिळाले होते. आता त्या गाण्याचे 23 लाखांच्यावर व्ह्यूज आहेत. ऑडिओ गाण्याला मिळणारी पसंती बघता, सचिन कुमावत यांनी गाण्याचा व्हिडिओ करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी पुर्वनियोजन करुन शेंदुर्णी परिसरात गाण्याचे एका दिवसांत चित्रीकरण पूर्ण केले. या गाण्याच्या निर्मितीमुळे अहिराणी देखील मागे नाही; असे खानदेशकर सांगु शकतील असे कुमावत यांनी म्हटले आहे.

व्हिडिओ गाण्यात अभिनेता सचिन कुमावत व अभिनेत्री पुष्पा ठाकुर हे कलाकार आहेत. अँड. नरेंद्र डाकोरकर व अमोल पाटील यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे. संगीत संयोजन किशोर शिरसाठ व चंदु मैलागीर यांचे आहे. छायाचित्रीकरण अमोल पाटील आणि राहुल पाटील (अल्टिमेट आर्ट्स स्टुडीओ, पाचोरा ) यांनी केले आहे. सूरज पाचुंदे यांनी गीत गायले आहे. तर नृत्य दिग्दर्शन समाधान निकम यांचे असून, निर्मिती व्यवस्था राहूल गुजर यांची आहे. 

''खानदेशी लोकांनी आतापर्यंत माझ्यावर खूप प्रेम केले आहे. 'सावन महिनामा' या गाण्याला देखील भरभरुन पसंती मिळत आहे. त्यामुळे आपल्या सगळ्याचे ऋण कसे व्यक्त करावे हे मला समजत नाही. यापुढेही माझ्यावर असेच प्रेम राहिल या सदिच्छा''.
सचिन कुमावत, अभिनेता

''सध्या सगळेच अपडेट होत आहे. त्यामुळे आपली अहिराणी देखील अपडेट व्हावी हा उद्देश होता. त्यानुसार हे गाणे चांगले करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला आहे''.
अमोल पाटील, दिग्दर्शक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sawan mahinama khandeshi ahirani song music