
Shah Rukh Khan: ना मालिका,ना सिनेमा.. 36 वर्षापूर्वी नाटकातून सुरु केली होती शाहरुखनं आपली कारकिर्द..
Shah Rukh Khan: शाहरुख खान सध्या 'पठाण' सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहे. त्याचा सिनेमा बॉक्सऑफिसवर इतिहास रचताना दिसत आहे. या दरम्यान आता खाऊ बॉइज नावाच्या ट्वीटर हॅंडलवर एक ट्वीट जोरदार व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये रॉकी उर्फ संदीप सिंगनं ३६ वर्षापूर्वीच्या कागदपत्रांचे दोन स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. जे किंग खानच्या चाहत्यांसाठी खूपच खास आहेत.
संदीप सिंगनं दावा केला आहे की हे स्क्रीन शॉट्स तेव्हाचे आहेत,जेव्हा शाहरुख खाननं एका शाळेत जाऊन एक नाटक दिग्दर्शित केलं होतं.(Shah rukh Khan directed a play in 1987 modern school screenshot viral)
खाऊ बॉइजने ट्वीटर हॅंडलवर हे स्क्रीनशॉट्स शेअर करत लिहिलं आहे की,'' तुम्हाला माहित आहे का पंजाब्यांची नावं एकदम हटके असतात. मला रॉकी म्हणून हाक मारतात. पण माझं नाव संदीप सिंग आहे. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांत मी लिहिलेल्या एका नाटकाला त्या व्यक्तीनं दिग्दर्शित केलं होतं ज्याचं नाव तर आपण ऐकलंच असेल. हो त्याचं नाव आहे शाहरुख खान. मला वाटलं की मला लोकांना सांगायला हवं की आम्ही ३४ वर्ष जुने मित्र आहोत..पण माझ्यावर कोण विश्वास ठेवेल?''
संदीप सिंगने जो स्क्रीनशॉट शेअर केला आहे तो दिल्लीच्या मॉडर्न स्कूल वसंत विहारचा आहे. स्क्रीनशॉटमध्ये इंग्लिश प्ले समोर शाहरुख खानचं नाव लिहिलं आहे. ही लिस्ट शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची आहे.
ज्यात १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाची माहिती आहे. यामध्ये तारीख २५ जुलै,१९८७ अशी लिहिलेली आहे. दिवस शनिवार आहे. यामध्ये हे देखील लिहिलं आहे की कार्यक्रमात दिल्ली युनिव्हर्सिटीच्या सेंट स्टीफन कॉलेजचे प्रिन्सिपल चीफ गेस्ट असतील.
संदीपने आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगितलं आहे की शाहरुख खाननं हे नाटक दिग्दर्शित करण्यासाठी रितसर मानधन घेतलं होतं. शाहरुख खान हा दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेचा विद्यार्थी होता. पण तरीदेखील तो इतर शाळांच्या नाटकांना दिग्दर्शित करायचा. संदीपच्या म्हणण्यानुसार शाहरुखची पत्नी गौरी खाननं मॉडर्न स्कूल वसंत विहारमधनं शिक्षण घेतलं आहे.
संदीपच्या ट्वीटवर लोकांनी खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी कमेंटमध्ये सांगितलं आहे की त्या नाटकाच्या नावावर त्यावेळी प्रिन्सिपलनी आक्षेप घेतला होता. याव्यतिरिक्त त्यांनी सांगितलं की ज्या नाटकाला शाहरुखनं दिग्दर्शित केलं त्याचं लेखन त्यानं आपला मित्र गौरव बक्षीसोबत मिळून केलं होतं.