esakal | कोल्हापूरची शिवानी आता डिजे अॅनी
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूरची शिवानी आता डिजे अॅनी

कोल्हापूरची शिवानी आता डिजे अॅनी

sakal_logo
By
प्रवीण जाधव

कोल्हापूर - लहानपणापासून संगीत, गाणी आणि गायनाची असणाऱ्या आवडीमुळे व्यावसायिक लेडी डिजे बनण्याचा मान कोल्हापुरातील शिवानी सुनील कदम हिने मिळविला आहे.  वेगवेगळ्या क्षेत्रांत महिला भरारी घेत असताना डिजेसारख्या वेगळ्या विश्वात शिवानीने कोल्हापुरातच हे ज्ञान घेऊन याठिकाणी तिने करिअर सुरु केले. डिजे ऍनी या नावाने शिवानीने ओळख निर्माण केली आहे. 

राजारामपुरी 7 वी गल्लीतील शिवानी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली, वडील एसटी महामंडळात नोकरीला, आई गृहिणी, लहान भाऊ शिक्षण घेत असलेल्या कुटुंबातून शिवानीने ही प्रगती केली. वाणिज्य या विषयातून पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर शिवानीने एमबीएचे शिक्षण सुरु केले.

लहानपणापासून तिला असलेली संगीत, गायन आणि गाण्यांची आवड तिला स्वस्थ बसू देत नव्हती. चांगली लेडी डिजे होण्याचे स्वप्न तिने पाहिले. शिवानीने घरी आई, वडिलांना करिअरविषयी सांगितले. आई-वडिलांनीही पाठिंबाही दिला. कोल्हापुरातीलच रणजीत भोसले यांच्याकडे तिने डिजे या विषयाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण सुरु केले. लाईव्ह डिजे या प्रकारात तिने लवकरच प्रगती केली. प्रॉजक्‍शन डिजेचे प्रशिक्षण ती घेत आहे. सहा महिन्यांपासून शिवानीने लाईव्ह डिजेचे कार्यक्रम केले आहेत.

वेगवेगळ्या प्रकारची आवड असणाऱ्या श्रोत्यांसमोर त्यांच्या आवडिनिवडीची गाणी लावण्याचे कसब शिवानीने आत्मसात केले. आजअखेर नामांकित हॉटेल्समधील पार्ट्यांमध्ये शिवानीने डिजेचे कार्यक्रम यशस्वी केले आहेत. अल्पावधीत पश्‍चिम महाराष्ट्रातील लोकप्रिय डीजे म्हणून वेगळी ओळख शिवानीने निर्माण केली. 

आंतरराष्ट्रीयस्तरावर भारतीय गाण्यांच्या माध्यमातून लेडी डिजे म्हणून नाव कमविण्याचे शिवानीचे ध्येय आहे. आपल्या या यशात वडिल सुनील, आई सुचिता, भाऊ शिवेंद्र आणि प्रशिक्षक डिजे रणजीत भोसले यांचे मोलाचे सहकार्य असल्याचे ती नमूद करते. 

डिजेसारख्या क्षेत्राबद्दल बरेच गैरसमज असतात. येथील सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण केले जातात परंतु हे क्षेत्र तसे नाही. एक कलाकार म्हणून संगीतामधील अद्ययावत तंत्रज्ञान असणारे क्षेत्र म्हणून या क्षेत्राकडे सर्वांनी पहावे. मुलींना या क्षेत्रात चांगल्या संधी असून यामुळे चांगले व्यावसायिक क्षेत्र मुलींना उपलब्ध होत आहे. 
- ऍनी उर्फ शिवानी,
लेडी डीजे.  

 
 

loading image