Shreyas Jadhav : 'तद्दन व्यावसायिक चित्रपट बनवण्याचे ध्येय'!

बाबू बॅण्ड बाजा, ऑनलाईन बिनलाईन, बसस्टॉप, बघतोस काय मुजरा कर अशा काही चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर श्रेयस जाधव दिग्दर्शनाकडे वळला.
 Shreyas Jadhav Marathi director babu Band Baja entry
Shreyas Jadhav Marathi director babu Band Baja entry

Shreyas Jadhav Marathi director babu Band Baja entry : बाबू बॅण्ड बाजा, ऑनलाईन बिनलाईन, बसस्टॉप, बघतोस काय मुजरा कर अशा काही चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर श्रेयस जाधव दिग्दर्शनाकडे वळला. मीपण सचिन या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन त्याने केले. आता तो लेखक व दिग्दर्शक म्हणून फकाट असे काहीसे आगळेवेगळे शीर्षक असलेला चित्रपट घेऊन येत आहे. त्यानिमित्त त्याच्याशी केलेली बातचीत.

१. फकाट या चित्रपटाचे दिग्दर्शन करावे असे तुला का वाटले..

- मी रॅपर जरी असलो तरी काही मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे तसेच काही चित्रपटांमध्ये अभिनयदेखील केला आहे आणि मुळात मी येथे आलो ते दिग्दर्शक बनण्यासाठी. लहानपणापासून माझे ते स्वप्न होते. रॅपर ही माझी पॅशन आहे तर दिग्दर्शन हे माझी प्रचंड आवड आहे. त्यामुळे मी पण सचिन नावाचा चित्रपट मी दिग्दर्शित केला. त्यातून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यानंतर फकाट या चित्रपटाचे दिग्दर्शन करायचे ठरविले आणि त्याचे कारण या चित्रपटाची कथा.

आपल्याकडे होते काय की तद्दन व्यावसायिक चित्रपटांची निर्मिती खूप कमी प्रमाणात होते. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत तद्दन व्यावसायिक चित्रपटाची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणावर होते. प्रेक्षकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो. त्या तुलनेत मराठीमध्ये हे प्रमाण अल्प आहे. चित्रपटगृहात टाळ्या व शिट्या मिळविणारे चित्रपट कमी प्रमाणात येतात.

त्यातील काही चित्रपट व्यावसायिक असतात. परंतु दिसताना ते सिनेमॅटिक दिसत नाहीत. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला आणि संपूर्णतः व्यावसायिक चित्रपट बनविण्याचा निर्णय घेतला. आता माझा फकाट हा चित्रपट प्रदर्शित होत आहे त्याचबरोबर डंका हरिनामाचा हा चित्रपटही येत आहे. आणखीन एक चित्रपट येतआहे पण त्याचे नाव अजून निश्चित व्हायचे आहे.

२. तू रॅपर आहेस. निर्माता व दिग्दर्शक आहेस तसेच लेखकही आहेस. या सगळ्या गोष्टी करण्याचे कारण काय....

- क्रिकेटमध्ये हार्दिक पंड्या गोलंदाजी उत्तम करतो तसेच तो फलदांजीही उत्कृष्ट करतो. तो एक अष्टपैलू खेळाडू आहे. तसाच मलादेखील आपल्या क्षेत्रात ऑलराउंडर बनायचे आहे. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी करीत आहे. आपल्याला जे जे जमेल ते ते आपण करीत जायचे आणि प्रत्येक कामात आपले शंभर टक्के द्यायचे. त्यामध्ये कोणतीही हयगय करायची नाही किंवा आळसपणा करायचा नाही. सतत काही ना काही काम करीत राहायचे.

३. फकाट या चित्रपटाचा तू लेखक आहेस आणि दिग्दर्शकही. जेव्हा तू दिग्दर्शन करीत असतोस तेव्हा तुझ्यातील लेखक त्यामध्ये अधिक डोकावतो का...

- असे काहीही नाही. कारण यापूर्वी मी आॅनलाईन बिनलाईन, बसस्टाॅप वगैरे चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यामुळे चित्रपटांचे गणित नेमके काय असते किंवा लेखन आणि दिग्दर्शन कसे असते या सगळ्या बाबींचा बारकाईने अभ्यास केला आहे. सुरुवातीला चित्रपटांची निर्मिती आणि त्यानंतर दिग्दर्शन...या दोन्ही बाबींमध्ये मी समतोल राखायला शिकलो आहे. त्याचा उपयोग मला लेखनात झाला आहे. दिग्दर्शन आणि लेखन या दोन्ही बाबी निराळ्या आहेत आणि त्यामध्ये समतोल कसा राखायचा हे मी अगोदरच निर्माता म्हणून शिकलो आहे.

४. फकाट या चित्रपटाची नेमकी कथा कशी काय आहे...

- फकाट या चित्रपटाची कथा एका दाक्षिणात्य चित्रपटाची प्रेरणा घेऊन बांधलेली आहे. एक तेलगू चित्रपट आहे. आम्हाला तो आवडला आणि आम्ही तेथूनच प्रेरणा घेऊन हा मराठी चित्रपट बनविला आहे. हा मनोरंजन करणारा चित्रपट आहे. सिच्युएशनल कॉमेडीने परिपूर्ण भरलेला चित्रपट आहे. मी परिपूर्ण असा व्यावसायिक चित्रपट बनविला आहे आणि यापुढे असेच चित्रपट बनविणार आहे.

५. कलाकारांची निवड तू कशी काय केलीस...

- ही दोन मित्रांची कहाणी आहे आणि तिसरी व्यक्तिरेखा आहे ती अविनाश नारकर साकारीत आहे. दोन मित्रांपैकी एक हेमंत ढोमे आहे व दुसरा सुयोग गोह्रे आहे. हेमंत सलीम नावाची भूमिका साकारीत आहे तर सुयोग राजू ही व्यक्तिरेखा साकारीत आहे. अविनाश नारकर हे मेजर अब्बास ही भूमिका साकारीत आहेत.

हे सगळे कलाकार माझे सुरुवातीपासूनचे मित्र आहेत आणि त्यांच्यामध्ये असलेल्या अंगभूत कलागुणांबद्दल मला माहिती आहे. त्यामुळे मी त्यांची या चित्रपटासाठी निवड केली. अविनाश नारकर यांनीसुद्धा यातील विनोदी भूमिका उत्तमरीत्या पार पाडली आहे. याशिवाय दाक्षिणात्य इंडस्ट्रीत मोठमोठे चित्रपट केलेला कबीरसिंग दोहान या चित्रपटात कामकरीत आहे. तो प्रथमच मराठीत काम करीत आहे. तो माझा मित्र आहे आणि मी त्याला ही कथा सांगितली. ती ऐकताच तो काम करण्यास तयार झाला. तो मुळात पंजाबी आहे. परंतु त्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत खूप छान काम केले आहे. त्याने अतिरेक्याची भूमिका साकारली आहे.

६. माझा पती करोडपती या चित्रपटातील अशोक सराफ यांच्या लोकप्रिय अशा तुझी माझी जोडी जमली गं...हे गाणे रिक्रिएट करण्याचे कारण काय..

- अशोक सराफ यांचे आम्ही मोठे चाहते आहोत. त्यामुळे आम्ही या गाण्यातून त्यांना मानवंदना देण्याचा प्रयत्न केला आहे. या गाण्यातील साधेपणा कुठेच न हरवता आम्ही ते आम्ही तयार केले आहे. या गाण्याचे रीतसर आम्ही अधिकार घेतलेले आहेत. आजही हे गाणे तितकेच लोकप्रिय आहे. आताही या गाण्याला प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत.

७. आजकाल मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नाही अशी ओरड होते आहे. याबाबतीत तुला काय वाटते.

- चांगला चित्रपट पाहायला प्रेक्षक येतात. वेड, वाळवी, पावनखिंड असे काही तद्दन व्यावसायिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चाललेले आहेत. त्यांनी उत्तम व्यवसाय केला आहे. त्यामुळे चांगला चित्रपट असला ती प्रेक्षक निश्चित येतात आणि चित्रपटगृहेही मिळतात. कारण चित्रपटगृहांचे मालक व्यवसाय करायला बसलेले आहेत. एखाद्या चित्रपटाला प्रेक्षक येतात म्हटल्यानंतर ते चित्रपटगृह निश्चित उपलब्ध करून देतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com