esakal | "माझी मुलगी अजूनही स्ट्रगल करतेय"; घराणेशाहीच्या वादावर सुप्रिया पिळगावकर व्यक्त
sakal

बोलून बातमी शोधा

supriya and shriya pilgaonkar

"ज्यांना ओळखीने काम मिळतं, ते खूप.."

"माझी मुलगी अजूनही स्ट्रगल करतेय"; घराणेशाहीच्या वादावर सुप्रिया पिळगावकर व्यक्त

sakal_logo
By
स्वाती वेमूल

बॉलिवूड किंवा एकंदर चित्रपटसृष्टीत घराणेशाही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते, असं अनेकांनी म्हटलं. अभिनेत्री कंगना रणौतने घराणेशाहीच्या मुद्द्यावरून निर्माता-दिग्दर्शक करण जोहरवर निशाणा साधला होता. तेव्हापासून या विषयावर अनेकांनी त्यांचं मत मांडलं. काहींनी त्याला विरोध केला तर काहींनी प्रत्येक क्षेत्रात घराणेशाही पाहायला मिळते असं म्हटलं. घराणेशाहीच्या या वादात आता अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी उडी घेतली आहे. स्टारकिड असूनही माझी मुलगी अजूनही स्ट्रगल करतेय, असं त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं.

सुप्रिया यांचा 'जननी' हा नवीन शो प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्यानिमित्त त्यांनी 'पिपिंगमून' या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत घराणेशाहीवर वक्तव्य केलं. "ज्यांना ओळखीने काम मिळतं, ते खूप नशिबवान आहेत असं मी म्हणेन. त्यांनी त्या संधीचा उपयोग पुरेपूर करून घ्यावा आणि आपली प्रतिभा प्रेक्षकांसमोर सादर करावी. इंडस्ट्रीत त्यांच्या ओळखीचं कोणीतरी आहे, यात त्यांची काही चूक नाही. त्यांनीसुद्धा यशस्वी व्हावं असं मला मनापासून वाटतं. माझ्या मुलीनेही खूप संघर्ष केलाय आणि ती अजूनही करतेय. पण तिला त्यात काही गैर वाटत नाही. माझ्या आईवडिलांमुळे मला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळतंय, हेच पुरेसं असल्याचं ती सांगते", असं त्या म्हणाल्या. 

इंडस्ट्रीत एखादं काम मिळणं हा पूर्णपणे नशिबाचा भाग असतो असंही मत त्यांनी मांडलं. याविषयी पुढे त्या म्हणाल्या, "एखादा प्रोजेक्ट नशिबात असेल तर तो तुम्हाला कसाही मिळतो. कधीकधी सर्व काम होऊनसुद्धा ऐनवेळी काहीतरी गडबड होते. त्यामुळे या सर्व गोष्टी नशिबावर अवलंबून असतात असं मला वाटतं."

सुप्रिया आणि सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रिया पिळगावकर चित्रपट व वेब विश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करतेय. श्रियाने या दोन्ही माध्यमांमध्ये काम केलं असून तिच्या दमदार अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक केलं जातं. सोशल मीडियावरही ती बऱ्यापैकी सक्रिय असून तिचा एक वेगळा चाहतावर्ग आहे.