Video : 'येऊ कशी..'च्या सेटवर शुभांगी गोखलेंना अश्रू अनावर

तिचं पत्र वाचून दाटून आल्या भावना
Shubhangi Gokhale
Shubhangi Gokhale

कोरोनाचं संकट आणि त्यात लॉकडाउनमुळे आपल्या जवळच्या व्यक्तींना भेटता येत नसल्याचं दु:ख अनेकांनाच आहे. आपल्या मुलीपासून दूर राहणाऱ्या अभिनेत्री शुभांगी गोखले Shubhangi Gokhale यांना सखी गोखलेची Sakhi Gokhale आठवण सतावतच होती. मात्र 'मदर्स डे'निमित्त तिने दिलेल्या सरप्राइजनंतर त्यांना सेटवर अश्रू अनावर झाले. सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित आणि काही फोटो शेअर करत शुभांगी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. (shubhangi gokhale cries on the set of yeu kashi tashi mi nandayla)

शुभांगी गोखलेंची पोस्ट-

'मागच्या वर्षीच्या लॉकडाउननंतर मी सीरिअलच्या शूटिंगनिमित्त सांगलीतच तंबू ठोकला होता. डिसेंबरपासून दुसऱ्या एका सिरिअलचं शूट मुंबईत सुरु झाल्यावर माझी दर आठवड्याला सांगली-मुंबई-सांगली-मुंबई ये-जा सुरू झाली. त्यात मधे पुण्यात तासभर का होईना सखीची भेट घेऊनच जायचे. फोन, मेसेजपेक्षा समोर दिसलं पाहिजे बाबा माणूस! तीन महिने चाललं असं. पुन्हा एकदा लॉकडाउन झाल्यावर सांगलीचे शूट गोव्यात जाऊन करायचं ठरलं. नियमानुसार सगळे सोपस्कार पार पाडून अख्खं युनिट दुसऱ्या राज्यात हलवणं सोपी गोष्ट नाही. गोव्यात लोकेशन, राहण्याची जागा उत्तम, काम पण सुरळीत. पण मला नर्व्हस वाटत राहिलं.'

'एकूण जगात काय चाललंय. उलटसुलट बातम्या येत आहेत. इथे आपण नव्याने वेगळ्याच प्रदेशात तंबू टाकून आभासी जगातलं हसणं रडणं चिडणं शूट करतोय. खरंतर बायो बबल करून राहत असल्यामुळे सुरक्षित पण दुसऱ्या शूटिंगसाठी मुंबईमार्गे सिल्वासाला जाताना विमानप्रवासात मात्र खूप ताण आला. दोन मास्क, एक शिल्ड, विषाणूची दहशत सगळीकडे, कोणाशी संवाद नाही, यांत्रिकपणे घरी पोहोचले. कोरोनाची टेस्ट, त्याचे रिपोर्ट आल्यावर सिल्वासाकडे निघाले. सामानसुमान, आवडीच्या, सवयीच्या वस्तू भरून घेऊन निघताना रस्त्यातला लॉकडाउन आणि निसर्ग बघताना पुन्हा एकदा शून्यावस्था.. कशासाठी, कुणासाठी, कुठवर.. नुसतं रणरणतं ऊन अन् फक्त औषधाची दुकानं. दुसऱ्या युनिटमध्ये पोहोचल्यावर सुरक्षित वाटलं.'

हेही वाचा : येऊ कशी तशी मी नांदायला: ऑनस्क्रीन मायलेकींची ऑफस्क्रीन मैत्री

'बायो बबल नंबर दोन- पुन्हा एकदा लोकेशन, व्यवस्था, काम सगळं काही उत्तम. पण कुठल्या वेगळ्याच प्रदेशात येऊन वेगळ्याच आभासी जगात मी प्रेमळ आई म्हणून दिवसभर फिरतेय. नक्की काय चाललंय सगळं? त्यात आजचा मदर्स डे, एरव्ही ‘काय काय अन् कसले कसले ‘डे’ काढतात..’ असं मनात आलं असतं. आजच्या मदर्स डेच्या निमित्ताने पण आज सगळ्या फेसबुक, इन्स्टावरच्या पोस्ट्स बघून बरं वाटत होतं. मुलामुलींनी विविध शैलीत प्रेम व्यक्त करत आयांचे खूपच गोड फोटो टाकलेले बघत दिवस गेला. त्यातल्या सगळ्यांनाच काही मी ओळखते असं नाही. आजचं शूट संपल्यावर संध्याकाळी डायनिंग हॉलमध्ये हळूहळू सगळे जमत होतो. कुणी शॉवर घेऊन, कुणी शूटींगच्याच वेषात. एक केक आला होता, सगळ्या आयांसाठी! सखीने प्रॉडक्शन टीमची मदत घेऊन या शुभेच्छा पाठवल्या. तिने एक गोड पत्र ही पाठवलं. युनिटमधल्या सगळ्या आयांसाठी. त्यानंतर बायो बबलचा एक टीअर बबल झाला. आयांना मुलांच्या आठवणींनी आणि मुलांना आईच्या आठवणीनी एवढं रडू कोसळलं. सखी, या वैश्विक संकटकाळात तू पाठवलेलं प्रेम...सगळं भरुन पावलं.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com