The sky is pink review: भावस्पर्शी संघर्ष कथा

संतोष भिंगार्डे
Friday, 11 October 2019

भावनिकदृष्ट्या खिळवून ठेवणारा, डोळ्यांच्या कडा ओलावून टाकणारा, अस्वस्थ करणारा असा विषय या चित्रपटात मांडण्यात आला आहे. 

'द स्काय इज पिंक' या चित्रपटाद्वारे देसी गर्ल प्रियांका चोप्राचे दोनेक वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक झाले आहे आणि तिचे हे कमबॅक यशस्वी झाले आहे, असेच म्हणावे लागेल. भावनिकदृष्ट्या खिळवून ठेवणारा, डोळ्यांच्या कडा ओलावून टाकणारा, अस्वस्थ करणारा असा विषय या चित्रपटात मांडण्यात आला आहे. 

प्रियांकाने अभिनयाबरोबरच निर्माती म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. दिग्दर्शिका सोनाली बोसने एका सत्य घटनेवर हा चित्रपट बनविला आहे आणि तो मन हेलावून टाकणारा आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सगळ्यात कटू सत्य कोणते असेल तर ते आहे मृत्यू. माणूस कितीही श्रीमंत असला आणि ऐषोरामी जीवन जगत असला तरी मृत्यू हा कुणालाच चुकलेला नाही. कधी कुणाच्या वाट्याला तो लवकर येतो, तर कधी कुणाला उशिरा मृत्यू कवटाळतो. 

द स्काय इज पिंक या चित्रपटातील आयेशा चौधरी (झायरा वसीम) ही जन्मापासूनच मृत्यूशी झुंजत असते. दिल्लीतील चांदनी चौकातील अदिती (प्रियांका चोप्रा) आणि नीरेन चौधरी (फरहान अख्तर) या दाम्पत्याची ही कथा. त्यांना दोन मुले असतात. एक मुलगा ईशान (रोहित सराफ) आणि मुलगी आयेशा (झायरा वसीम). आयेशा एका गंभीर आजाराने त्रस्त असते. तिचा हा आजार खूप दुर्मीळ आणि आनुवंशिक असतो. या आनुवंशिक आजारामुळेच अदिती आणि नीरेन यांची पहिली कन्या तान्या त्यांनी गमावलेली असते. त्यामुळे याच भीतीपोटी अदिती दिल्ली सोडून आयेशावर उपचार करण्यासाठी लंडनला जाते. तेथे तिच्यावर उपचार सुरू करते. ती काही वर्षांची सोबती आहे हे अदितीला माहीत असते. तरीही अदिती आणि नीरेन आपल्या मुलीला या आजारातून वाचविण्याचा प्रयत्न करीत असतात. संपूर्ण कुटुंबाची कसरत आणि ससेहोलपट होत असते. तरीही आयेशाला आनंदी आणि हसतखेळत ठेवण्यासाठी ते प्रयत्न करीत असतात.

दिग्दर्शिका सोनाली बोसने ही सत्य घटना पडद्यावर कमालीची विणली आहे. त्यामुळे तिचे कौतुक करावे लागेल. एखाद्या सत्य घटनेला पडद्यावर उतरविताना चांगली ट्रीटमेंट मिळणे आवश्‍यक असते. सोनाली यामध्ये नक्‍कीच उजवी ठरली आहे आणि तिला उत्तम साथ कलाकारांच्या छान अभिनयाची मिळाली आहे. फरहान अख्तर व प्रियांका चोप्रा जाणते आणि मुरब्बी कलाकार. त्या दोघांनी पती-पत्नीची भूमिका छान वठविली आहे. आपल्यावर ओढवलेले आभाळाएवढे संकट आणि त्याही अवस्थेत त्यांची चाललेली कसरत त्यांनी छान टिपली आहे. जीवनात येणाऱ्या प्रत्येक कडू किंवा गोड प्रसंगाला अगदी हसतखेळत कसे सामोरे जावे... त्यातूनच एखादा मार्ग सापडतो का... या सगळ्या बाबी मस्त रेखाटण्यात आल्या आहेत. झायरा वसीम आणि रोहित सराफ यांनीही कमालीची कामगिरी केली आहे. चित्रपटातील संगीत ठीकठाक आहे. चित्रपटातील संवाद कणखर आहेत. सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. मात्र चित्रपट काही ठिकाणी संथ झाल्यासारखा वाटतो. एका कुटुंबाची ही संघर्ष कथा आहे. मन विचलीत करणारी... भावनिक आणि खिळवून ठेवणारी आहे. 

चार स्टार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The sky is pink movie review