'बलात्कार होऊन हत्या होईपर्यत वाट पाहायची का ?'

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 31 October 2020

आपल्याला जो मुलगा त्रास देत आहे त्याच्याविषयी तक्रारही तिने पोलिसांकडे केली होती. मात्र एवढे सगळे करुनही तिच्या वाट्याला काय आले ? तिला न्याय मिळाला का, असा प्रश्न सोनाने विचारला आहे.

मुंबई - हरियाणातील एका महाविद्यालयातील निकिता तोमर विद्यार्थिनीची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यानंतर त्या घटनेचा तपास पुढे सरकत नसल्याचे दिसून आले आहे. याबद्दल बॉलीवूडमधल्या अनेकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. प्रख्यात गायिका सोना महापात्राने सोशल मीडियावर या हत्याकांडावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यात तिने प्रशासनाला आरोपींना शिक्षा कधी मिळणार हा प्रश्न विचारला आहे.

 निकीता तोमर नावाच्या विद्यार्थिनीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेचे देशभर तीव्र पडसाद उमटले. ज्यांनी हे कृत्य केले त्या आरोपींना तात्काळ शिक्षा देण्यात यावी अशी मागणी वेगवेगळ्या स्तरांतून करण्यात आली. मात्र पोलीस प्रशासनाला आरोपींपर्यत पोहचण्यात यश आलेलं नाही. यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. निकिताला मारणारा आरोपी तौसिफ हा तिला गेल्या महिनाभरापासून त्रास देत होता. अखेर त्याने तिला गोळ्या घालून ठार मारले.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना सोना महापात्रा म्हणाली, काही झालं तरी पहिल्यांदा महिलांना काळजी घ्यायला सांगितले जाते. त्यांनी सुचनांचे पालन करावे, कुठला त्रास झाल्यास त्यांनी पोलिसांकडे धाव घ्यावी असे सुचविण्यात येते. आता या घटनेतही निकिताने सर्व कायदेशीर मार्गाने केले. आपल्याला जो मुलगा त्रास देत आहे त्याच्याविषयी तक्रारही तिने पोलिसांकडे केली होती. मात्र एवढे सगळे करुनही तिच्या वाट्याला काय आले ? तिला न्याय मिळाला का, असा प्रश्न सोनाने विचारला आहे.

सध्याच्या चित्रपटांमधील गाण्यांच्या दर्जाविषयीही तिने टीका केली, ती म्हणाली, गेल्या दोन दशकांपासून  हिंदी चित्रपटांतील गाण्यांचा स्तर घसरत चालला आहे. निकिताच्या घटनेवर अभिनेत्री कंगणा राणावत, भूमि पेडणेकर, स्वरा भास्कर, उर्मिला मातोंडकर, मीरा चोप्रा आणि पायल घोष यांनी प्रतिक्रिया देऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. दुसरीकडे अभिनेता रणवीर शौरी आणि गीतकार मनोज मुताशिर यांनी आरोपीला अटक करुन कडक शासन करावे अशी मागणी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन केली आहे. 

 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sona mohapatra said To everyone who keeps asking women to follow due process