सोनाली कुलकर्णी, विजय केंकरे वाचणार आपल्या आवडीचे काही!

टीम ई सकाळ
सोमवार, 12 जून 2017

चला, वाचू या’ या अभिवाचन उपक्रमाचा दुसरा वर्धापनदिन रविवार १८ जून रोजी सायंकाळी ७.४५ वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरच्या मिनी थिएटरमध्ये होत असून उपक्रमाच्या या १९ व्या पुष्पामध्ये प्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे, लेखक-दिग्दर्शक विवेक देशपांडे, अभिनेते ओंकार कुलकर्णी अभिवाचक म्हणून सहभागी होत आहेत.

मुंबई : उत्तम साहित्याची आवड निर्माण होऊन लोकांनी अभिरुचीपूर्ण वाचनाकडे वळावे, या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या व्हिजन आयोजित ‘चला, वाचू या’ या अभिवाचन उपक्रमाचा दुसरा वर्धापनदिन रविवार १८ जून रोजी सायंकाळी ७.४५ वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरच्या मिनी थिएटरमध्ये होत असून उपक्रमाच्या या १९ व्या पुष्पामध्ये प्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे, लेखक-दिग्दर्शक विवेक देशपांडे, अभिनेते ओंकार कुलकर्णी अभिवाचक म्हणून सहभागी होत आहेत. हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे.

जून २०१५ मध्ये ‘चला, वाचू या’ हा अभिवाचन उपक्रम सुरु झाल्यानंतर अल्पावधीतच त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. दर महिन्याला सलग उपक्रम स्वरुपात सुरु झालेला अभिवाचनाचा अशा प्रकारचा हा मुंबईतील पहिला उपक्रम आहे. आजवर या उपक्रमामध्ये ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर, अभिनेते व कवी किशोर कदम ‘सौमित्र’, संगीतकार कौशल इनामदार, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री स्मिता तांबे, वर्षा दांदळे, ज्येष्ठ साहित्यिका उषा मेहता, साहित्यिक अनंत भावे, अभिनेते विजय कदम, राजन ताम्हाणे, शैलेश दातार, अविनाश नारकर, श्रीरंग देशमुख, सीमा देशमुख, मिलींद फाटक, कौस्तुभ दिवाण, लेखक-दिग्दर्शक देवेंद्र पेम, पत्रकार सौमित्र पोटे, अभिनेते विजय मिश्रा, सुशील इनामदार, संदेश जाधव, शर्वाणी पिल्ले, केतकी थत्ते, मानसी कुलकर्णी, राज्याच्या भाषा संचालिका मंजुषा कुलकर्णी, निवेदिका सुलभा सौमित्र, अभिनेते चंद्रकांत मेहेंदळे, प्रसिध्द कवी व कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर, किरण येले, भक्ती रत्नपारखी, ज्येष्ठ चित्रकार व लेखक आशुतोष आपटे, लेखक-दिग्दर्शक कौस्तुभ सावरकर, वृत्तनिवेदिका प्राजक्ता धर्माधिकारी, शुभांगी सावरकर, हेमंत बर्वे, ज्येष्ठ लेखक रवी लाखे, पुणे एसएनडीटी कॉलेजच्या मराठी विभागप्रमुख डॉ. प्रिया जामकर, अभिनेते सचिन सुरेश, अभिजीत झुंजारराव, वृत्तनिवेदक विजय कदम, दीपक कदम आदींसह अनेक मान्यवरांनी यापूर्वीची अभिवाचन सत्रे गुंफली आहेत. ‘मॉंटुकले दिवस’ या राज्य साहित्य पुरस्कारप्राप्त लेखनाचे अभिवाचनही स्वत: लेखक संदेश कुलकर्णी व अभिनेत्री अमृता सुभाष यांनी केले आहे.

       साहित्यप्रसाराबरोबरच वाचिक अभिनयाकडेदेखील जाणीवपूर्वक लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत अनेकांना वाचनाकडे वळवण्यात आणि आवडीने पुस्तक खरेदी करुन ते वाचण्याची आवड निर्माण करण्यात आल्याचे आयोजक सांगतात. नव्या कलावंतांनादेखील या उपक्रमात अभिवाचन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या निमित्ताने वाचन चळवळ वृध्दींगत करण्याच्या उद्देशाने अभिवाचनाचे एक कायमस्वरुपी व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न असून. या कार्यक्रमास रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून उपक्रमाचा प्रसार व वृध्दी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन व्हिजनचे संचालक श्रीनिवास नार्वेकर यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonali kulkarni vijay kenkare chala vachu ya esakal news