अस्सल ग्रामीण बाजाचा प्रयोग...!

संभाजी गंडमाळे
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने खराखुरा अस्सल ग्रामीण बाज असलेला ‘हॅलो मी चेअरमन बोलतोय’ या नाटकाचा प्रयोग बुधवारी (ता. ५) भुयेवाडी (ता. करवीर) येथील संस्कार बहुउद्देशीय संस्थेच्या टीमनं सादर केला. दोन वर्षांपासून स्पर्धेत दचकतच प्रवेशिका भरणाऱ्या या टीमचा हा प्रयोग तितकाच रंगतदार झाला. 

राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने खराखुरा अस्सल ग्रामीण बाज असलेला ‘हॅलो मी चेअरमन बोलतोय’ या नाटकाचा प्रयोग बुधवारी (ता. ५) भुयेवाडी (ता. करवीर) येथील संस्कार बहुउद्देशीय संस्थेच्या टीमनं सादर केला. दोन वर्षांपासून स्पर्धेत दचकतच प्रवेशिका भरणाऱ्या या टीमचा हा प्रयोग तितकाच रंगतदार झाला. 

नाटक किमान तीस वर्षांपूर्वीचं. शामराव गोदडे यांनी लिहिलेलं. नाटकाचा विषय सहकार, साखरसम्राट, सामान्य शेतकरी आणि एकूणच सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारा. ग्रामीण ढंगातील नाटक म्हटलं की ते विनोदी आलंच आणि त्यातही लावणी व प्रसंगानुरूप चित्रपट गीतांचा वापरही ठरलेला. अर्थात, काळ बदलला तरी अजूनही अनेक गावांत, वाड्या-वस्त्यांवर अशा नाटकांची ‘क्रेझ’ कायम आहे. 

रंगमंचावर भव्य पडद्यांच्या पार्श्‍वभूमीवर ही नाटकं साकारली जातात. असाच अनुभव ‘हॅलो मी चेअरमन बोलतोय’ नाटकानं यंदाच्या स्पर्धेतही दिला. मूळ तीन अंकी नाटक स्पर्धेच्या नियोजित वेळेत सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न भुयेवाडीच्या या हौशी मंडळींनी केला. नाटकातलं प्रचलित कुठलंही शिक्षण नाही किंवा अगदी एखादं शिबिरही यातल्या कुणी कधी केलेलं नाही. आपापली शेती, सेंट्रिंग-फरशी व्यवसाय, ‘एमआयडीसी’तील नोकरी सांभाळून त्यांनी जपलेलं नाटकाचं हे वेडच खऱ्या अर्थानं ‘हौशी’ नाही तर मग काय? चेअरमन साकारणारे विजय साठे यांच्यासह सर्वांनीच आपापल्या भूमिका अधिक खुलविण्यात घेतलेले प्रयत्न साऱ्या नाटकभर जाणवत होते. 

पांडुरंग पाटील यांचं दिग्दर्शन, रघुनाथ लेले यांचे नेपथ्य, राजेंद्र शिंदे यांची रंगभूषा, सरदार पाटील यांची प्रकाश योजना, आनंद ढेरे यांचे संगीत या साऱ्या तांत्रिक बाजूही प्रयोग अधिक रंगतदार करण्यात तितक्‍याच पूरक ठरल्या. मुळात आजही ग्रामीण भागात कुठेही नाटक करायचं म्हटलं की या नाटकाला अधिक पसंती मिळते. मात्र, त्याच्याही पुढे जाऊन आता नव्या पिढीने रंगभूमीवरील विविध बदलते प्रवाह जाणून घेऊन ते आत्मसात करायला हवेत, हे नक्की.

पात्र परिचय
 विजय साठे (चेअरमन), सागर गराडे (राजू), प्रसन्न इंगळे (विश्‍वास), रोहित पाटील (लखोजी), वसंत शिंदे (तलाठी), दस्तगीर बोंबडे (तुकाराम), गीता पाठक (अंजू), रोमा (विठा).
 निर्माता- महादेव चौगले
 सूत्रधार- बी. जे. पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Drama Competition