वर्तमानाचा वेध घेणारं नाटक..!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

राज्य नाट्य स्पर्धेच्या २०व्या दिवशी हलकर्णीच्या श्री साई नाट्यधारा मंडळाने ‘अशुद्ध बीजापोटी’ हा वर्तमानाचा वेध घेणारा सुंदर प्रयोग सादर केला. केदार देसाई यांच्या लेखणीतून साकारलेल्या या नाटकातून सद्यःस्थितीवर प्रकाश टाकताना माणसाने माणसाशी माणसासम्‌ वागणे असा संदेश मिळाला.

राज्य नाट्य स्पर्धेच्या २०व्या दिवशी हलकर्णीच्या श्री साई नाट्यधारा मंडळाने ‘अशुद्ध बीजापोटी’ हा वर्तमानाचा वेध घेणारा सुंदर प्रयोग सादर केला. केदार देसाई यांच्या लेखणीतून साकारलेल्या या नाटकातून सद्यःस्थितीवर प्रकाश टाकताना माणसाने माणसाशी माणसासम्‌ वागणे असा संदेश मिळाला.

रवींद्र कर्णिक या प्राध्यापकाच्या कुटुंबात कथानक घडतं. अर्थात हे कुटुंब वर्तमानातील सामाजिक परिस्थितीचं प्रतिनिधित्व करतं. रवींद्र कर्णिकांनी सफिना या मुस्लिम मुलीशी विवाह केलेला असतो व त्यांना एक मुलगी असते. काही तरी निमित्त घडतं आणि सफिना आणि सासूबाईंमध्ये वाद होतो. याच दरम्यान गावात हिंदू-मुस्लिम वादालाही तोंड फुटलेलं असतं.

या साऱ्या पार्श्‍वभूमीवर हे नाटक पुढे साकारतं. एकूणच संवादानं कुठलाही प्रश्‍न सुटू शकतो, असं या नाटकातून लेखकाला सांगायचं आहे आणि परसू गावडे यांच्या दिग्दर्शनाखाली ‘साई’च्या टीमनं ते तितक्‍याच ताकदीनं सांगितलं. सर्वच कलाकारांचा रंगमंचावरील वावर खूपच सहज आणि आत्मविश्वासपूर्वक. अर्थात सर्व कलाकारांच्या अभिनयासह तांत्रिक बाजूंनीही तितकीच सुरेख साथ दिली. राज्य नाट्य स्पर्धा आता सांगतेकडे निघाली असून आणखी ३ प्रयोगांची पर्वणी रसिकांना मिळणार आहे. 

गुरुवार (ता. १३) पर्यंत स्पर्धा रंगणार आहे. एकूणच स्पर्धेनंतर निकालाची उत्सुकता असेल आणि स्पर्धा संपताच दोन-तीन दिवसांतच ती संपेलही. निकाल काहीही असला तरी मात्र स्पर्धेतील २४ संघांपैकी किमान आठ ते दहा संघांनी नाटकांचे पुन्हा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला असून काही नाटकांची विविध महोत्सवांसाठी निवडही झाली आहे. 

पात्र परिचय
 विजयकुमार मोरे (रवी), प्रियदर्शनी खांडके-मोरे (सफिना), मीरा आजगांवकर (दादी), आत्माराम पाटील (सत्यवान), विनया गावडे (सावित्री), सुधाकर पाटील (जोशी), परसू गावडे (अल्ताफ), जान्हवी तुळपुळे (जीया, बालकलाकार).  नेपथ्य व प्रकाश योजना ः विनायक सावर्डेकर  रंगभूषा ः लक्ष्मी शेळके, सुदर्शन शेळके, विजय मोरे  रंगमंच व्यवस्था ः राम गुरव, उमेश पाटील, महादेव कांबळे, एकनाथ बांदिवडेकर, अशोक देसाई.  निर्माती ः प्रा. गीतांजली पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Drama competition