सफाईदार प्रयोग ‘ऱ्हासपर्व’

संभाजी गंडमाळे
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

अडीच हजार वर्षांपूर्वीचं ‘आन्तिगॉन’, शेक्‍सपिअरचं ‘हॅम्लेट’ अशा कलाकृतींचं शिवधनुष्य राज्य नाट्य स्पर्धेत लीलया पेलणाऱ्या परिवर्तन कला फाऊंडेशनच्या टीमनं यंदाही ‘ऱ्हासपर्व’ या नाटकाचा सफाईदार प्रयोग सादर केला.

अडीच हजार वर्षांपूर्वीचं ‘आन्तिगॉन’, शेक्‍सपिअरचं ‘हॅम्लेट’ अशा कलाकृतींचं शिवधनुष्य राज्य नाट्य स्पर्धेत लीलया पेलणाऱ्या परिवर्तन कला फाऊंडेशनच्या टीमनं यंदाही ‘ऱ्हासपर्व’ या नाटकाचा सफाईदार प्रयोग सादर केला. अठराव्या शतकातील शेवटची पंचवीस वर्षे आणि पुढे एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला फ्रेंच राज्यक्रांती नेमकी कोणत्या वाटचालीतून पुढे गेली आणि पुढे येथे नेपोलियनची हुकूमशाही प्रस्थापित होईपर्यंतच्या काळावर हे नाटक बेतलं आहे आणि ते तितक्‍याच ताकदीनं ‘परिवर्तन’च्या टीमनं सळसळत्या ‘टीम स्पिरीट’चा अनुभव देत रंगमंचावर साकारलं.  

‘परिवर्तन’च्या टीमने यापूर्वी ‘आन्तिगॉन’ साकारले आणि त्याचे स्पर्धेनंतरही पुढे प्रयोग केले. शेक्‍सपिअरचे ‘हॅम्लेट’ स्पर्धेत सादर केल्यानंतर गेल्या वर्षी याच नाटकाची कटक (ओडिशा) येथे झालेल्या जागतिक नाट्य महोत्सवासाठी निवड झाली आणि या महोत्सवात या नाटकानं तीन पुरस्कारांवर मोहोरही उमटवली. अर्थात या टीमकडून यंदाच्या स्पर्धेतही अपेक्षा वाढल्या होत्या आणि स्पर्धा सांगतेकडे निघाली असताना लेखक विद्यासागर अध्यापक लिखित ‘ऱ्हासपर्व’च्या दमदार प्रयोगाची पर्वणी नक्कीच रसिकांना दिली.  

फ्रान्सचा राजा लुई १६ वा आणि राणी मारिया यांच्या राजेशाहीविरूद्ध निर्माण झालेल्या जनक्षोभातून राजा आणि राणीवर होणाऱ्या टोकाच्या टीका. त्याला कंटाळून राजा लुई १६ वा राजेपदाचाच त्याग करतो आणि पुढे कुटुंबीयांची सुरक्षितता म्हणून पत्नी व मुलांसह ऑस्ट्रियाला जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तो अयशस्वी ठरतो. त्याच्यावर खटला भरला जातो. पुढे राजा व राणीसह त्यांच्या हस्तकांचा गिलोटीनखाली शिरच्छेद करून राजेशाही संपुष्टात आणली जाते. १३ ते १४ पक्षांच्या सरकारचे नेतृत्व करणाऱ्या रॉबेस्पिअरसह इतर लोकशाहीवादी नेत्यांचेही हत्याकांड घडते आणि नेपोलियनची हुकूमशाही प्रस्थापित होते. एकूणच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही लोकशाहीची त्रिसूत्री जगाला देणाऱ्या फ्रेंच राज्यक्रांतीचा हा सारा रक्तरंजित प्रवास नाटकातून घडतो.   

 दिग्दर्शक ः किरणसिंह चव्हाण
 प्रकाशयोजना ः रविदर्शन कुलकर्णी, सुनील फाटक
 पार्श्‍वसंगीत ः श्रेयस मोहिते
 नेपथ्य ः ओंकार कोळेकर
 नृत्य दिग्दर्शन ः विशाल पाटील
 रंगभूषा ः सदानंद सूर्यवंशी
 कला ः राजेश शिंदे
 वेशभूषा ः दीपक महाडिक
 केशभूषा ः भाग्यश्री पारखे
 रंगमंच व्यवस्था ः विनय गोखले, अभिनव कुरणे, सागर भोसले

पात्र परिचय
 स्नेहल बुरसे (मारिया), सत्यजित साळोखे (राजा लुई), महेश भूतकर (रॉबेस्पेअर), हेमंत धनवडे (फरसन), धनंजय पाटील (लाफायत), पी. सागरन (डांटेन), प्रमोद पुजारी (देमुल), मारुती माळी (फादर एबर), मयूर कर्णिक (लाबार्द व पत्रकार), केदार अथणीकर (मार्टिन), सोहम चव्हाण (तुरुंगाधिकारी व पत्रकार), सलील पठाण (वाटसरू व व्हिक्‍टर), धीरेन पाटील (राजपुत्र), मृणाल पाटील (राजकन्या), अक्षय व्हनबट्टे, ओंकार पाटील, ओंकार मसराणकर, सौरभ सुतार (सैनिक), श्रद्धा आंबेकर (सेविका), ओंकार वर्णे, श्रीशैल फारणे, रितेश जाधव, अमोल कोल्हे, विनायक माळी, संकल्प माळी, मिलिंद साखरे, सूरज कोळी, सिद्धू उटगी (शेतकरी व नागरिक).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Drama competition