भारताच्या पहिल्या स्पोर्ट बाईकची कहाणी

भारताच्या पहिल्या स्पोर्ट बाईकची कहाणी

मुंबई : भारतात तयार करण्यात आलेली राजदूत ही त्या काळची सर्वांत वेगवान आणि मजबूत बाईक म्हणून ओळखली जात होती. भारताची पहिली स्पोर्ट बाईक असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशी बाईक. राजदूत अगदी कमी वेळेत शहरासह खेड्यापाड्यांतही वेगाने धावली आहे.

१९६० च्या दशकात सर्वसाधारण बाईक सोडल्या, तर प्रत्येकाची पसंती दमदार अशा बुलेट या बाईकलाच होती. १९३१ मध्ये बाजारात आलेली बुलेट संपूर्ण बाईकच्या बाजारात एकटी राज्य करत असतानाच १९६२ मध्ये एस्कॉर्टस्‌ या भारतीय कंपनीने १७५ सीसीचे इंजिन असणारी पॉलिश्‍ड कलरमध्ये रंगलेली बाईक बाजारात आणली, हीच ती राजदूत. सुरुवातीच्या काळात ग्राहकांची काही खास पसंती राजदूतला मिळाली नाही.

सर्वत्र बुलेटचीच चर्चा असल्याने अधिक पसंती ही बुलेटलाच मिळत होती; मात्र त्याच वेळेस प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांनी बॉलीवूडमध्ये ‘बॉबी’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटातून एण्ट्री घेतली. या चित्रपटात त्यांनी राजदूत वापरली. त्या वेळेस बॉबी हा प्रेक्षकांच्या इतका पसंतीस पडला, की अक्षरश: हाऊसफुल झाला आणि त्याचबरोबर त्यात वापरण्यात आलेली राजदूतही लोकांना इतकी आवडली, की प्रत्येक जण ऋषीने वापरलेली बाईकच हवी असे म्हणत असल्याने राजदूत प्रसिद्धीच्या झोतात आली. बघता बघता राजदूतची विक्री चांगलीच वाढली आणि भारतीय बाजारात बुलेटला टक्कर देण्यासाठी राजदूत सज्ज झाली.

हळूहळू काळ पुढे गेला तशी राजदूत १७५ ची पसंती कमी होऊ लागली. बुलेटच्या दमदार इंजिनसमोर १७५ सीसीची राजदूत फिकी पडू लागली. ज्यामुळे १९८३ मध्ये एस्कॉर्टस्‌ कंपनीने यामाहा या जपानी कंपनीसोबत करार करत ‘राजदूत ३५०’ बाईक तयार केली. आधीच्या राजदूतच्या दुप्पट ताकदीची तब्बल ३५० सीसीचे इंजिन असणारी ‘राजदूत ३५०’ भारतीय बाजारात आली आणि काही काळातच प्रचंड लोकप्रिय झाली.

यामाहा कंपनीच्या १९७३ मध्ये तयार करण्यात आलेल्या ‘यामाहा आरडी ३५०’ या बाईकमध्ये काही बदल करून ‘राजदूत ३५०’ तयार करण्यात आली होती. १६ लीटरचे इंजिन असणाऱ्या या बाईकचे वजन १५० किलोच्या आसपास होते. त्यामुळे बुलेटच्या तुलनेत ही बाईक हलकी होती. तसेच आधुनिक तंत्रज्ञानातून तयार करण्यात आलेली ही बाईक मायलेजसाठीदेखील चांगली होती. त्यामुळे बुलेटहून कमी पेट्रोलमध्ये अधिक प्रवास करता येणारी राजदूत ग्राहकांना अधिक आवडली. असेही म्हटले जाते, की एक काळ असा होता, जेव्हा राजदूत ३५० ने बुलेटलादेखील मागे टाकले होते. हा काळ राजदूतसाठी सुवर्णकाळ मानला जातो. वेगवान आणि दिसायलाही हट के असल्याने तरुणांची या बाईकला विशेष पसंती दिसून येत होती. तसेच खडतर रस्त्यांवरदेखील सुसाट चालत असल्याने मजबूत राजदूत ही शहरांसह खेडेगावातील लोकांच्याही पसंतीस पडत होती. त्यामुळे शहर आणि गाव अशा दोन्ही जागी राजदूत ३५० रस्त्यांवर राज्य करताना दिसून येत होती. राजदूत ही गावांतील खडकाळ रस्त्यांवरदेखील चांगल्या प्रकारे चालत असल्याने त्या वेळेस सरकारने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना वापरण्यासाठी राजदूत बाईकच दिली होती. दूधविक्रेतेदेखील दुधाचे भलेमोठे कॅन घेऊन जाण्यासाठी राजदूतचाच उपयोग करत. पाच ते सहा संपूर्ण भरलेले कॅन बाईकला अडकवूनदेखील राजदूत अजिबात रस्ता सोडत नसे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आणि दिसायला हट के असल्याने तरुणांत आणि वापरायला मजबूत असल्याने सर्वच स्तरांत राजदूत लोकप्रिय झाली. त्यामुळे ८० च्या दशकात एकाच वेळी हजारो राजदूत भारतीय बाजारात विकल्या गेल्या होत्या; मात्र जसजसा काळ पुढे सरकला, तंत्रज्ञानात नवीन शोध लागत गेले आणि बाजारात नव्या बाईक आल्या, राजदूतपेक्षा आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या या बाईकची किंमतदेखील कमी असल्याने ग्राहक या नव्या बाईक अधिक विकत घेऊ लागले. त्यातच राजदूतचे स्पेअर पार्टस्‌ही महाग असल्याने सामान्यांना ही बाईक वापरणे अवघड होऊ लागले. बाजारत राजदूतची विक्री कमी होऊ लागल्याने हळूहळू राजदूतचे उत्पादनही कंपनीने कमी केले. एकेकाळी रस्त्यांवर वेगात धावणारी राजदूत दिसेनाशी झाली.

सध्या अत्यल्प लोकांकडे राजदूत असून, त्यातही बाईक संग्रहित करून ठेवणाऱ्यांचा अधिक समावेश आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी याच्याकडे राजदूत ही बाईक असून, त्याच्या बाईकच्या संग्रहात त्याने ही बाईक सांभाळून ठेवली आहे.

web title :The story of India's first sports bike

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com