'पती गेले ग काठेवाडी' संगे रंगला 'ई सकाळ'चा 'अंक तिसरा'!

सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास या चर्चेला सुरूवात झाली. या नाटकातल्या गायक कलाकारांनी खणखणीत नांदी म्हणून अत्यंत सुरेल सुरूवात करून दिली. त्यानंतर मात्र ही चर्चा रंगत गेली. हा लाईव्ह चॅट सुरू असतानाच या नाटकाचे निर्माते सुनील बर्वे यांनी या  लाईव्हमध्ये सहभाग घेऊन सर्वांनाच धक्का दिला. मग या मैफलीत सुनील बर्वेही सामील झाले. 

पुणे : व्यंकटेश माडगुळकरांनी साधारण साठच्या दशकात लिहिलेलं नाटक आता पुन्हा रंगमंचावर आलं आहे. अभिजीत खांडकेकर, ललित प्रभाकर, मृण्मयी गोडबोले, ईशा केसकर आणि निखिल रत्नपारखी अशी मंडळी या नाटकात काम करतायतं. हे नाटक खुसखुशीत आहेच, पण हे एक संगीत नाटक आहे. यात नांदी आहे. काही पदं आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं यात लाईव्ह संगीत वाजवलं आणि गायलं जातं. या नाटकाची संपूर्ण टीम ई सकाळ दर रविवारी घेत असलेल्या अंक तिसरा या उपक्रमात सहभागी झाली. बालगंधर्व नाट्यगृहात रंगलेल्या या लाईव्ह चर्चेत नाटकाबद्दलची माहीती मिळालीच. पण नाटकापलिकडे कलाकारांचं एकमेकांशी असलेलं बाॅंडिंग, नाटक साकारताना असलेली आव्हानं, नाटकाची मॅनेजमेंट असे अनेक मुद्दे चर्चेत आले आणि रंगले. 

संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास या चर्चेला सुरूवात झाली. या नाटकातल्या गायक कलाकारांनी खणखणीत नांदी म्हणून अत्यंत सुरेल सुरूवात करून दिली. त्यानंतर मात्र ही चर्चा रंगत गेली. हा लाईव्ह चॅट सुरू असतानाच या नाटकाचे निर्माते सुनील बर्वे यांनी या  लाईव्हमध्ये सहभाग घेऊन सर्वांनाच धक्का दिला. मग या मैफलीत सुनील बर्वेही सामील झाले. 

पती गेले ग काठेवाडी #Live 

अभिजीत खांडकेकरने एक तरूण कलाकारांचा प्रतिनिधी म्हणून हे नाटक का स्वीकारावं वाटलं ते सांगितलं. शिवाय या नाटकााची बलंस्थानं सांगितली. या नाटकात वापरली गेलेली भाषा, त्याचा उच्चार, पात्र साकारताना ठेवावं लागणारं भान यावर ईशा, मृण्मयी, ललित बोलते झाले. यात एक गमतीदार किस्साही घडला. प्रयोग सुरू असताना मृण्मयीला अचानक आलेली खोकल्याची उबळ आणि तिला सर्वांनी कसं सामावून घेतलं यावरचा एक धमाल किस्सा ईशाने शेअर केला. 

या गप्पांमध्ये नाटकाच्या व्यवस्थापनाचाही मुद्दा आला.. 

या गप्पांमध्ये अधेमधे संगीताची पेरणी होत होतीच. जवळपास पाऊणतास चाललेल्या या लाईव्ह सेशनची सांगताही झाली ती सुंदर गाण्याने. नाटकाच्या संपूर्ण टीमने या गाण्यात सहभाग घेऊन धमाल उडवून दिली. या नाटकाचे केवळ 25 प्रयोगच होणार असून, लवकरच नागपूर, कोल्हापूर भागात या नाटकाचा प्रयोग होणार आहे. 

Web Title: subak pati gele ga kathewadi ank tisara by soumitra pote esakal news