मराठी चित्रपटांची महिनाभरात 60 कोटींची कमाई

काजल डांगे
सोमवार, 10 डिसेंबर 2018

मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ या चारही चित्रपटांनी यशाचा चौकार मारला.

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ या चारही चित्रपटांनी यशाचा चौकार मारला. या चित्रपटांनी महिनाभरातच एकूण 50 ते 60 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. या चित्रपटांच्या यशामुळे मराठी चित्रपटांच्या निर्मितीला आणखी वेग येईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट 8 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. ‘नाळ’ 16 नोव्हेंबरला, ‘मुळशी पॅटर्न’ 23 नोव्हेंबरला आणि 7 डिसेंबरला ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

या चारही चित्रपटांनी बॉक्‍स ऑफिसवर जोरदार मुसंडी मारत हिंदी चित्रपटांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. दमदार कथानक, उच्च निर्मितीमूल्ये, कसदार अभिनय यामुळे या चित्रपटांनी प्रेक्षकांना आकर्षित केले. ‘नाळ’ व ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटांनी आतापर्यंत 20 कोटींहून अधिक उत्पन्न मिळविले आहे. ‘मुळशी पॅटर्न’ने आतापर्यंत 13 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ या चित्रपटाने तीन दिवसांत चार कोटी रुपयांची कमाई केली आहे.

या यशाच्या आधारावर आपण पुढील वर्ष सुरक्षित करायला हवे. त्यासाठी सर्व निर्मात्यांनी एकत्र आले पाहिजे. चित्रपटांच्या तारखा क्‍लॅश होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. आशय चांगला असेल, तर मराठी प्रेक्षक चित्रपट उचलून धरतो. हिंदी चित्रपटांपेक्षा आज आपण सरस ठरलो आहोत, याचे कारण हेच आहे.
- सतीश राजवाडे, दिग्दर्शक, ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’

या चारही चित्रपटांचे विषय वेगळे आहेत. त्यातील दोन चित्रपटांमागे मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत. हे सर्व चित्रपट उत्तम चालले. एकाच महिन्यात चार चित्रपट यशस्वी होणे, ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी पहिलीच वेळ आहे. ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने वेगळा प्रेक्षकवर्ग खेचून आणला. हा मराठी प्रेक्षकांचा विजय आहे. 
- प्रवीण तरडे, दिग्दर्शक, ‘मुळशी पॅटर्न’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success of four Marathi Films income of 60 crores