फरहान अख्तरच्या 'रॉकस्टार' तर विशाल-शेखरच्या 'स्वॅग'वर तरुणाई बेधुंद

रविवार, 29 एप्रिल 2018

'केसरिया बालम' आणि 'झेहनसिब...' या गाण्याने तर शेखरने तरुण-तरुणींना प्रेमाच्या गुलाबी दुनियेची सैर घडवली.

पुणे (बालेवाडी) - 'ख्याबो तुम दिलो की बेताबिया लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम...' या कवितांच्या ओळी म्हणत फरहान अख्तर याने स्टेजवर 'रॉकस्टार'वाली एन्ट्री मारली अन्‌ सारी तरुणाई त्याच्या तालावर बेधुंद नाचायला लागली... 'रॉक ऑन' असो वा 'हवन करेंगे' गाणं... प्रत्येक गाण्यावर तोही नाचत होता अन्‌ त्याच्या सोबतीला तरुणाईही... सळसळता युवाजोश आणि फरहानची गाणी असं रॉकिंग कॉम्बिनेशन येथे शनिवारी जमलं होतं... तर संगीतकार विशाल आणि शेखर यांच्या परफॉर्मन्सवरही तरुणाईने एकच जल्लोष केला. त्यांच्या परफॉर्मन्सवर हात उंचावत तरुणाईही नाचली. 

लिनन किंग प्रस्तुत आणि पावर्ड बाय सुझुकी इन्ट्रयुडर 'सकाळ टाइम्स समरसॉल्ट 2018 कॉन्सर्ट'मध्ये फरहान अख्तर आणि बॅंन्ड तसेच संगीतकार विशाल आणि शेखर यांच्या जोडीने तरुणाईला स्वतःच्या तालावर नाचवले. स्टेजवर फरहानने एन्ट्री करताच तरुणाईचा जल्लोष सुरू झाला, तो त्याचा परफॉर्मन्स संपेपर्यंत कायम होता... कधी तो नाचत होता, तर कधी गिटार वाजविणारे रॉकस्टार... जसजशी फरहान आणि बॅंन्ड गाणी सादर करत होते, त्या तालावर तरुणाईही नाचत होती. 'आसमा है नीला नीला क्‍यू...' या गाण्याने फरहानने कॉन्सर्टला सुरवात केली. 

'रॉक ऑन'मधले 'सिंबा द सेलर... ना ना ना' अशी बहारदार गाणी त्याने सादर केली. 'हा दिल की सून ली मैने... सोचा है' अशा एका मागोमाग एक रॉकिंग परफॉर्मन्स करत फरहानने ही संध्याकाळ गाजवली. 'काय पुणेकर... लेट्‌स रॉक' असं म्हणत फरहान आणि त्याच्या बॅंन्डने जवळजवळ एक तास तरुणाईला आपल्या या कॉन्सर्टमध्ये झिंगवले. फरहान... फरहान अशी हाक देत उत्साही तरुणाईने कॉन्सर्टचा आनंद लुटला. 

फरहाननंतर विशाल-शेखर यांचे परफॉर्मन्स रंगले. त्यांनी सुरवातीला सादर केलेल्या 'स्वॅग से करेंगे सब का स्वागत...' 'सलाम नमस्ते....' 'दस बहाने करके ले गया दिल' या गाण्यांवर पुणेकर नाचले. शेखर याने गायिलेलं 'साजणी' हे मराठी गाणं बरच गाजलं होतं. हे त्याचं पहिलं मराठी गाणं आहे. 'साजणी'च्या दोनच ओळी त्याने गायिल्यावर पुणेकरांनी एकच जल्लोष केला. विशाल-शेखर यांच्या गीतांवर मोबाईलचे फ्लॅश ऑन करत त्या उजेडातही तरुणाई नाचताना दिसली. त्यानंतर 'केसरिया बालम' आणि 'झेहनसिब...' या गाण्याने तर शेखरने तरुण-तरुणींना प्रेमाच्या गुलाबी दुनियेची सैर घडवली. 'दिल ये मेरा तुमसे कुछ केह रहा है सुनो ना...' 'जो भेजी थी दुआ, वो जाके आस्मा से यू टकरा गयी...' अशा शेखरच्या गाण्यांनी तर तरुणाईला वेड लावले. त्यानंतर आलेल्या विशालने 'मल्हारी...', 'बलम पिचकारी...', 'नशे सी चड गयी ओय...', 'बेबी को बेस पसंद है...', 'उडे दिल बेफिकरे...' गाण्यांवर तरुणाईला थिरकवले. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक लिनन किंग, सहप्रायोजक सुझुकी इन्ट्रयुडर, तर फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आहेत. 

आज रविवारी (ता. 29) 'सकाळ टाइम्स समरसॉल्ट 2018'मध्ये बॉलिवूडचे गायक मिका सिंग व रॅपर बादशाह यांची गाजलेली धमाल गाणी ऐकायला मिळणार आहेत. या कॉन्सर्टची तिकिटे म्हाळुंगे- बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सकाळी अकरा वाजल्यापासून, तर bookmyshow.com वर सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपलब्ध असतील. 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: summersault live concert in pune farhan akhtar vishal and shekhar