esakal | Sushant Singh Case : आतापर्यंत काय घडलं? समजून घ्या संपूर्ण टाइमलाइन
sakal

बोलून बातमी शोधा

Sushant Singh Rajput

Sushant Singh Case : आतापर्यंत काय घडलं? समजून घ्या संपूर्ण टाइमलाइन

sakal_logo
By
स्वाती वेमूल

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांनी मनं जिंकलेल्या आणि टेलिव्हिजनपासून मोठ्या पडद्यापर्यंतच्या प्रवासाने चाहत्यांना थक्क करणाऱ्या अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या Sushant Singh Rajput मृत्यूला वर्ष पूर्ण झालं. १४ जून २०२० रोजी मुंबईतल्या राहत्या घरी सुशांतचा मृतदेह आढळला. त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. एकीकडे सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करतेय, तर दुसरीकडे त्याच्या मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज अँगलचा तपास एनसीबी करतेय. आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणात नेमकं काय काय घडलं, ते जाणून घेऊयात.. (sushant singh death case what happened till now know the complete timeline)

१४ जून २०२०- मुंबईतल्या वांद्रे इथल्या राहत्या घरी सुशांतचा मृतदेह आढळला. या वृत्ताने संपूर्ण बॉलिवूड आणि सुशांतच्या चाहतावर्गात खळबळ माजली. सुशांतच्या मृत्यूची बातमी त्याच्या घरी काम करणाऱ्याने पोलिसांना आधी कळवली. एकीकडे देशभरात कोरोना महामारी पसरत होती आणि दुसरीकडे सुशांतच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.

१५ जून २०२०- मुंबईतल्या पवनहंस स्मशानभूमीत सुशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याचदरम्यान अभिनेत्री कंगना राणावतने सुशांतच्या मृत्यूवर प्रश्न उपस्थित केले. सुशांतची मानसिक स्थिती चांगली होती, अशा परिस्थितीत तो आत्महत्या करूच शकत नाही, असा दावा कंगनाने केला होता. याचदरम्यान सुशांतचे भावोजी ओपी सिंह यांनी त्याच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

१६ जून २०२०- भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी सुशांतच्या मृत्यूप्रकरणामागे मोठा कट रचल्याचा संशय व्यक्त केला आणि उच्चस्तरीय तपासणीची मागणी केली.

१८ जून २०२०- सुशांतची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीने पोलिसांकडे तिचा जबाब नोंदवला. सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच रियाने त्याच्यासोबतचे सर्व पोस्ट सोशल मीडियावरून डिलिट केले होते.

१९ जून २०२०- सोशल मीडियावर सुशांतच्या मृत्यूप्रकरणी विविध तर्कवितर्क लढवले जात होते. याचदरम्यान इंडस्ट्रीतील घराणेशाहीचा मुद्दा चर्चेत आला. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सलमान खान, एकता कपूर यांच्यावर सुशांतच्या चाहत्यांनी निशाणा साधला. देशभरातील विविध भागांमध्ये निदर्शनेसुद्धा झाली.

२४ जून २०२०- सुशांतची पोस्टमॉर्टम रिपोर्ट सार्वजनिक केली गेली. यात सुशांतच्या शरीरावर कोणतेही डाग किंवा स्ट्रगल मार्क्स कुठेच आढळले नाहीत.

२५ जून २०२०- भाजपा खासदार रुपा गांगुली यांनी सुशांतच्या मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली.

४ जुलै २०२०- सुशांतचे वडील केके सिंह यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली.

६ जुलै २०२०- प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला.

१४ जुलै २०२०- अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित सुशांतविषयीचं प्रेम व्यक्त केलं.

१६ जुलै २०२०- रियाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली.

२४ जुलै २०२०- सुशांतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरभरून कौतुकाचा, प्रेमाचा वर्षाव केला.

२९ जुलै २०२०- सुशांतच्या वडिलांनी पाटणातील राजीव नगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली.

२९ जुलै २०२०- सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्याची मागणी रियाने सुप्रीम कोर्टात केली.

२९ जुलै २०२०- बिहार पोलीस तपासासाठी मुंबईत पोहोचली. मात्र तपासावरून मुंबई आणि बिहार पोलिसांमध्ये मतभेद दिसून आले.

३० जुलै २०२०- अंमलबजावणी संचालनालयने (ईडी) बिहार पोलिसांकडून पुरावे घेतले आणि तपास सुरू केला.

५ ऑगस्ट २०२०- केंद्र सरकारने सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा अशी शिफारस केली.

१० ऑगस्ट २०२०- रिया चक्रवर्तीने मीडिया ट्रायलविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

१९ ऑगस्ट २०२०- सुप्रीम कोर्टाने सुशांत प्रकरणाचा सीबीआय तपास करण्यात यावा, असे आदेश दिले. त्यानंतर सीबीआयने या प्रकरणाशी संबंधित सर्व पुरावे एकत्र केले आणि तपास सुरू केला.

२६ ऑगस्ट २०२०- अमलीपदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) ड्रग्ज अँगलचा तपास सुरू केला.

२७ ऑगस्ट २०२०- सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर सुशांतच्या हत्येचे आरोप केले.

२८ ऑगस्ट २०२०- सीबीआयकडून अनेक तास रिया चक्रवर्तीची चौकशी झाली.

४ सप्टेंबर २०२०- एनसीबीने रिया आणि तिचा भाऊ शौविक यांना अटक केली. सोबतच सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडालाही अटक झाली.

२३ सप्टेंबर २०२०- एनसीबीने ड्रग्ज अँगलचा तपास करताना अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंह यांचीही चौकशी केली.

५ ऑक्टोबर २०२०- एम्स दिल्लीच्या मेडिकल बोर्डने सुशांतच्या मृत्यूच्या कारणांचा रिपोर्ट सीबीआयकडे सोपवला. सुशांतने आत्महत्या केली, असं या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं.

८ ऑक्टोबर २०२०- चार आठवडे भायखळा कारागृहात राहिल्यानंतर रिया चक्रवर्तीची जामिनावर सुटका झाली.

९ नोव्हेंबर २०२०- एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अभिनेता अर्जुन रामपालच्या वांद्रे इथल्या घरावर धाड टाकली.

५ मार्च २०२०- एनसीबीने तब्बल ५२ हजार पानी चार्जशीट दाखल केली. यात रिया आणि शौविकसह इतर ३३ जणांच्या नावांचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आला होता.

२८ मे २०२१- सुशांतचा रुममेट सिद्धार्थ पिठानीला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली.

सुशांतच्या मृत्यू प्रकरणात अद्याप सीबीआयने चार्जशीट दाखल केली नाही.

loading image
go to top