
काही दिवसांपासून सुशांतसिंह "डिप्रेशन'मध्ये असल्याच्या बातम्या कानावर येत होत्या. चित्रपटातून समाजाला जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा सल्ला देणाऱ्या सुशांतने आत्महत्या करावी? म्हणजेच, "रिल' आणि "रिअल लाईफ' याची जोड त्यालाही देता आली नाही..
नगर ः ""जिंदगी में जीतने की कोशिश सभी करते हैं.., करनी भी चाहिए.., लेकिन अगर किसी कारण से जीत नहीं पाए, तो उसके बाद क्या..?'' "छिछोरे' या हिंदी चित्रपटातील "अन्नी'च्या (सुशांतसिंह राजपूत) तोंडी असलेला हा डायलॉग. "उसके बाद क्या..?' या प्रश्नाचं उत्तर कोणीच शोधत नाही. सुशांतसिंग गेला परंतु त्याने विचारलेला प्रश्न कायम ठेवून. नैराश्य आल्यानंतर एक कॉमन मॅन जो करतो तेच त्यानेही केलं...
परीक्षेत आलेल्या अपयशामुळे "अन्नी'चा मुलगा इमारतीवरून खाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. मात्र, तो उपचाराला कसलाही प्रतिसाद देत नाही. त्यावर डॉक्टर सांगतात, की मुळात त्याला जगण्याचीच आस नाही. त्यामुळे आमचे उपचारही त्याला बरे करू शकत नाहीत. मुलामध्ये पुन्हा एकदा जगण्याची आस निर्माण व्हावी. त्याने आयुष्याकडे एका सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे, यासाठी "अन्नी' मुलाला त्याची स्वत:ची आणि त्याच्या मित्राची, जे कधी काळी कॉलेजमध्ये मोठे "लुजर' म्हणून ओळखले जात असतात, त्यांचीच कहाणी सांगण्याचा निर्णय घेतो. त्यासाठी तो कॉलेज जीवनातील जीवलग मित्रांनाही दवाखान्यात बोलावितो.. आणि येथून सुरू होते "छिछोरे' चित्रपटाची कहाणी... "लुजर' ते "विनर' बनण्यापर्यंतचा प्रवास.. शेवट अर्थातच सुखात्म होतो...
हेही वाचा - आत्महत्येचे धक्के सोसणारे बॉलीवूड...गुरूदत्त ते सिल्स स्मिता
"दंगल' चित्रपटाचे निर्देशक नीतेश तिवारी यांनी "छिछोरे' चित्रपटातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. आत्महत्या हे कोणत्याही प्रश्नावरचं उत्तर असू शकत नाही. जीवनात प्रत्येकासमोर समस्या, अडचणी, मानसिक तणाव असतोच, किंबहूना तो कधी ना कधी येतोच..; पण त्यामुळे खचायचं नसतं...त्यातून मार्ग काढत पुढे जायचं असतं...
नेहमीप्रमाणे दुपारी दोनच्या सुमारास "सकाळ' कार्यालयात येऊन बसत असतानाच, आमचे श्रीगोंद्याचे बातमीदार संजय काटे यांचा फोन आला. नेहमीप्रमाणे बातमीसाठी आलेला फोन असेल, असे सुरवातीला वाटले. मात्र, त्यांच्या "सुशांतसिंहने आत्महत्या केली' या वाक्याने सुरवातीला काहीसा बुचकळ्यात पडलो. "कोण सुशांतसिंह..?' माझ्या या प्रश्नावर क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीची भूमिका केलेला अभिनेता, असे त्यांनी सांगताच, डोक्यात एकदम प्रकाश पडला. एकदम अवाक् होत "कधी केली त्याने आत्महत्या..?' माझ्या या प्रश्नावर त्यांनी टीव्हीवर बातमी सुरू आहे, असे सांगितले नि फोन कट झाला..
माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं. अवघ्या 34 वर्षांच्या सुशांतसिंहने आत्महत्या करावी, हे मनाला काही पटत नव्हतं.. लगेच न्यूज चॅनेल सुरू केला, मग खात्री पटली. टीव्हीवरील मालिकांमधून सुशांतसिंहचे आगमन झाले. कसदार अभिनयाच्या बळावर अल्पावधीतच त्याने मोठा पडदाही व्यापून टाकला. संवेदनशील भूमिकांतून तो घराघरात नि मनामनात पोचला.. "काय पो छे' "पीके', "एम. एस. धोनी', "केदारनाथ' अशा अनेक चित्रपटांतून तो वेगवेगळ्या भूमिकांतून भेटत राहिला. त्या अनेकांच्या मनात घर करून बसल्या.
जाणून घ्या - पवित्र रिश्ता ते छिछोरे
काही दिवसांपासून सुशांतसिंह "डिप्रेशन'मध्ये असल्याच्या बातम्या कानावर येत होत्या. चित्रपटातून समाजाला जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा सल्ला देणाऱ्या सुशांतने आत्महत्या करावी? म्हणजेच, "रिल' आणि "रिअल लाईफ' याची जोड त्यालाही देता आली नाही.. स्वत:च्याच चित्रपटातून त्याला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलता आला असता; पण बहुधा त्यालाही जगण्याची आस राहिली नसावी.. पोलिसांच्या तपासात त्याच्या आत्महत्येची कारणं समोर येतीलही.. पण; "हेही दिवस जातील', असं त्याला का वाटलं नसावं..
"छिछोरे' या सिनेमातच अन्नी म्हणतो, की ""मैने उससे (मुलाला) ये तो कहा था, की तेरे सिलेक्ट हो जाने के बाद बाप-बेटे साथ मिलकर शॅम्पेन पिएंगे। लेकिन मैंने उससे ये नहीं कहा, कि सिलेक्ट नहीं होने पर क्या करेंगे?'' जीवनात "डिप्रेशन' आल्यावर काय करायचे, हे सुशांतही ठरवले नव्हते. तोच म्हणतो, की ""प्लान "ए' से जरा भी कम अहम नहीं है प्लान "बी'.. अगर आप सिर्फ सफलता को जेहन में रखेंगे, तो असफलता आपको तोड़ देगी..''