लग्नाची गोष्ट : सोशली जुळलेली ‘हॅशटॅग लव्हस्टोरी’ | Marriage Story | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suyash tilak and aayushi bhave
लग्नाची गोष्ट : सोशली जुळलेली ‘हॅशटॅग लव्हस्टोरी’

लग्नाची गोष्ट : सोशली जुळलेली ‘हॅशटॅग लव्हस्टोरी’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- सुयश टिळक, आयुषी भावे

मनोरंजन सृष्टीतील नुकतंच विवाहबद्ध झालेलं एक स्वीट कपल म्हणजे सुयश टिळक आणि आयुषी भावे. लवकरच त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण होईल. आयुषीनं २०१८मध्ये श्रावण क्वीनचा किताब मिळवला होता. याचवेळी त्यांची पहिली भेट झाली होती. त्यापूर्वी ती मराठी मालिका, चित्रपटांना फार फॉलो करत नसल्यानं सुयश टिळक कोण, हे तिला माहिती नव्हतं. त्याची कामंही तिनं पाहिली नव्हती. त्या भेटीनंतर इंस्टाग्रामवर त्यांचं बोलणं व्हायला लागलं आणि काही महिन्यांनी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं ते पुन्हा भेटले. या वेळी त्यांची छान ओळख झाली आणि त्यांची मैत्री इंस्टाग्रामवरून व्हॉट्सॲपवर आली. बोलणं वाढलं, भेटी वाढल्या आणि आपण एकमेकांसाठी परफेक्ट आहोत हे या दोघांना जाणवलं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

सुयशनं आयुषीबद्दल बोलताना सांगितलं, ‘‘आयुषी बहुगुणसंपन्न मुलगी आहे. ती उत्कृष्ट नृत्यांगना आहे, उत्तम गाते. याव्यतिरिक्तही अनेक गोष्टीत ती पारंगत आहे. स्वच्छंदीपणे आयुष्य जगायचं हा तिचा स्वभाव मला खूप आवडतो. ती खूप प्रेमळ आणि सगळ्यांमध्ये पटकन मिसळणारी आहे. तिच्या मनमोकळ्या स्वभावानं ती प्रत्येकाला आपलंसं करून घेते. अतिशय नम्र, शांत स्वभाव आहे तिचा. तिला कसलाही गर्व नाही. तिच्या बोलण्यानं, वागणुकीनं ती कधीही कोणाला दुखावत नाही. ती खूप क्रिएटिव्ह आहे. समोरची व्यक्ती कोणत्याही वयाची असो, कोणत्याही प्रोफेशनमधली असो, आयुषी प्रत्येकाशी तितक्याच आदरानं बोलते. एखादी गोष्ट आवडली, तर ती पटकन समोरच्याचं कौतुक करते. तसंच माझीही कोणती कृती तिला आवडली, तर ती मला तसं सांगते किंवा नाही आवडली तर त्याची जाणीव करून देते. मी जितका आहे त्यापेक्षा चांगला माणूस बनण्यामागं आयुषीचा मोठा वाटा आहे.’’

आयुषी म्हणाली, ‘‘सुयश ‘परफेक्शनिस्ट’ आहे आणि मी तितकीच त्याच्याविरुद्ध. तो अत्यंत प्रेमळ आणि समंजस मुलगा आहे. तो सगळ्यांशी प्रेमानं वागतो, प्रत्येकाशी आपुलकीनं आणि नम्रपणे बोलतो. त्याच्या बोलण्यातून त्याचा आत्मविश्वास जाणवतो. त्याला त्याचे मुद्दे व्यवस्थित मांडता येतात. मला बोलायला, गप्पा मारायला खूप आवडतं. त्यामुळं माझी सगळी बडबड तो शांतपणे ऐकून घेतो. पर्सनली आणि प्रोफेशनली तो अगदी सहज सगळ्यांशी संवाद साधतो, सगळ्यांशी संपर्क ठेवतो, सगळ्या गोष्टी छान मॅनेज करतो. या सगळ्या गोष्टी मी हळूहळू त्याच्याकडून शिकतेय. एक माणूस म्हणून तो खूप जेन्यूअन आहे. त्याची आणि माझी ओळख झाल्यावर मी त्याची बरीच कामं पाहिली. त्यातही त्यानं ‘खाली पिली’ या हिंदी चित्रपटात साकारलेली भूमिका मला विशेष आवडली. यात त्याचा निगेटिव्ह रोल आहे आणि खऱ्या आयुष्यात सुयश अजिबात तसा नाहीये. तो खूपच गोड मुलगा आहे.’’

सुयश लवकरच ‘हॅशटॅग प्रेम’ या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. याबद्दल सुयश म्हणाला, ‘‘आतापर्यंत मी चित्रपटांमधून सहायक अभिनेत्याच्या भूमिका साकारल्या, पण अभिनेता म्हणून हा माझा पहिलाच चित्रपट असल्यानं माझ्यासाठी खूप खास आहे. या चित्रपटात तुम्हाला एक रोड जर्नी पाहायला मिळेल. यात मी बबन ही भूमिका साकारतोय. यात मी मालवणी, कोकणी भाषा बोलण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून शूटिंगदरम्यान मी मालवणी बोलायला शिकलो. या चित्रपटातील गाणी उत्कृष्ट झाली आहेत. या चित्रपटात मी पहिल्यांदाच नाचताना दिसणार आहे. त्यामुळं या चित्रपटासाठी मी खूप उत्सुक आहे.’’

(शब्दांकन - राजसी वैद्य)

loading image
go to top