गुलशन कुमार... माझा भाऊ, माझा मित्र! | Gulshan Kumar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anand shinde
गुलशन कुमार... माझा भाऊ, माझा मित्र!

गुलशन कुमार... माझा भाऊ, माझा मित्र!

‘टी-सीरिज’चे सर्वेसर्वा निर्माते गुलशन कुमार यांच्या निर्मितीत हिट झालेला ‘देवांचा तू देव गजानन’ माझा पहिलावहिला मराठी भक्तिगीतांचा अल्बम ठरला. अर्थातच त्यामुळे तेही खूप खूष होते. त्यांनी माझं तोंडभरून कौतुक केलं. ते म्हणाले, ‘तुम हम सबसे ज्यादा रईस हो, क्यूँ की तुम्हारे पास आवाज है, कला है और लोगों में नाम है।’ आजही ते शब्द आठवतात. मी तेव्हा फारच भारावून गेलो होतो. ते क्षण मी कधीच विसरू शकणार नाही; कारण तो माझा उद्याचा काळ होता आणि ‘गुलशन कुमार’ एक निर्माता म्हणून खूप मोठं नाव होतं...

कलाकारांची जाण असलेला आणि कलेला प्राधान्य देणारा असा एक निर्माता मला माझ्या आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर भेटला... ज्याने माझ्या गाण्यावर, माझ्या शब्दांवर अन् ‍माझ्या दृष्टीवर मनापासून विश्वास ठेवला. ज्याने आपल्या लहान भावाप्रमाणे कित्येक वर्षं माझ्यावर जिवापाड प्रेम केलं. इतकं प्रेम दिलं की त्याची म्युझिक कंपनी ही माझीच कॅसेट कंपनी असल्यासारखं वाटू लागलं आणि ते माझं दुसरं घरच झालं. ती कंपनी म्हणजे ‘टी-सीरिज’ आणि तो निर्माता म्हणजे गुलशन कुमार!

गुलशन कुमार नावाच्या व्यक्तीबद्दल मी सांगेन तेवढं कमी आहे, असं मला वाटतं. दुसऱ्या कंपन्यांसाठी लोकगीतं, चित्रपट गीतं आणि विनोदी गीतं मी गात होतो. त्यांचे अल्बम हिट होत होते आणि तेव्हाच आमची भेट झाली. त्या दरम्यान टी-सीरिज कंपनीतर्फे हिंदी-मराठी भक्तिगीतांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत होती. साहजिकच कंपनीचं नावही जोमाने उदयास येत होतं. त्या वेळेस दोन-तीन वेळा आम्ही समोरासमोर आलो. गुलशन कुमार यांनी माझ्या आवाजात गाणी आणि अल्बमची निर्मिती करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्यात काय जादू होती माहीत नाही; पण त्यांना जी व्यक्ती भेटायची ती त्यांचीच होऊन जायची... माझंही काहीसं असंच झालं. मी त्यांच्यासाठी गायचं ठरवलं आणि आम्ही पहिलं लोकगीत टी-सीरिजसाठी रेकॉर्ड केलं ते म्हणजे, ‘मंगला भेट मंगलवारी...’ तो १९९५-९६ चा काळ होता आणि त्या वेळी कॅसेटसचा जमाना होता. माझ्या ‘मंगला...’ लोकगीतांच्या कॅसेटने पुन्हा एकदा मार्केट गाजवलं होतं.

कॅसेटच्या प्रसिद्धीनंतर लगेच गणपती बाप्पाचं आगमन होणार होतं. ती संधी साधून गुलशन कुमार यांनी मला सांगितलं, की तुमच्या आवाजात आपण गणपतीच्या गाण्यांचा अल्बम करूया. त्यानंतर आला ‘देवांचा तू देव गजानन’ हा माझा पहिला ‘टी-सीरिज’मधला भक्तिगीतांचा अल्बम. तोही सुपरहिट झाला. गुलशन कुमार यांच्या निर्मितीत हिट झालेला तो पहिलावहिला मराठी भक्तिगीतांचा अल्बम ठरला. अर्थातच त्यामुळे तेही खूप खूष होते. त्यांनी माझं वैयक्तिक अभिनंदन करण्यासाठी मला कंपनीत बोलावलं. माझं तोंडभरून कौतुक केलं. ते म्हणाले, ‘तुम हम सबसे ज्यादा रईस हो, क्यूँ की तुम्हारे पास आवाज है, कला है और लोगों में नाम है। और ऐसा नाम सबको नसीब नहीं होता!’

आजही ते शब्द कानात घुमत असतात. मला प्रेरणा देत राहतात. तेव्हा मी किती भारावून गेलो होतो ते मी कधीच विसरू शकणार नाही. कारण तो माझा उद्याचा काळ होता आणि ‘गुलशन कुमार’ एक निर्माता म्हणून खूप मोठं नाव होतं. त्यानंतर त्यांनी माझ्याशी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आणि टी-सीरिजसोबत माझं नाव बॉण्डद्वारे जोडलं गेलं. तुम्हाला हवी ती गाणी, अल्बम आणि तुमच्या विचारातले प्रोजेक्ट आपण टी-सीरिजमधून करू, असा विश्वास त्यांनी मला दिला.

‘टी-सीरिज’मध्ये मी अनेक वर्षांत हजारो गाणी रेकॉर्ड केली. त्यातले मला आठवताहेत ते आवडीचे अल्मब म्हणजे ‘दत्तभक्ती’, ‘मांढरगावची माझी काळूबाई’, ‘लावली माया अंबाबाईनं’, ‘माहूरगडाची देवी रेणुका’, ‘आला नाचत लंबोदर’, ‘आली स्वारी उंदरावरी’, ‘गणेशा दुडूदुडू धावत ये’, ‘आला हो आला गणपती माझा’, ‘खंडोबाची वारी’, ‘एकदातरी जावे पंढरी’, ‘पंढरीच्या नाथा’, ‘शेगावीचा राणा’, ‘विद्येचा राजा’...

गुलशन कुमार यांचं आवर्जून म्हणणं असायचं, की महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर माझ्या आवाजात वर्षातून दोन तरी अल्बम व्हायला हवेत. टी-सीरिजसाठी मी बाबासाहेबांचे अनेक अल्बम आणि गाणी गायलो. त्यातली कित्येक गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. ‘क्रांतीचा उद्‍गाता’, ‘बन सेवक समाजाचा’, ‘एका घरात या रे’, ‘अनमोल भीम माझे’, ‘आली भीमजयंती आली’, ‘लाल दिव्याच्या गाडीला’, ‘ज्ञानप्रकाश’, ‘मानव झालो आम्ही’, ‘तुला भीमानं बनवला वाघ’, ‘धर्मांतर’, ‘त्यागी भीमराव’, ‘आवाज हा भीमाचा’, ‘जन्मला दीनांचा वाली’, ‘भीमक्रांतिकारी’, ‘तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे’, ‘जय भीमवाल्यांचा सरदार’, ‘समाजाचं काय’, ‘मुक्तिदाता’ आणि ‘कायदा भीमाचा’ असे त्यातले काही अल्बम सांगता येतील. त्याचबरोबर गाण्याच्या माध्यमातून अनेक जीवनकथा आणि देवी-देवतांच्या कथा मी गायल्या. मराठीव्यतिरिक्त त्यांनी माझ्याकडून हिंदी भक्तिगीतांचे अल्बमही गाऊन घेतले.

कृष्णावर त्यांची विशेष भक्ती होती. त्यामुळे त्यांनी आग्रहाने माझ्याकडून ‘आयो रे नंदलाला’ हे गाणं गाऊन घेतलं. या गाण्यामुळे हिंदी भाषिकांमध्येही मला ओळख मिळाली. त्या काळी गाण्यांच्या अल्बमचे होर्डिंग्ज फारसे लागत नसत. मी ‘त्रिनेत्री शंकरा’ हा अल्बम गायल्यानंतर एक दिवस ते मला म्हणाले, ‘अरे तुम क्या कर रहे हो? अपने परिवार को लेकर जरा मुंबई घूमके आओ! तुम्हारे पोस्टर्स लगे हैं! आणि मी खरंच माझ्या परिवाराला घेऊन गाडीने मुंबई फिरलो आणि अनेक ठिकाणी ‘त्रिनेत्री शंकरा’ची माझी होर्डिंग्ज बघितली. त्यानंतर त्यांनी माझ्याकडून विविध भाषांमध्ये भक्तिगीतं गाऊन घेतली. पंजाबी, गुजराती, भोजपुरी... असा साधा निर्मळ मनाचा आणि कलाकारांची कदर असलेला त्यांच्यासारखा निर्माता मी आजतागायत पाहिला नाही.

एक दिवस मी असाच नेहमीप्रमाणे टी-सीरिज कंपनीत रेकॉर्डिंगसाठी जायला तयार होत होतो. आंघोळीला जाणार तेवढ्यात घरचा फोन वाजला. टी-सीरिजचे मॅनेजर होते. ते म्हणाले, की आजचं रेकॉर्डिंग होऊ शकत नाही... त्यांनी गुलशनजींवर झालेल्या हल्ल्याची बातमी दिली. त्यांच्यावर गोळीबार झालाय, हे ऐकून मी जागच्या जागी स्तब्ध झालो. तसेच कपडे घालून धावतपळत हॉस्पिटल गाठलं. तिथे त्यांचं निधन झाल्याचं समजलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांचा संपूर्ण परिवार शोकाकुल होता. आमच्यासाठी तो खूप मोठा धक्का होता. तिथे जमलेला त्यांचा प्रत्येक कलाकार आणि कर्मचारी ढसाढसा रडत होता. माझ्यावर लहान भावासारखं प्रेम करणारे गुलशनजी गेले, यावर विश्वासच बसत नव्हता. माझ्यासाठी तो मोठा धक्का होता.

गुलशनजींमुळे मी माझ्या कारकिर्दीत असा एक अल्बम करू शकलो, ज्यामध्ये शिंदे परिवाराच्या तीन पिढ्या गायल्या. माझे वडील प्रल्हाद शिंदे यांनी दोन गाणी गायली, आनंद-मिलिंद यांनीही दोन गाणी गायली आणि माझा मुलगा आदर्श शिंदे यांनीही दोन गाणी गायली. तो अल्बम म्हणजे ‘पंढरीच्या नाथा’. गुलशन कुमार यांच्या पुढच्या पिढीने ‘टी-सीरिज’चं नाव शिखरावर नेऊन ठेवलं आहे. टी-सीरिजशी माझं नातं भावनिक आहे. त्यामुळे गुलशनजींच्या नंतरही ते आजही तितकंच घट्ट आहे. गुलशन कुमार यांच्या रूपाने मला निर्मात्याच्या रूपात मोठा भाऊ मिळाला, हे मी माझं भाग्य समजतो.

vijayaanandmusicpvtltd@gmail.com

loading image
go to top