esakal | Income Tax Raid : 'आता सस्ती कॉपी राहिली नाही'; अखेर तापसीने सोडलं मौन
sakal

बोलून बातमी शोधा

taapsee pannu

पाच कोटी कॅश रिसीट, कंगनाचा टोला आणि अर्थमंत्र्यांच्या वक्तव्याचाही घेतला समाचार 

Income Tax Raid : 'आता सस्ती कॉपी राहिली नाही'; अखेर तापसीने सोडलं मौन

sakal_logo
By
स्वाती वेमूल

प्राप्तिकर विभागाकडून सुरू असलेल्या धाडसत्रावर अखेर अभिनेत्री तापसी पन्नूने मौन सोडलं आहे. तापसीने ट्विट करत सर्व आरोपांवर उत्तर दिलं आहे. 'प्रामुख्याने तीन गोष्टींबाबत सलग तीन दिवस सखोल तपास सुरू आहे', असं लिहित तिने तीन ट्विट केले आहेत. तिच्याकडे सापडलेल्या पाच लाख रुपयांच्या कॅश रिसीटचा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या वक्तव्याचा उल्लेखही तिने उपरोधिकपणे केला आहे. 

काय म्हणाली तापसी?
सलग तीन दिवस प्रामुख्याने तीन गोष्टींचा सखोल तपास सुरू आहे. 
१- मी पॅरिसमध्ये खरेदी केलेल्या कथित बंगल्याची चावी. कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या जवळ येत आहेत. 
२- पाच कोटी रुपयांची कथित रिसीट, जी भविष्यासाठी आहे. कारण ते पैसे मी आधी नाकारले होते. 
३- माननीय अर्थमंत्र्यांच्या मते, २०१३ मध्ये माझ्या घरावर छापे पडले होते. 
आता मी 'सस्ती कॉपी' राहिलेली नाही. 

तापसीने तिच्या शेवटच्या ओळीत अभिनेत्री कंगना राणावतला टोला लगावला आहे. कारण कंगनाने तापसीचा उल्लेख 'सस्ती कॉपी' असं केलं होता. बुधवारपासून तापसीच्या घरी व कार्यालयावर आयकर विभागाकडून धाडसत्र सुरू आहेत. यामध्ये तापसीच्या घरातून पाच कोटी रुपयांची कॅश रिसीट सापडल्याची माहिती आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. तर निर्मला सीतारमण यांनी या धाडसत्राबाबत वक्तव्य केलं होतं. "आमचं सरकार असताना जेव्हा अशा प्रकारची कारवाई होते, तेव्हा त्यावर प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र २०१३ मध्ये जेव्हा कलाकारांवर कारवाई झाली, तेव्हा कुणीही काही विचारलं नव्हतं", असं त्या म्हणाल्या होत्या. 

'फँटम फिल्र्म्स' या कंपनीने केलेल्या अंतर्गत आर्थिक व्यवहारांची तपासणी आयकर विभागाकडून होत आहे. तापसी, अनुरागसोबतच या कंपनीच्या सहमालकांच्या घरावर कार्यालयांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. मुंबई आणि पुण्यातील २८ ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. सेलिब्रिटींचं काम करणारे काही अधिकारी आणि क्वान (KWAN) आणि एक्सिड या टॅलेंट मॅनेजमेंट कंपन्यांवरही छापे टाकण्यात आले आहेत. या छापेमारीत तब्बल ६५० कोटी रुपयांची आर्थिक अनियमितता उघडकीस आणली असल्याचा दावा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने केला. 
 

loading image