केतकी चितळे प्रकरणात पोलिसांचा तपास सुरु; महत्वाची माहिती समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ketki Chitale Sharad Pawar offensive post
केतकी चितळे प्रकरणात पोलिसांचा तपास सुरु; महत्वाची माहिती समोर

केतकी चितळे प्रकरणात पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे हीनं शरद पवारांबाबत केलेली आक्षेपार्ह पोस्ट यापूर्वीच व्हायरलं झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. सुरुवातीला या पोस्टला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानं ती केतकीच्या माध्यमातून पुन्हा व्हायरल करण्यात आली आहे, असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळं केतकीच्या मागे कोणी सूत्रधार आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे. (Thane Police probe into Ketki Chitale case got some IMP info about Post)

शरद पवारांबद्दल समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न या पोस्टद्वारे होत असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिस तपासात याबाबत खुलासा झाला आहे. १८ जानेवारी २०२० रोजी पहिल्यांदा ही पोस्ट व्हायरल करण्यात आली होती. काही लोकांनी व्हॉट्सअॅप आणि वैयक्तिक ग्रुपमध्ये ही पोस्ट टाकली होती. त्यामाध्यमातून ही पोस्ट इतर माध्यमांमध्ये व्हायरल करण्याचा प्रयत्न होता. मात्र, त्यावेळी ही पोस्ट अपेक्षित व्हायरल झाली नाही. त्यानंतर आता ही पोस्ट पुन्हा केतकीच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आली आहे का? हे तपासण्यात येणार आहे. केतकी ही वादग्रस्त अभिनेत्री असून तिने यापूर्वीही पोस्ट करुन वाद ओढवून घेतले आहेत.

पोलिसांना मिळाले पुरावे

याचा शोध ठाणे पोलीस करत आहेत. पोलिसांचं म्हणणं आहे की, २०२० मध्ये ही पोस्ट व्हायरल झाल्याचे पुरावे त्यांना मिळाले आहेत. पण ही पोस्ट काही ठराविक व्हॉट्सअॅपपर्यंतच मर्यादित राहिली होती. पण आता ती केतकीच्या माध्यमातून पुन्हा व्हायरल करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. यामुळं या अँगलनं याची चौकशी केली जणार आहे, यामागे कोण सूत्रधार आहे हे शोधलं जाणार आहे.

नाशिकमध्येही झाली होती दुसरी पोस्ट व्हायरल

दरम्यान, नाशिकमध्येही शरद पवारांविरोधात एक पोस्ट व्हायरल झाली होती. यामध्ये पवारांना बारामतीचे गांधी संबोधून त्यांच्याविरोधात नथुराम उभं करण्याचं म्हटलं होतं. त्यामुळं नाशिकमधील या पोस्टशी केतकीच्या पोस्टचा काही संबंध आहे का? हे शोधलं जात आहे. पवारांविरोधात समाजात द्वेष पेरण्यासाठी आत्ता जी वेळ साधली गेली आहे कारण सध्याचं वातावरण तणावपूर्ण आहे.