
Shiv Jayanti 2023: चंद्रकांत मांढरे ते शरद केळकर.. या कलाकारांनी छत्रपती शिवरायांची भूमिका अजरामर केली
Shiv Jayanti 2023: आज महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. आज संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. शिवरायांनी दिलेली शिकवण सर्वांनी आत्मसात केला पाहिजे.
मराठी मनोरंजन विश्वात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या पराक्रमावर आधारित अनेक सिनेमे आले आहेत.
चंद्रकांत मांढरे यांच्यापासून ते शरद केळकर पर्यंत सर्व अभिनेत्यांनी छत्रपती शिवरायांची भूमिका लोकप्रिय केली. चला तर बघूया.
१) चंद्रकांत मांढरे
मराठी सिनेसृष्टीतील खऱ्या अर्थाने ऐतिहासिक सिनेमांची सुरुवात झाली छत्रपती शिवाजी या सिनेमापासून. १९५२ साली आलेला हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय झाला.
चंद्रकांत मांढरे यांनी साकारलेली छत्रपती शिवरायांची भूमिका अजरामर झाली. भालजी पेंढारकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केलेला
२) डॉ. अमोल कोल्हे
नितीन चंद्रकांत देसाई निर्मित राजा शिवछत्रपती हि स्टार प्रवाह वरील मालिका. या मालिकेतून डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली महाराजांची भूमिका लोकांच्या मनामनात बसली.
अमोल कोल्हे यांनी पुढे अनेक कलाकृतींमधून शिवाजी महाराजांची भूमिका साकारली
३) शरद केळकर
तान्हाजी सिनेमात शरद केळकर यांनी साकारलेली शिवाजी महाराजांची भूमिका वेगळी ठरली. संपूर्ण भारतात शरद केळकर यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेचं कौतुक झालं.
तान्हाजी सिनेमा लोकप्रिय होण्यामागचं मोठं कारण होतं शरद केळकर यांनी साकारलेले शिवाजी महाराज
४) शंतनू मोघे
स्वराजरक्षक संभाजी मालिकेत शंतनू मोघे यांनी साकारलेले शिवाजी महाराज प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले.
शंतनू मोघे यांची नजर, त्यांचा आवाज, त्यांचा अभिनय अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना भावल्या. रावरंभा सिनेमात शंतनू मोघे पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
५) चिन्मय मांडलेकर
दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक सिनेमांची घोषणा केली. आणि या सिनेमातून चिन्मय मांडलेकर शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून आपल्या भेटीला आला.
चिन्मयची शरीरयष्टी शिवाजी महाराजांच्या भूमिकेला योग्य नाही, असं प्रेक्षकांचं म्हणणं होतं. परंतु चिन्मयने त्याच्या दमदार अभिनयाने शिवाजी महाराजांची भूमिका लोकप्रिय केली.
६) गश्मीर महाजनी
प्रवीण तरडे दिग्दर्शित सरसेनापती हंबीरराव हा सिनेमा २०२२ ला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात अभिनेता गश्मीर महाजनी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका लोकप्रिय केली.
विशेष गोष्ट म्हणजे याच सिनेमात गश्मीरने शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज अशी दुहेरी भूमिका साकारली आहे.
अशाप्रकारे मराठी मनोरंजन विश्वातील अनेक लोकप्रिय अभिनेत्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली